स्वातंत्र्यवीर
भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष हे. गेल्या काही दिवसांपासून माझी नुसती धामधूम चाललीय. आता मी काही मानापानाचा भूकेला नाही. पण लोक इतक्या अपेक्षेनं माझ्याकडे येतात, त्यांना नाराज करणं माझ्या जीवावर येतं. शिवाय हल्ली शरीर साथ देत नाही, मनाचा उत्साह असला तरी. पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला ज्या काही निवडक लोकांना दिल्लीत आमंत्रण होतं, त्यात मलाही बोलावलं होतं. तेव्हा इतकी दगदग झाली की, मी मनाशी निश्चय केला, बस्स, आता कुठल्याही सत्काराला जायचं नाही. अरे राष्ट्रपतीनीं बहुमान केला, म्हणजे सर्व देशानंच केला की.
असं ठरवूनदेखील आज गेलो होतो एका सेविका संघाच्या कार्यक्रमाला. गल्लीतल्या शाळेतील हेडमिस्ट्रेस आल्या होत्या, सोबत चार पाच कार्यकर्त्या स्त्रियांना घेऊन. मी सरळ नकार दिला होता. पण त्यांनी आग्रहच धरला, '' हे तर आपल्या घरचं कार्य! नाही कसं म्हणता तुम्ही काका? तुमचे खुप सत्कार झालेत. अगदी खरं, हो... हो, आम्ही पाहिलं ना टिव्हीवर तुम्हाला. पण येथे केवळ महिला आहेत. निदान चार-पाचशे बाया तर नक्कीच असतील आणि त्यात बहुसंख्य तरुण मुली असतील काका. उद्याच्या माता ह्या. त्यांच्यावर संस्कार नको का व्हायला? आज काल काय टिव्हीवर नुसता नंगानाच चालतो. ह्या पोरी अशा सिरीअल्स पाहातात, म्हणून तर अशा कार्यक्रमांची गरज वाटते.'' हेडमिस्ट्रेसची ती, बोलायला काय ऐकते का कुणाला? शेवटी मी कबूल केलं.
पण तेथून आल्यापासून मी अस्वस्थ झालोय. आतापर्यंत कधीच असा अस्वस्थ झालो नव्हतो. मी तसा फार बोलत नाही. काय स्वत:बद्दलच सांगायचं? आम्ही असं केलं आणि आमचे असे हाल झाले तुरुंगात. मगा मी काय करतो, मी लोकांना प्रश्न विचारायला सांगतो आणि प्रश्नांची उत्तरं देण्याच्या ओघात जे आठवतं, जे सांगावंसं वाटतं ते सांगतो. आज कुणीतरी वयस्क बाई उठल्या, म्हणाल्या, '' भाऊकाका, एक जरा घरगुती स्वरुपाचा प्रश्न विचारते. पाहिजे तर उत्तर द्या, नाहीतर राहू द्या.'' मी जोरात म्हटलं,'' हो.. हो, विचारा ना, पंचावन्न वर्षांपासून मला खासगी जीवनच राहिलेलं नाही, घरंच राहिलेलं नाही, घरगुती काय असणार?'' मी असं म्हटलं तर टाळ्यांचा कडकडाट् झाला. पण मनात जरा पाल चुकचुकलीच. बाई मला भाऊकाका म्हणाली, मला फार पूर्वी भाऊकाका म्हणत असत. मग केव्हातरी भाऊ निघून गेलं, आणि काका, काकासाहेब राहिलं. तर बाई उभी राहिली, कमरेवर हात देवून शक्यतोवर ताठ होण्याची व्यर्थ धडपड करत म्हणाली, ''काका, तुम्ही आता सांगितलं, तुमच्या कार्यामध्ये तुमच्या पत्नीनं तुम्हाला साथ दिली. कुरकूर केली नाही, विरोध केला नाही, म्हणूनच तुम्ही हे कार्य करू शकला. पण गांधीजींनी जेव्हा सरकारी नोकऱ्या सोडा असं आवाहन केलं त्यानंतरही तुम्ही सरकारी नोकरीतच होता. तुम्ही नोकरी सोडली नाही हे ठीकच झालं. घरची मालगुजारी, सात पिढ्या पुरेल इतकी संपत्ती आणि म्हणे नोकरी सोडली, ह्यात कसला त्याग? पण ते जाऊ द्या. मला काय म्हणायचं होतं, तुमच्या पत्नीनं स्वातंत्र्याच्या यज्ञात स्वत:चा बळी दिला. ती धन्य झाली बिचारी. पण ते साल होतं ४६. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत तुम्ही तुरूंगातच होता. म्हणजे तुमच्या पत्नीनं तुमच्या कामात सहकार्य केल्याचं तुम्ही सांगता ते कसं?''
अनपेक्षितपणे आलेला हा प्रश्न ऐकून मी हबकलोच. पण चेहऱ्यावरील भाव तसेच ठेवून उभा राहिलो अन् मग मला खोकल्याची उबळ आली. असं होतं मला कधीकधी. मग जरा थांबावं लागलं. मी पाणी मागितलं, जरा पाणी पिऊन सुरुवात केली, '' तुम्ही म्हणता ते खरं आहे. माझ्या दुर्दैवाने आदर्श गृहिणी, सहचरी आणि पत्नी असलेली ती मला सोडून गेली. हेही खरं आहे की, ती गेल्यानंतर मी जास्त कार्यशील झालो. पण तरीही म्हणतो की तिनं मला साथ दिली. कारण तिच्या विचारांची मला पूर्ण ओळख होती. वैवाहिक जीवन आम्ही फार वर्षे जगू शकलो नाही. आमच्यात फारच चांगला सुसंवाद होता. तिचा स्वभाव माझ्या इतका ओळखीचा होता की, माझी खात्री आहे, ती जिवंत असती तरी तिने मला ह्या कामात साथच दिली असती. ती नसली तरी तिचा आत्मा माझं कार्य बघतोय, तिला त्यातून समाधान मिळतंय, असा माझा विश्वास होता, आणि आहे. एका अर्थानं हे खरं आहे की मी कार्य करत होतो तेव्हा ती शरीरानं जिवंत नव्हती, त्यामुळे तिची प्रत्यक्ष साथ मला नव्हती. पण ती माझ्या मनात होती, मनातून मला सांगत होती, आपण करताय ते बरोबरच करताय, योग्यच करताय.'' बोलता बोलता मला धाप लागली म्हणून मी थांबलो. डोळ्यावरचा चष्मा काढून मी डोळे पुसले. त्यानंतर चष्मा घातला तर मला असं दिसलं की, श्रोत्यांतील बहुतेक स्त्रिया त्या म्हातारीकडं रागानं बघत आहेत. '' गेल्या काही दिवसांपासून मला जरा जास्तच दगदग झाली आहे. मनही आता थकलं आहे, जुन्या आठवणींनी त्रासच होतो. म्हणून सर्वांची क्षमा मागून मी आता केवळ ऐकण्याचं काम करणार आहे'' असं म्हणून मी खुर्चीत बसून घेतलं.
सभा गाजवली, पण माझ्या हृदयाची वाढलेली धडधड अजूनही कमी झालेली नाही. कार्यक्रम संपल्याबरोबर त्या हेडमिस्ट्रेसबरोबर मी चहा घ्यायला गेलो, तेथेच जरा आडवाही झालो. त्यांनी आपल्या कारमधून मला येथे आणून सोडलं. पण अजूनही माझ्या हृदयाची धडधड चालूच आहे. माझ्या मनावरचं ओझं हलकं झालेलं नाही, मनातील भितीचं दडपण कमी झालेलं नाही. मी विचार करतोय, ती बाई कोण होती? मला भाऊकाका म्हणणारी. खरं तर मी नगर सोडलं त्याला आज साठ वर्ष होत आहेत. तेथेच केवळ मला भाऊकाका म्हणत असत. त्या बाईचा आवाज, तिची उभी राहाण्याची ढब ओळखीची वाटली मला. कार्यक्रम संपल्याबरोबर मी हेडमिस्ट्रेस बाइर्ना ही बाई कोण म्हणून विचारलंही. त्यांनी तिचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण ती नाहिशी झाली होती. आणि त्या मंडळाच्या कार्यक्रमाला ती पूर्वी कधी आलीही नव्हती.
मला वाटलं, तो तिचाच आवाज होता. तीच मला सूचना द्यायला आली असणार. 'आता तुमची वेळ जवळ आली आहे. आता तरी सत्य बाहेर येऊ द्या. हे सत्य कळल्यानं जगाकरता काही फरक पडणार नाही. पण तुमच्या स्वत:करता तरी खरं काय आहे उघड करा'' आता मला वाटतंय की म्हणूनच मला तिचा आवाज ओळखीचा वाटत होता. पण दुसरं मन सांगतंय, म्हातारचळ लागलाय तूला आता. अरे कसला आत्मा? आणि कसला ओळखीचा आवाज? पंचावन्न वर्षांपूर्वीचा आवाज आत्ता तुझ्या लक्षात आहे आणि तो तरुण आवाज म्हातारा झाल्यावर कसे असेल हेही समजलं? मूर्ख आहेस. असेल कुणी म्हातारी. म्हणाली असेल भाऊकाका. आता तुझ्या वयाची म्हातारी ती, तुला काय आजोबा म्हणेल? मी हे स्वत:ला समजावून सांगतोय, पण माझ्या मनावरील दडपण कमी होत नाहीये, गुदमरल्यासारखं होतंय मला. मला वाटतं, माझ्या मनातलं दडवून ठेवलेलं रहस्य उघड केलं तरच मला स्वस्थता मिळण्याची शक्यता आहे. निदान त्यामुळे मनावरील हो ओझं तरी कमी असेल मी मरेन तेव्हा. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या मुहूर्तावर सत्य सांगण्याचा प्रामाणिकपणा मी करतोय असंही म्हणता येईल. तो दिवस मला आठवतोय. आम्ही तेव्हा दाैंडला होतो. माझी नोकरी रेल्वेमध्ये टी.सी.ची. दाैंड ते मनमाड, एका गाडीनं जायचं आणि दुसऱ्या गाडीनं परत यायचं. दुपारी तीनच्या सुमारास मी परत आलो. आता दोन दिवस आराम होता. पम आमचा कार्यक्रम आधीच ठरलेला होता. आमचं लग्न होऊन पाच वर्षे झाली होती, परंतु हिची कूस उजवली नव्हती. कुलकर्णी गुरुजीनी आम्हाला सल्ला दिला होता, नगरला गिरीमहाराजांना शरण जा. त्यांच्या कृपाप्रसादाने सर्व ठीक होईल. कोणत्या गाडीनं जायचं, कुणाकडं उतरायचं हे मी पक्के करुन जायचं, कुणाकडं उतरायचं हे मी पक्कं करून आलो होतो.म्हणूनच मी घाईघाईनं स्टेशनवर फारसा न रेंगाळता घराची वाट धरली होती. रेल्वे क्वार्टर्समध्ये पोचलो तर घराला कुलूप होतं. मला जरा आश्चर्यच वाटलं. मी ह्या गाडीनं परतणार हे तिला माहीत होतं. बहुधा ती अशावेळी जेवण तयार करून माझी प्रतीक्षा करीत बसलेली असे. अनेक वेळा मी तिला सांगितलं होतं, माझी वाट पाहात उपाशी राहात जाऊ नकोस. पण तिनं आपला हेका सोडला नव्हता. ती म्हणायची, 'मी घरी उपाशी तुमची वाट पाहात आहे ह्या कल्पनेनं तरी तुम्ही कुठे रेंगाळणार नाही.' मग ही गेली कुठं? शेजारचा राऊतांचा बंडू अंगणात बसला होता, मी त्याला विचारलं, ''कारे, तुझी काकू कुठे गेली?''
''काय की बुवा! सकाळी शाळेत जातांना पाहिलं होतं मी त्यांना गावाकडे जाताना. काका, काकू आजोळी जाताना कधीमधी चाव्या देशपांड्यांकडे ठेवतात. बघू का? चावी ठेवलीय का?'' हा बाळ्या जरा वेंधळा असं माझं मत होतंच, त्याच्यावर आता त्याच्या बोलण्यानं शिक्कामोर्तब केलं. सुलभाचं आजोळच काय, कुणीच नातेवाईक ह्या भागात नव्हते. पण आता त्या पोराला काय सांगायचं, म्हणून मी सांगितलं, 'जा, बघ ठेवल्यात का चाव्या?'' तो धावत गेला आणि त्यानं मला चाव्यांचा जूडगा आणून दिला. मी गोंधळलो होतो. कुठं गेली असणार ही? आजोळला जातो म्हणून कुठं गेली असेल? दरवाजा उघडून मी आत गेलो. घर सर्व नीट आवरलेलं होतं. स्वैपांकघरात डोकावून पाहिलं, चुलीवर स्वैपाक करून ठेवला होता. मी कॉटवर जाऊन पडलो. गेली असेल जवळपास, कुणा आजारी बाईकडं वा कुणा ओळखीच्या जागी. मी कॉटवर आडवा होणारच होतो, तेवढ्यात देशपांड्यांच्या काकू आल्या. ''तुमची आरामाची वेळ. उगाचच आले मी तुम्हाला त्रास द्यायला.'' असं म्हणत त्या आत आल्या आणि त्यांनी खुर्चीवरच बैठकच मारली. बऱ्याच वेळानं त्या बाई गेल्या तेव्हा मला माहीत झालं होतं की, सुलभाचं आजचं जाणं ही काही पहिलीच वेळ नव्हती. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ती निदान पाचसहा वेळा तरी अशाप्रकारे गेली होती. नगरला डॉ. काकडे तिच्या माहेरच्या ओळखीचे आहेत, त्यांच्याकडून ती ट्रिटमेंट घेत होती. कॉलनीतील जवळपासच्या सर्वच स्त्रियांना हे माहीत होतं. दरवेळेला जाताना ती चावी ठेवून जाते पण आतापर्यंत तिला कधीच उशीर झाला नव्हता. आज काय झालं कुणास ठाऊक? पण तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळपर्यत ती नक्की येईल. असं आश्वासन देऊन ती बाई निघून गेली. हा सर्व प्रकार मला नवीन होता आणि मी त्यामुळे जरा दुखावलाही गेलो होतो. मला न सांगता परस्पर तिनं हे करण्याचं काय कारण होतं? मला सांगितलं असतं तर मी काय विरोध केला असता का? आणि त्यात विचित्र म्हणजे मी जेव्हा जेव्हा तिला डॉक्टरांकडे जाण्याचा आग्रह केला होता, तेव्हा तेव्हा तिने 'जरा आणखी दोन महिने वाट पाहूया' किंवा डॉक्टर्सवर माझा विश्वास नाही, त्यापेक्षा वैद्य बघूया. देशपांडेकाका एका वैद्याबद्दल म्हणत होते' अशा काही काही सबबी सांगून डॉक्टराकडे जायंच नाकारलं होतं.
आणखीही एका गोष्टीनं माझ्या मनातला गोंधळ वाढला होता. तिचं माहेर जळगावचं. तिचा काका रेल्वेमध्ये होता. त्याच्या ओळखीनंच आमचं लग्न जमलं होतं. पण पहिल्या काही दिवसांतच तिनं मला सांगितलं होतं, जरी काका रेल्वेत असले तरी आमचं घर जळगावपासून दूर असल्यानं माझा रेल्वेशी गेल्या दोन वर्षांपर्यंत कधीच संबंध आला नव्हता. खरं सांगायचं तर तिला रेल्वेची आणि एकट्यानं प्रवास करण्याची भिती वाटते असं सुलभानं मला कितीदातरी सांगितलं होतं. गेल्या पाच वर्षांचा माझा अनुभव हाच होता. एकटीनं सोडा, ती माझ्याबरोबर प्रवास करायलाही घाबरत असे. रेल्वे आणि बसचा प्रवास तिला सहन होत नसे. थोडासा प्रवास असला तरी तिच्या पोटात ढवळू लागे आणि तिला ओकाऱ्या होऊ लागत. अनेक वेळा मी तिला कधी समजावून, कधी रागवून सांगितलं होतं,' अगं, काय घाबरटपणा हा. तू एका रेल्वे टीसीची बायको आहेस आणि रेल्वेनं प्रवास करायला घाबरतेस? चांगली शिकलेली बाई आहेस तू. अडाणी आहेस का? म्हणे प्रवासाला घाबरते! बावळटच आहेस. दर दहापंधरा दिवसांनी आमचा हा वाद ठरलेला होता. आणि आता ही देशपांडेबाई सांगत्येय की, गेल्या दीड वर्षांच्या काळात पाचसात वेळा सुलभा एकटीच नगरला गेली होती. मी स्वैपांकघरात गेलो. बाहेर अंगणात दगडी कोळशांची पेटलेली शेगडी होतीच. मी वरण त्यावर गरम करायला ठेवलं. मग भाजीही गरम केली. तिची वाट पाहाता पाहाता मला केव्हा झोप लागली मला कळलंच नाही.
मी जागा झालो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले होते. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. अजूनही सुलभाचा पत्ता नव्हता. मग मात्र मी खऱ्या अर्थानं अस्वस्थ झालो. मला तिचा राग यायला लागला आणि मनात नाही नाही त्या शंकांही यायला लागल्या. मला माझाही किंचितसा राग येत होता. दोन वर्षांपासून तिचं जाणं माझ्यापासून तिनं लपवलं होतं, चांगल्या कामाकरता असेल पण माझ्यापासून तिनं ही गोष्ट लपवून ठेवली होती. तिला उशीर झाला म्हणून मला जरा काळजी वाटत होती हे खरं. पण त्याचबरोबर माझ्या मनात तिला कसे झापावे, कसे रागवावे ह्याबद्दल मी बेतही रचत होतो.
आणखी काही वेळ वाट पाहून मी कपडे करून बाहेर पडलो. देशपांडेकाकू बाहेरच उभ्या होत्या. त्यांनी ' अहो काका, गाडी मिळाली नसेल किंवा बस लेट झाली असेल, येतीलच आता. काय काळजी करता?'' असा सल्लाही दिला होता. मी स्टेशनवर गेलो. मला माहीत होतं त्यावेळी नगरहून येणारी एकही गाडी नव्हती. तरीपण मी स्टेशनवर चक्कर टाकली. बायको नगरला गेल्याचं एकदोन सहकार्यांच्या उगाचच कानावर टाकलं. मला वाटलं होतं, जर ह्यापूर्वी ती कधी रेल्वेनं गेली असेल तर त्यांच्याकडून कळेल. मग मी बसस्टॅंडवर गेलो. चौकशी करता दुपारी अडीच वाजता येणारी बस येऊन गेली होती. ह्यानंतर येणारी बस साडेआठलाच होती. परत घरी जाऊन स्टॅंडवर येण्यापेक्षा दोन तास इथेच घालवावे, साडेआठचीगाडी पाहूनच घरी जावे, असा विचार करून मी गावात गेलो. बाजारात एका ओळखीच्या दुकानात बसून वेळ घालवला. उगाचच दोन वेळा चहा प्यायलो. राहून राहून माझ्या मनात तेच तेच प्रश्न घोळत होते. मला न सांगता ती अशी का जात होती? आणि आपण प्रवास करायला घाबरतो असं ती का भासवत होती?
साडेआठची बस वेळेवर आली आणि सुलभा त्यात नव्हती. आता मात्र मी घाबरलो. चौकशी केली तर कळले, आता शेवटची बस साडेदहालाच येते. कदाचित दवाखान्यातून निघायला तिला उशीर झाला असेल, ही बस पकडू शकली नसेल, किंवा तिला काही अपघात झाला नाही ना? आता मात्र मी घाबरलो, झपाझपा घराकडे आलो.देशपांडे दारातच उभे होते, म्हणाले, ''काय हो, वयनी आल्या नाहीत का अजून? '' मी माझी चिंता त्यांच्याकडे व्यक्त केली, डॉ. काकड्यांना फोन करावा असं वाटतंय. पण आता कॉल बुक करावा लागेल. दवाखान्यात फोन आहे वा नाही काय माहीत? त्यांनी माझी चिंताग्रस्तता ओळखली. आत जात म्हणाले, '' एक दोन मिनिटं थांबा भाऊकाका, आपण जाऊ पोस्टात. ओळख आहे माझी. नंबर शोधून देईल आणि लावूनही देईल लवकर''
आम्ही पोस्टऑफिसमध्ये गेलो, बऱ्याच वेळानं डॉक्टरांचा फोन लागला आणि त्यांनी मला धक्काच दिला, त्यांनी स्पष्ट सांगितलं, '' अशा नावाची कुणी बाई आमची पेशंट नाही.'' त्यांनी हेही सांगितलं की, त्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे सर्व हैदराबादकडे आहेत. इकडे जळगावला ते कुणालाही ओळखत नाहीत.
हे ऐकून तर माझं डोकंच चालेनासं झालं. मी घरी आलो. अंगणातील खुर्चीवर अंग टाकून दिलं. माझं डोकं सुन्न झालं होतं. ह्याचा अर्थ काय? ती नगरला डॉ. काकड्याकडे गेलेली नाही. कधीच जात नव्हती, तर ती सर्व कॉलनीला अंधारात ठेवून कुठं जात असेल? तिचा कोणी मित्र होता का? येथे गावातच ती कुणाकडे जात असेल का? किती वर्षांपासून हे प्रकरण चालू असावं? आणि इतकी वर्षे ती माझ्या डोळ्यात सफाईनं धूळ फेकत होती. माझ्याच नाही आजुबाजूच्या सर्वांच्याच. माझ्या त्यावेळी काय भावना होत्या ह्यांचं वर्णन करणं आजही कठीण आहे. मी संतापलो होतो, तिच्यावर आणि स्वत:वरही. किती पाताळयंत्री बाई आहे ही! मलाच नाही अनेकांना हातोहात बनवले तिनें. कुणालाही संशय येऊ न देता जाता यावं म्हणून काय नामी युक्ती शोधून काढली तिनं. बोलताना, वागणुकीत किती साधी आणि सरळ वाटायची.
आता कुठं शोध घ्यायचा? घाई करून उपयोग नाही.सकाळपर्यंत वाट पाहून मग जळगावशी संपर्क साधायला हवा. त्याकरता प्रत्यक्षच तेथे जाणं योग्य. पण तोपर्यंत ह्याबद्दल मौनच पाळलेलं बरं. देशपांड्यांच्या बरोबर फोन करायला गेलो हे चुकलंच. फोनवर मीच बोलत होतो, पण माझ्या बोलण्यावरून त्यांना अंदाज आला असणार की सुलभा काकड्यांकडे गेलेली नाही. सगळं उघड झालं तर लोक म्हणणार आपणच बुद्दू आहोत, मूर्ख आहोत. आणि खरंच मला वाटत होतं, एवढा कसा मी महामूर्ख! एवढा कसा भोळसट! माझी मलाच लाज वाटायला लागली. माझी बायको शेजाऱ्यापाजार्यांनाच नव्हे तर आपल्या नवऱ्यालाही इतके दिवस..इतके महिने फसवत होती असं साऱ्यांना माहीत झालं तर किती नाचक्कीची बाब. ह्या लोकांना मी कसं तोंड दाखवू? मी ताडकन् उठलो. आतला दिवा तसाच चालू ठेवला, घाईघाईनं दरवाजा बंद करून मी चोरासारखा तेथून निघून गेलो. कुठं जाणार? काय करणार? पारतंत्र्याचे दिवस होते ते. रात्री-बेरात्री फिरताना पाहिलं तर सरळ पोलीसस्टेशनवरच घेऊन जायचे. तरीही दहा, साडेदहापर्यंत मी गावाच्या बाहेर निघून मंदिराजवळ बसून राहिलो. साडेदहाला मी बसस्टॅंंडला पोचलो. वाटलं, आतात आली तर घरी जायच्या अगोदरच सोक्षमोक्ष लावायचा. ती काहीतरी थाप मारायचा प्रयत्न करेल. डॉक्टरांकडे जायला उशीर झाला म्हणेल. तिला कल्पनाही येणार नाही की मी काकड्यांना फोन केला असेल. मग बिंग फुटलं म्हणून ती घाबरेल, रडायला लागेल, माझ्या पायांवर अंग झोकून देईल, माझं चुकलं, माझी चूक पदरात घ्या म्हणेल. पण ती त्या बसलादेखील आली नाही.
माझे हातपायच गळाले. माझं डोकं गरगरायला लागलं. वेड्यासारखा मी स्टेशनवर जाऊन एका बाजूला अंधारात बसून राहिलो. मला माझ्याच घरी जायची भिती वाटू लागली. शेजारपाजार्यांना मी काय सांगणार? ती कुठं जात असेल? ती आठवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे कुणी पुरुषमाणूस येतो वरचेवर? कुणाशी तिचा संबंध असेल? माझ्या स्मृतीला मी खूप ताण देण्याचा प्रयत्न केला. पण असा कुणी माणूस मला आठवेना. एक वयस्क, म्हातारासा माणूस दोन-तीन वेळा तिच्याकडे आला होता. ती त्याला रामूकाका म्हणायची. रामभाऊ कुलकर्णी. पण तो यायचा कधीमधी गावात त्याच्या मुलीला भेटायला तिच्या सासरी. तेव्हा यायचा तास-दोन तास, हिच्या वडलांची ओळख सांगून. जळगावच्या, नातवांच्या, इकडच्या तिकडच्या फालतू गप्पा मारत बसायचा. मी बसलेलो असायचो जवळच. पण मला त्या बडबडीत रस नसायचा. पण कोण असणार तिचा यार? विचार करकरून माझं डोकं गरगरायला लागलं. वाटलं, आता ती माझ्यासमोर आली तर डाव्या हाताने तिच्या झिंज्या धरेन, आणि लाथाबुक्क्यांनी असं बडवून काढेन की, लोळागोळा करून टाकेन. मग एकदम माझ्या मनात आलं, आपण मूर्ख आहोत, जर प्रकरण दोन-तीन वर्षांपासून चालू असेल तर नक्कीच घरामध्ये काहीतरी सुगावा लागेल. कुठंतरी पत्रं, चिठ्याचपाट्या, फोटो... नक्कीच काहीतरी सापडेल. मी घराजवळ आलो तेव्हा रात्रीचे साडेबारा झाले होते. आजुबाजूला कुणालाच चाहूल लागू नये अशी काळजी घेत मी माझ्याच घरापाशी चोरासारखा आलो, हळूच दरवाजा उघडून मी आत शिरलो. आतून दरवाजा लावून घेतला आणि मी तिच्या खोलीत गेलो. तिची खोली म्हणजे आमची बेडरुम. प्रथम तिची बॅग खाली घेतली, कपाटावरून. बॅग गच्च भरली होती सामानानं. दाबून दाबून बसवलं होतं सर्व सामान. झाकण उघडताच कपडे बाहेर आले सर्व. तिच्याकडे दोन तीन बॅगा होत्या. ह्याच बॅगेत सर्व का कोंबून ठेवलयं? मी सामान बाहेर काढत गेलो तेवढ्यात माझं कॉटखाली लक्ष गेलं, अरेच्या, इथं ही बॅग अनोळखी दिसत्येय. मी घाईघाईत ती बॅग पुढे खेचली. ही बॅग पुस्तकांनी, वह्यांनी भरलेली होती. शाळेची पुस्तके, पेन्सिली आणि काय..काय! विविध प्रकारचा कचरा. मी बॅग उलटी केली, कुठं पत्र सापडतात का पाहू लागलो. पहाटे चारपर्यंत मी माजघरातून, स्वैपांकघरातून, जिन्यावरून आणि वरच्या माळ्यावरून बॅगा, पिशव्या शोधत होतो. त्याच्यात काय आहे, तपासत होतो. सामान उचकून बाहेर फेकत होतो. पहाटे चारच्या सुमारास मला गुंगी आली. मी दिवाणखान्यातच सामानाच्या ढिगाऱ्यात आडवा झालो.
कोणीतरी मला हाका देत होतं, दारावर जोरदार ठोकत होतं. मी जागा झालो, भोवताली पाहिलं, कपडे, पुस्तकं, कागद, फायली, रिकाम्या बाटल्या, डबे.. या पसाऱ्यात मी झोपलो होतो. मी इथं कसा आलो? मग माझ्या लक्षात आलं हे माझंच घर आहे. कुणीतरी माझ्या नावानं हाका मारत आहे. मी उठलो, धडपडत दरवाजाजवळ आलो, दरवाजा उघडला, आणि मी दचकून दोन पावलं मागं सरकलो. दारात भरगच्च मिशांचा गलेलठ्ठ फौजदार उभा होता, त्याच्यामागे काही हत्यारी पोलीस आणि त्यांच्यामागे कॉलनीतील स्त्रीपुरुषांचा घोळका. मी बाहेर आल्याबरोबर सर्वांनीच एक सामुहिक हुंकार सोडला.
फौजदारने माझ्याकडे नीट लक्षपूर्वक पाहिलं, मग हातातील काठीचा माझ्या खांद्याला स्पर्श करीत तो म्हणाला, '' मिस्टर जोशी, यू आर अंडर ऍरेस्ट. पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. हवालदार, तुम्ही दोन माणसांबरोबर आत या.'' आणि मग लोकांच्या गर्दीकडे वळत तो म्हणाला, ''सगळे आपापल्या घरी जा. कुणाची गरज लागली तर मी बोलावून घेईन तुम्हाला. आणि तुम्ही आत चला''
माझ्या अंगाला कंप सुटला होता, घामाघूम झालो होतो मी. हे काय झंझट आहे? मला एकदम शंका आली. मी फौजदारला विचारलं, ''साहेब, तिला..माझ्या बायकोला काही झालंय का? ती सुखरूप आहे ना? तिनं जीवाला काही वेडंवाकडं केलं नाही ना?'' बोलताना माझा कापणारा आवाज, लटलटणारं शरीर, फौजदारला माझी करुणा आली असावी. त्यानं मला खुर्चीवर बसवलं. पोलिसाला सांगून आतून पाणी मागवून मला दिलं. तो मात्र बसला नाही. माझ्यासमोर हातातील दंडा आपल्या मांडीवर आपटत त्यानं मला प्रश्न विचारायला सुरुवात केली, ''मिस्टर जोशी, तुमच्या बायकोच्या जीवाला काहीतरी झालं असावं असं तुम्हाला का वाटलं? कुठं गेलीय ती?''
''ती कुठं गेलीय मला माहीत नाही. खरंच माहीत नाही. म्हणूनच मला तिची चिंता वाटत होती. ती डॉक्टरांकडे गेली नाही हे मला माहीत आहे. पण कुठं गेली माहीत नाही.''
''मिस्टर जोशी, उगीच बनवाबनवी करू नका. जे काय सत्य आहे ते सांगितलं तर तुम्हालाच सोयीचं जाईल. नाहीतर देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली सर्व आयुष्य काढावं लागेल अंदमानात. तुम्ही सरकारी नोकर आहात हे लक्षात ठेवा. सरळ काय आहे तसा जबाब द्या. आपली बायको कुठं गेली हे तुम्हाला माहीत नाही, ह्यावर कोण विश्वास ठेवेल? बोला. ''
मग मात्र मी चांगलाच घाबरलो. माझं डोकं गरगरू लागलं. सगळाच गोधळ उडाला. मनात प्रश्नांचं वादळ घोंघावू लागलं. सुलभा कुठे आहे? तिचं काय झालंय? ती काय करत होती? माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. तोंडातून नीट शब्दही बाहेर पडत नव्हते. मी काय बोलत होतो, मलाच समजत नव्हतं. दोन्ही हात जोडून मी साहेबाला सांगत होतो,'' मला खरंच माहीत नाही. काही माहीत नाही. मी आलो तेव्हा ती गेलेली होती. मी ड्यूटीवर गेल्यावर ती अशी जाते असं आजचं कळलं मला. ती डॉ.काकड्याकडं नाही असं फोनवर कळलं. खरं सांगतो साहेब, मी काहीही केलेलं नाही. मला काही माहीत नाही. अहो प्रामाणिक सरकारी नोकर आहे मी.'' बोलता बोलता मी उठून उभा झालो. माझी अवस्था पाहून फौजदारला बहुधा कळलं असावं, मी खरंच भेदरलोय, घाबरलोय, त्यानं माझ्या खांद्याला धरून खुर्चीत बसवलं.
'' बसा तुम्ही. जरा मनाला आवरा आपल्या. सत्य काय आहे ते नीट सांगा. तुमचा काही गुन्हा नसेल तर घाबरायचं कारण काय तुम्हाला? बोला, तुमची बायको कुठं गेली? केव्हा गेली? तुम्हाला सांगून गेली नसेल पण तुम्हाला काही अंदाज तरी असेल ना?''
'' माझी बायको कुठं गेली हे मीच शोधण्याचा प्रयत्न करतोय साहेब. ती माझ्या पश्चात कुठंतरी, कोणाकडे तरी जाते, हे आजच मला माहीत झालं साहेब. तेही देशपांडेबाईनी सांगितल्यामुळे. मी आलो तेव्हा घर बंद होतं. असं कधी झालं नव्हतं. ती नेहमी माझी वाट पाहात असायची. ती साधी आहे हो. घाबरट आहे. मी ओळखतो तिला. अहो गाडीच्या प्रवासाची भिती वाटायची तिला. मी...''
मला मध्येच थांबावं लागलं, आतून एक पोलीस बाहेर आला. त्यानं फौजदारसाहेबांना खूण केली आणि आत यायला सांगितलं. आणि माझ्या लक्षात आलं, आतून सामानाची फेकाफेक केल्याचे आवाज येत आहेत. ते माझ्या घराची तपासणी करत आहेत. ते काहीतरी शोधत आहेत? कदाचित तेही माझ्याप्रमाणेच पत्रांचा शोध घेत असतील! तिच्या याराचा फोटो शोधत असतील! पण मग सुलभा कुठंय? तिला काय झालंय?
फौजदार आतून बाहेर आला. त्याचा नूर एकदम बदललेला होता. मी घाबरून उभा राहिलो. आल्या आल्या त्यानं माझी कॉलर पकडली, झटका देवून त्यानं मला गदगदा हलवलं, दुसऱ्या हातानं त्यानं माझ्या खांद्यावर, दंडांवर, कमेरवर हातातील काठीनं प्रहार करायला सुरुवात केली. एकीकडे तो मला शिव्या घालत होता, परत परत तेच तेच प्रश्न विचारत होता, माझे कुणाशी संबंध आहेत? पुण्यातल्या कुणाला मी ओळखतो? कोणाच्या टोळीत सामील आहे मी? सुलभाला मी कोणत्या कामगिरीवर पाठवलं होतं? मी आता कुठं जाणार होतो? तो प्रश्न विचारत होता, प्रत्येक प्रश्नाबरोबर माझ्या अंगावर प्रहार करत होता. मी ओरडत होतो, मला माहीत नाही असं कळवळून सांगत होतो. आत मी उस्तरून ठेवलेल्या सामानामुळे, मी पुरावे नष्ट करून कुठंतरी पळून जाण्याची तयारी करत होतो असं त्याला वाटलं होतं.
भीतीनं आणि मारानं माझी शुद्ध गेल्यासारखं झाल्यावरच तो थांबला.त्या स्थितीतच त्यानं मला खुर्चीत ढकललं आणि त्यानं पोलीसाला देशपांडेबाईना बोलवायला सांगितलं आणि दुसऱ्या पोलीसला मला आत घेऊन जायला सांगितलं. मला आधार देवून, जवळ जवळ उचलूनच मला आत नेण्यात आलं. भिंतीशी जमीनीवर बसवण्यात आलं. माझी अवस्था तेव्हा काय होती, ते सांगणं फार कठीण आहे. माझ्या मनाचा नुसता भडका उडाला होता. अंग वेदनांनी ठणकत होतं. मी सुलभाला शिव्या घालत होतो. तिनं माझी फसवणूक तर केलीच होती, पण माझ्यावर संकटही आणलं होतं. तिचं काय झालं असेल ते असो, पण माझं भविष्य आता चांगलं नाही हे मला स्पष्ट झालं होतं. माझ्या डोळ्यासमोर नुसती प्रश्नचिन्हंच नाचत होती. एकामागे अनेक.. एकापेक्षा एक मोठ्या आकाराची, असंख्य प्रश्नचिन्हं, अणकुचीदार भाल्याची टोकं माझ्या शरीरात चोहोबाजूंनी टोचत होती, खुपसली जात होती. पण तरीही बाहेरचा संवाद अधूनमधून माझ्या मेंदूपर्यंत पोचत होता. फौजदारसाहेब देशपांडेबाइर्शी इतक्या शांत व समजूतदारपणे बोलत होता की माझा विश्वासच बसत नव्हता. देशपांडेबाइर्नी मला खरोखरच सुलभा कुठे ते माहीत नसल्याचे सांगितलं, ती न आल्यामुळे मी कसा चिंता करत होतो ते सांगितलं, परंतु कॉलनीतील सर्व स्त्रीपुरुषांची सुलभा डॉक्टरांकडे जात असे अशी कल्पना असल्याचे सांगितल्यावर मात्र फौजदारने त्यांना विचारलं होतं, ''सुलभा डाके घालणाऱ्या, लुटमार करणाऱ्या, सरकारी अधिकाऱ्याचे खून करणाऱ्या देशद्रोही टोळीची सदस्य आहे. तुम्हाला खरोखरच असं वाटतं का, हे सर्व आपल्या नवऱ्यापासून लपवून, नवऱ्याची अनूमती नसताना तिला करता येणं शक्य आहे?''
ह्या प्रश्नानंतर अर्थातच देशपांडेबाई गप्प झाल्या होत्या. ते साहजिकच होतं. सुलभा अशा प्रकारच्या काही कार्यामध्ये होती आणि ती मला संपुर्णपणे अंधारात ठेवू शकली होती ह्यावर कुणाचा विश्वास बसणार होता? माझा स्वत:चाच त्यावर विश्वास बसत नव्हता. फौजदारचं बोलणं ऐकूनही मला वाटत होतं, ह्यात काहीतरी गोंधळ झाला आहे, काहीतरी गैरसमज झालाय. अशी कुणीतरी क्रांतिकारक गाटची सभासद असलेली सुलभा असेलच तर ती वेगळी सुलभा असावी. माझी पत्नी इतक्या शिताफीनं, इतक्या हुशारीनं, इतकी वर्षे मला फसवणं शक्यच नाहीये. सुलभाची काहीतरी भानगड असू शकेल. कदाचित...कदाचित.. माझ्याकडून तिला मूल होणार नाही अशी खात्री झाल्यामुळे तिने कुणा परपुरुषाशी...कुणा साधूसंताशी.. अशा गोष्टी होतात. तसं काहीतरी झालं असेल.. हे क्रांतिकारक टोपण नावं घेऊन वावरतात, कादचित कुणातरी दुसऱ्याच स्त्रीनं सुलभा असं नाव घेतलं नसेल ना? मला त्यावेळी एकामागोमाग बसलेल्या धक्क्यांनी माझं डोकं ताळ्यावर राहिलं नसावं. कदाचित आयुष्यात प्रथमच मला इतकी मारहाण करण्यात आली होती, माझी मानहानी करण्यात आली होती, त्याचाही परिणाम असेल, मी धड विचार करू शकत नसेन. देशपांडेबाईंना परत पाठवल्यावर साहेब आता फौजदारसाहेब आत आले तेव्हा मी त्यांना दुसरीच कुणी बाई सुलभा नाव घेऊन काम करत असल्याची शक्यता असेल असं सांगून माझी पत्नी सुलभा एक साधीसुधी, घाबरट, काहीशी मूर्ख बाई आहे आणि साध्यासाध्या गोष्टीही तिला लपवता येत नसत, मी काही एवढा मूर्ख नाही, जिच्यासोबत मी सात वर्षे काढली तिला मी समजू शकत नाही असं शक्यच नाही, हे साहेबांना पटवण्याचा प्रयत्न करत होतो. देशपांडेबाईंचे बोलणं ऐकल्यापासून साहेब जरा शांत झाले होते. त्यांनी माझ्याशी काहीही चर्चा केली नाही. मात्र ताबडतोब पोलिसांना सांगून माझी उचलबांगडी केली, गाडीत टाकलं, आणि मला पोलीसस्टेशनच्या कोठडीत टाकलं.
त्यानंतर सात-आठ दिवसांचा काळ अत्यंत यातनादायक काळ होता. त्या संध्याकाळी मला श्रीरामपूरपासून चार मैलांवर असलेल्या एका रेल्वेपुलाशी नेण्यात आलं. पुलाच्या खालच्या बाजूला कापडाखाली झाकलेले दोन देह होते. त्यातील एक देह सुलभाचा होता. अंगावरील कपडा काहीसा दूर केला तेव्हा मला प्रथम दिसला तिचा चेहरा. शांत, जणू आत्ताच झोपल्यासारखी. ओठ किंचित उघडे. ती हसत होती. होय अजूनही तो चेहरा मी विसरू शकलेलो नाही. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. जणू ती मला म्हणत होती, ''फसलास ना? फसवू शकले ना तूला?'' त्यानंतर क्षणभरच तिच्या शरीरावरील कपडा दूर करण्यात आला होता, आणि तिचा छिन्नविछिन्न देह पाहून शिसारी येऊन मी मागे सरकलो होतो. दुसरा देह एका पुरुषाचा होता, उतार वयाचा गृहस्थ...त्याच्या चेहऱ्याचा काही भाग जळालेला होता, कानाच्या वरचा काही भाग नाहीसा झाला होता. त्याला पाहून आमच्याकडे कधीमधी येणाऱ्या रामूकाकांची मला आठवण झाली होती. मला परत नगरच्या पोलीस स्टेशनला हलवण्यात आलं. परत प्रश्नांची सरबत्ती, परत मारहाण... परत प्रश्नं.. परत मार. मला काहीच माहीत नव्हतं आणि पोलीस वेगवेगळी नावं घेऊन मला विचारत होते. माझी बायको मला इतकं अंधारात ठेवू शकते ह्यावर कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. मला माहीत असून मी माहिती लपवत आहे असं त्यांना वाटत होतं. ते वेगवेगळ्या प्रकारे मला छळत होते. मार वाचवण्यासाठी मी काही खोट्या थापा त्यांना मारल्या. पण दुसऱ्या दिवशी मी त्यांना थापा मारल्याचं कळून आल्यावर तो अधिकारी अधिकच चिडून आला होता. आता कबूल करायला हवं, मला खरोखरच काही माहिती असती तर त्या यातनांपासून वाचण्यासाठी मी ती माहिती त्यांना सांगितलीही असती. दोन दिवसांनी मला परत श्रीरामपूरला नेण्यात आलं. सुलभाच्या देहाला अग्नी देण्यात आला. तिचे वडील व भाऊ तेव्हा तेथे हजर होते. आमची केवळ दृष्टिभेट झाली, पण त्यानंतर आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहण्यांचच टाळलं. त्यांचा भकास चेहरा मला पाहवला नाही. काय झालं? तो किती जणांचा गट होता? ह्यापूर्वीही रणगाडे घेऊन जाणाऱ्या मालगाड्या उडवण्याचे दोन प्रयत्न झाले होते, ते ह्याच गटाने केले होते का? संपूर्ण सत्य हकिकत मला कधीच समजली नाही. मला वाटतं पोलिसांनाही समजली नाही. रामुकाकांच्या घरी काहीही सापडलं नाही. माझ्या घरातही काही सापडलं नाही. रामुकाकांकडे त्यांचा एक बंगाली मित्र अधूनमधून यायचा अशी माहिती पोलिसांना मिळाली, पण त्याचाही काही पत्ता लागला नाही. पाच-सात महिने मी तुरुंगात सडत होतो. माझ्याकडे कुणी लक्ष देत नव्हते.त्याला कारणीभूत बाहेरचं वातावरण होतं. ते साल होतं शेहेचाळीसचं. भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कॉंग्रेसच्या, इतर पक्षांच्या, जातीजमातीच्या, संस्थानिकांच्या प्रतिनिधींशी ब्रिटीश सत्ताधारी बोलणी करत होते. काही काळातच स्वातंत्र्य दिलं जाणार हे स्पष्ट होतं. माझ्याकडून काही माहिती मिळणार नाही अशी बहुधा त्या अधिकाऱ्याची खात्री झाली होती. परंतू तरीही ते मला सोडायला तयार नव्हते. काही काळानं माझ्या शारीरिक यातना कमी झाल्या, मनाचा क्षोभ कमी झाला. स्वत:च्या भवितव्याविषयीची भितीही कमी झाली. मला अंदमानात पाठवलं जाणार नाही, किवा मृत्यूदंड होणार नाही असा विश्वास माझ्यात निर्माण झाला असावा. कदाचित तिथल्या दिनक्रमाची मला सवंय झाली असावी. शिवाय तुरुंगातील अधिकारी मला सन्मानाने वागवत होते, हेही कारण असावं. पण असं असलं तरी माझ्या मेंदूत एक प्रश्न सातत्याने घुमत राहिला होता. विजापूरला म्हणे एक बोलघुमट का गोलघुमट आहे. भिंतीकडे तोंड करून हळूच उच्चारलेला शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा परत...परत ऐकू येतो. माझ्या मेंदूच्या भिंतीवर आदळून एक प्रश्न माझ्या मनात परत परत येत होता, सुलभानं मला का व कसं अंधारात ठेवलं? ह्या प्रश्नांचे उत्तर मला माहीत नव्हते असं नाही. पण ती उत्तरं मान्य करणं मला अशक्य होतं. उत्तर होतं - मी सामान्य माणूस आहे. कुठल्या तत्त्वाकरता, कुठल्या गोष्टीकरता यातना, दु:ख सहन करण्याची कुवत माझ्यात नाही. त्यागाची तयारी नाही. थोडक्यात मी दुबळा आहे. भेकड आहे.. हे तिला माहीत होतं. म्हणूनच तिनं माझ्यापासून हे सर्व लपवून ठेवलं होतं. तिच्या माझ्यावर अविश्वास होता. हे त्या प्रश्नाचं उत्तर मला मान्य नव्हतं. पण दुसरं काही उत्तर मला सापडत नव्हतं.