शुक्रवार, २२ जुलै, २०११

कथा सहावी


कमलाताईंचे कृष्णविवर 
मोहिते पोस्टमन विद्यानगर हाऊसिंग सोसायटीत शिरला आणि आपली सायकल त्याने  सरळ सोसायटीच्या टोकाला, टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कमलाताई इंदुरकरांच्या बंगलीकडे वळवली. फाटकाबाहेर सायकल उभी करून त्याने सायकलला पाठीमागच्या कॅरियरला लावलेले भले मोठे पार्सल काढले. खरं तर अशा प्रकारचे मोठे पार्सल आणि ते व्हि.पी.पी.ने आलेले, अशावेळी ज्याचे पार्सल आले असेल त्याला पोस्टात येऊन पार्सलची डिलव्हरी घ्यायला सांगायचे ही नेहमीची पध्दत. शिवाय हे पार्सल कमलाताईंचे. म्हणजे बक्षिसी सोडाच, पाण्याचा ग्लासही विचारला जाण्याची शक्यता नाही. पोस्टमास्टरांनी त्याला पार्सल घेऊन जायला सांगितले तेव्हा त्याची तयारीच नव्हती खरं तर. परंतु पोस्टमास्टर तरुण होते आणि कमलाबाईचं नाही तर एकूणच वृद्धांबद्दल त्यांच्या मनात कळवळा होता. ते म्हणाले होते, ''अरे बाबा, कशाला बोलावतोस तिला इथे? बिचारी, लग्न न करता सर्व आयुष्य एकटी राहिली. पूर्वी तरी कॉलेज होते. आता तर पेन्शनीत. नेऊन दे तिला घरीच पार्सल.'' जवळच रेंगाळत असलेल्या जोशीनेही मग दुजोरा दिला होता, ''बरोबर आहे, इथं आली तर सर्वांनाच चाळीस मिनिटांचं लेक्चर ऐकावं लागेल सक्तीनं. ''
पोस्टमास्टर म्हणाले होते, ते खरं होतं. कमलाताई एकटया जगत होत्या. तशा त्या काही दिसायला कुरुप नव्हत्या. आणि कुरुप स्त्रियांची काय लग्नं होत नाहीत का? त्या काय संसार करत नाहीत का? पण कमलाताई हट्टाने विनालग्नाच्या राहिल्या होत्या. मोहितेला कुणीतरी सांगितलं होतं. पण असं असलं तरी मोहितेला त्यांच्या घरी जाणं जीवावर आले होते. म्हातारी अतिशय तोंडाळ आणि फटकळ. ह्या जगातील प्रत्येकजण जणू तिचा विद्यार्थीच आहे असा रीतीने वागते ती सर्वांशी. शिवाय खडूस आणि चंगूस! दिवाळीचे पोस्त मागायला सर्व पोस्टमन हिंडायचे, कॉलनीतील सर्वांकडे जायचे. त्या लहानशा खुरटया शहरातील प्राध्यापकांची ही कॉलनी. सर्वांकडे चांगले स्वागत व्हायचे पोस्टमन मंडळीचे, पोस्तही चांगले जमा व्हायचे. पण कमलाताईंच्या बंगल्याकडे जायचे कुणी नावही घेत नसे. कमलाताईंच्या बंगलीच्या कंपाऊंडचे फाटक उघडून मोहिते आत गेला. त्याची नजर आवतीभोवती फिरली. 'एक बाकी खरं आहे, अख्या सोसायटीत इतकी सुंदर बाग नाही. किती विविध प्रकारची झाडं! पण मग सतत ह्या झाडांच्या, फुलांच्या सहवासात असून ही म्हातारी एवढी खडूस कशी?' त्याने स्वत:लाच प्रश्न केला. एका फुलझाडांची फांदी बंगलीच्या दाराकडे जाणाऱ्या वाटेवर आडवी आली होती. लहान लहान, नाजूक पाकळया असलेल्या फुलांनी ती डवरलेली होती. क्षणभर मोहित्याला वाटलं, हा गोड सुवास ह्याच फुलांचाच का हे पहावं हुंगून. पण तो मोह आवरून फांदीला वळसा घालून तो दरवाजाशी पोचला. त्याने बेल दाबली आणि दार ताबडतोब उघडले गेले. कमलाताई हातात पैसे घेऊनच आल्या होत्या. त्याने पार्सल त्यांच्या हाती दिले. व्ही.पी.पी.चा कागद त्याने पुढे केला. कमलाताईंनी दिलेले पैसे त्याने मोजून घेतले. कमलाताईंना बहुधा पूर्वसूचना आली असणार, त्यांनी अगदी नेमकेच पैसे आणले होते. कमलाताईंची सही झालेला कागद हाती पडल्या बरोबर तो मागे वळला आणि लांब लांब ढांगा टाकत फाटक काळजीपूर्वक बंद करून सायकलवर टांग मारून तो सटकला.
कमलाताईंनी दरवाजा लावून घेतला. त्यांच्या बेडरूममधील टेबलावर त्यांनी पार्सल ठेवले. जवळच्याच फडताळात एका जागी कात्री, सुरी, डिंकाची बाटली एकूण नेहमी लागणारी सामानसामुग्री होती. कात्री घेऊन त्यांनी घाईघाईने पार्सल फोडले. आतापर्यंत त्यांनी कोणतही वस्तू अशी व्ही.पी.पार्सलने आणि केवळ जाहिरात वाचून मागवली नव्हती. त्यामुळे आसाममधील ह्या कुठल्यातरी कंपनीने दिलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेवून हा फ्लॉवर पॉट आपण मागवला हा मूर्खपणाच केला हे त्यांच्या लक्षात आले होते. परंतु आपण स्वत: होऊन केलेल्या मूर्खपणाची किंमत आपणच दिली पाहिजे हे मान्य करून त्यांनी व्ही.पी.पी.चे पैसे भरले होते. त्यांनी खोके उघडले, आत ब्राऊन पेपरमध्ये गुंडाळलेले बंडल त्यांनी उचलले, 'चांगलाच वजनदार पॉट दिसतोय हा. का आणखी काही कचरा भरून ठेवलाय कुणास ठाऊक?' त्यांनी ब्राऊन पेपर बाजूला केला आणि त्यांच्या तोंडून नकळत हर्षोद्गार बाहेर पडला. पॉटचा आकार, रंग, सर्वच रूप अगदी वेगळं, अन्युज्वल होतं. वरच्या तोंडाला रुंद, मध्ये कमी होत जाऊन तळाला परत रुंद. पण आकारापेक्षा लक्ष वेधून घेत होती, काळया रंगावर राखी रंगाने काढलेली नक्षी. कमलाताईंनी पात्रावर टिचकी मारून पाहिली. आवाज बद्दच आला. कुठल्यातरी वेगळयाच धातूचं बनवलेलं होतं ते पात्र. पण धातू कुठलाही असो, काळया धातूच्या त्या पृष्ठभागाला विलक्षण चमक होती. आणि त्या चमकदार पृष्ठभागावर काढलेली नक्षी अशी धूसर आणि अस्पष्ट होती की, निळया पाण्याच्या पृष्ठभागाखाली पसरलेल्या हलत्या वेलींचा भास व्हावा, किंवा दूरस्थ अवकाशातील पहाटे सूर्योदयाच्या वेळच्या अस्पष्ट चांदण्या दिसाव्यात. पण जरा निरखून पाहिलं की, लक्षात येत होतं, काही विशिष्ट, अत्यंत गुंतागुंतीचे आकार उपयोगात आणलेले होते ह्या नक्षीत. त्यामुळे हे आकार एकमेकांत मिसळत आहेत, नवनवीन आकार निर्माण होत आहेत असं वाटायचं निरखून पाहिल्यावर. पण ह्या आकारांच्या मांडणीत काही संगती नव्हती. कमलाताईंनीं त्या नक्षीत ही संगती शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची नजर त्या नक्षीवर खिळूनच राहिली. त्यांना भास झाला, आपली नजर त्या नक्षीत आत आत शिरत चाललीय, हरवत चाललीय. अन् एकाएकी त्यांच्या अंगावर शहारा उठला. भीतीची एक लहर त्यांच्या अंगावरून सरसरत गेली. घाईघाईने त्या पात्रावरील नजर त्यांनी सोडवून घेतली व त्या बाजूला सरकल्या. टेबलावर फ्लॉवर पॉट ठेवून त्या मागे सरकल्या.
आपल्या मनाची प्रतिक्रिया बघून त्यांना स्वत:लाच आश्चर्य वाटलं. त्या आपल्या कॉटवर जाऊन बसल्या. नकळत त्यांची नजर परत त्या पात्राकडे वळली. 'काय झालंय आपल्याला?' त्यांनी आपली नजर खिडकीबाहेर वळवली प्रयत्नपूर्वक. ही हुरहूर आणि ही भीती! किती विचित्र ही अस्वस्थता. पण मुळात आपण हा फ्लॉवर पॉट मागवलाच का? आयुष्यात कधी लहर आली म्हणून काही केलं नाही आपण! बेहिशेबीपणा आपल्याला माहीतच नाही. पण मग हा पॉट आपण का मागवला? त्याचं मन भूतकाळाकडे झेपावले, परेशचा चेहरा त्यांच्या नजरेसमोर तरळला...पण क्षणभरच. 'नाही' असं स्वत:लाच जोरात सांगून त्या झटक्यात उठल्या. भूतकाळाच्या आठवणीत त्यांना रमायचे नव्हते, त्या आठवणी रमण्यासारख्या नव्हत्याच. काही प्रश्नांना उत्तरं नसतात.
टेबलापाशी जाऊन त्यांनी ते पात्र उचलले, त्या पात्राकडे नजर न वळवता त्यांनी ते पात्र बाजूला असलेल्या पुस्तकांच्या दोन कपाटांच्या मधल्या रिकाम्या जागेत स्टूलावर ठेवले. येथे काहीसा अंधार होता. आपली नजर येथे पात्रावर सहज पोचणार नाही हे त्यांना माहीत होते. त्यामागे वळल्या. त्यांच्या लक्षात आलं, ही जी भीतीची भावना आपल्या मनात आकारली आहे, तिला घृणेचीही छटा आहे. 'मला वाटतं, माझं मन आज ताळयावर नाही.' त्यांनी ठरवलं, 'आज बागेमध्ये भरपूर काम करायचं. मागच्या बाजूला खताचा खड्डा उकरायचं किती दिवसापासून राह्यलयं. आज शरीराला थकवायचं, खूप..खूप. आणि दोन चार दिवस त्या पात्राकडे पाह्यचं देखील नाही. अधुनमधून आपली नजर जाईलच. पण सवयीनं त्या पात्राचे अनोखेपण नाहीसे होईल. त्या पात्राच्या अस्तित्वाची सवय झाली की मन अशी विचित्र प्रतिक्रिया देणार नाही.' त्या हसल्या, दाराशी गेल्या. मागे वळून त्यांनी त्या पात्राकडे नजर टाकली. ते अंधारात होते, त्याचा आकार स्पष्ट दिसत नव्हता. पण तरीही अंधारात अधुनमधून त्याचा गुळगुळीत पृष्ठभाग चमकत होता. चमचमते बिंदू. म्हणूनच आपल्याला मघा आकाशाचा भास झाला, आकाशाच्या पोकळीत चालल्यासारखे जाणवले. आणि मग कमलाताईंच्या लक्षात आलं, त्या पात्राच्या तोंडाला मोठा होत जाणारा भोवरा गरगरत आहे. हा भोवरा पारदर्शक होता, पण त्याचा बाहेरचा पृष्ठभाग गरगरत होता हे निश्चित. त्यांना भूतभोवरीची आठवण झाली. कॉलेजच्या त्या पिकनिकला गेल्या असताना त्या आणि परेश दोघेच जरा इतरांपासून बाजूला गेले होते. समोर पसरलेल्या विशाल जलाशयाकडे पाहात ते झाडाखाली विसावले होते. आणि मग पैलतीरावरून ती पाण्याच्या पृष्ठभागावर उतरली होती. पाण्यावरून सरकत, गरगरत येणारी भूतभोवरी त्यांच्या दिशेनं जमिनीकडे आली होती. तिचा गरगरण्याची गती इतकी तेज होती की, वाटेत येणारा धूळ, पालापाचोळा, झोपडयांवरील गवताच्या पेंढया, दोरीवरील कपडे गरगरत आकाशाच्या घुमटाला जाऊन पोचले होते, अतीवेगानं गरगरणारी ती भूतभोवरी अगदी संथपणे पाण्यावरून सरकत पुढे आली होती, आणि रमत गमत वर गेली होती, डोंगराच्या दिशेनं. भारावल्यासारखे ते दोघे पाहात राहिले होते. तो घोंघावणारा, वाढत जाणारा आवाज. विस्मय आणि भीती. एक अनामिक भावनेनं त्यांच्या अस्तित्वाचा ताबा घेतला होता. नकळत, थरथरत त्या परेशकडे सरकल्या होत्या. 'नाही, आपण दोघेही एकमेकाकडे सरकलो होतो. त्यानंतर दीड तासातच.'
'छे! आपल्याला हे विचित्र भास का होत आहेत आज?' त्यांना स्वत:चा संताप आला. 'व्हाय आय ऍम अलॉवींग धीस फुलीशनेस?' त्यांनी घुश्यातच चार पावले पुढे टाकली. ते पात्र त्यांच्या नजरेत आलं. 'काय मूर्ख आहोत आपण!' त्या कपाटापाशी पोचल्या. 'साधा फ्लॉवर पॉट हा, अडीचशे रुपये किंमतीचा. ही चमक काही काळातच उडेल.' नकळत त्यांचा हात त्या पॉटच्या तोंडाशी गेला आणि त्यांच्या तोंडून अस्फूट किंचाळीच बाहेर पडली. आपल्या हाताला झटकत त्या बाहेर पळाल्या. दाराबाहेर येऊन त्या उभ्या राहिल्या. आपल्या कपाळावर घामाचे थेंब उभे आहेत, आपला श्वासोश्वास जोरजोरात चाललाय, उर वेगाने वरखाली होतय हे त्यांच्या लक्षात आलं. 'नाही, हा भास नव्हता...आपला हात खरोखरच त्या पात्रात खेचला जात होता.. म्हणजे हात आत गेला नव्हता, पण..' त्या पायरीवर बसल्या. आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. 'त्या पात्रात काहीतरी वेगळेपणा आहे हे निश्चित. पण त्यात एवढं घाबरायचं काय कारण? आपल्याला ते पात्र आवडलं नसेल तर ते केव्हाही बाहेर फेकून देऊ शकतो आपण किंवा आपल्या बागेत मागच्या बाजूस ठेवून देऊ शकतो. पण त्याआधी आपला हात आत का खेचला गेला? ह्या प्रश्नाचं उत्तर काय? पण कित्येक प्रश्नाची उत्तरं कधीच मिळत नाहीत हे आपल्याला माहीत नाही का? धरमतरची खाडी पोहणारा परेश धरणाच्या शांत पाण्यात मजेत पोहता पोहता खाली गेला तो परत आलाच नाही. का? ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं का?' त्या झटक्यात उभ्या झाल्या, 'इतका जीवंत भास होऊ शकतो का? आपल्या मनावरील ताबा जात चाललाय का? वयामुळे आपलं मन भरकटायला लागलंय का?'
त्या आत आल्या. त्यांनी टेबलावर पडलेलं ताजं वर्तमानपत्र उचललं, कपाटाजवळ जाऊन त्यांनी पेपरची घडी त्या भांडयाच्या तोंडावर ठेवली. 'आता काही दिवस ह्या पात्राबद्दल विचारही करायवयाचा नाही. विसरून जाऊया हे पात्र येथे आहे म्हणून?' आणि त्यांचे डोळे विस्फारले, त्या पुढे झुकल्या, ' हा भास नाहीये..' कागदाच्या मध्यभागी खळगा पडला होता, कागद मध्यभागाला आत खेचला जात होता.. हळूहळू भोवतालचा कागदही चुरगळून, चोळामोळा होऊन आत सरकत होता. कागदाचा मध्यभाग आत दिसेनासा झाला. कुणीतरी.. काहीतरी त्या पेपरला आत खेचून घेत होते, गिळत होते. संथ पण निश्चित गतीने कागद आत खेचला जात होता. कमलाताई स्तंभित होऊन पहात राहिल्या. काही क्षणातच त्यांच्या नजरेसमोर तो पेपर आत नाहीसा झाला. त्यांनी सावधपणे भांडयाच्या तोंडातून आत डोकावून पाहिलं. पेपरचा मागमूसही नव्हता आतमध्ये. आत मध्ये होता अंधार.  त्यांना वाटलं ह्या पॉटला तळच नाही. खोल..खोल अंतहीन..एखाद्या खोल खोल विहीरीत आपण डोकावून पहातोय. छे! काही क्षणापूर्वी आपणच उचलून ठेवलं ना हा फ्लॉवर पॉट. दीड-दोन फूट उंचीचा. आत हात घातला तर सहज तळ लागेल आणि तळाला पेपरही असेल. त्यांनी हात पुढे केला, पण पॉटच्या तोंडाशी नेला नाही. त्यांनी आत नजर टाकली. बेसिनमध्ये पाणी भरल्यावर खालच्या भोकावरचे बूच काढून घेतल्यावर भोवऱ्यासारखे गरगर फिरत आत जाणाऱ्या पाण्याच्या केंद्राला असणाऱ्या विवरासारखे.. पात्राच्या तोंडाशी प्रकाश आहे, पण आत आत प्रकाश नाहीसा होत गेलाय. त्यानी टक लावून त्या पात्राकडे पाहिले. 'अं हं! तू मला बुद्दू बनवू शकत नाहीस. मी शास्त्राची प्राध्यापिका आहे. पदार्थ विज्ञान शिकलेली. अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीत सहभागी झाले होते मी. जीवनात काही दुर्दैवी घटना घडतात योगायोगाने. पण त्यात कुणी दोषी नसतो, कुणी पांढऱ्या पायाचं नसतं. पाण्याच्या पृष्ठभागावर आरामात तरंगत असलेल्या परेशला पाणी किती खोल आहे हे पाहण्याची लहर यावी ह्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. कसा असणार?'
 त्या परत टेबलापाशी गेल्या. कुणातरी जुन्या विद्यार्थिनीने त्यांना आपल्या थिसीसची प्रत दिली होती. तो जाडजूड ग्रंथ त्यांनी उचलला. त्या पात्रापाशी पोचल्या. त्यांनी तो ग्रंथ पात्राच्या तोंडावर ठेवला. 'हं, आता गिळ तुझी कुवत असेल तर' त्या स्वत:शीच पुटपुटल्या. काहीक्षण त्या ग्रंथाकडे टक लावून पाहात राहिल्या. काहीही हालचाल नाही दिसली त्यांना. त्यांनी समाधानाने मान हलवली. 'ओके, समजली मला तुझी कुवत! मर्यादित क्षमता आहे तुझी. तू काय आहेस ह्याचा शोध घेईन मी यथावकाश. पण तोपर्यंत मात्र तू येथे दोन कपाटांच्या मधल्या जागेत राहिलास तरी काही बिघडत नाही. नाहीतरी बाहेर बागेमध्ये ह्याला ठेवणे रिस्कीच आहे.' मागच्या झोपडपट्टीतील तो उंचाडया पोरगा त्यांना अनेकदा दिसला होता कंपाऊंडच्या मागच्या बाजूस रेंगाळताना. त्याची शोधक नजर बागेतून आणि मागच्या भिंतीशी असलेल्या उघडया शेडमधील सामानावरून फिरताना त्यांनी पाह्यली होती. 'हे असे भांडे बाहेर ठेवणे म्हणजे त्याला चोरी करण्याला प्रवृत्त करण्यासारखेच आहे.' कागद फाटल्याचा आवाज आपल्या कानी पडतोय असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी थिसीसच्या ग्रंथाकडे पाहिलं. निश्चितच आवाज तेथूनच येत होता. त्यांची नजर त्या ग्रंथावर खिळून राहिली. त्यांच्या लक्षात आलं, ग्रंथाच्या खालच्या बाजूचं पुठ्ठयाचं कव्हर आत नाहीसं झालं आहे, आणि खालून एक एक पान नाहीसं होत आहे.. ग्रंथाची जाडी कमी कमी होत आहे. त्या पाहात राहिल्या. काही मिनिटातच थिसीसचा ग्रंथ आत नाहीसा झाला. 'बरं झालं. कटकट गेली.' त्या थिसीसची तीन पानेही त्यांच्याकडून वाचली गेली नव्हती. 'नाहीतरी  शमा कुलकर्णी गाईड असल्यावर, ही बया काय लिहिणार होती! ' त्यांनी परत त्या पात्रात डोकावून पाहिलं. त्यांना भासलं की तो भोवरा आता अधिकच विस्तारलाय. अधिक गतीने गरगरतोय. 'तू किती खादाड आहेस, बघते मी.' त्या मागे वळल्या. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. गादीवरील उशी त्यांनी उचलली आणि पात्राच्या तोंडावर ठेवून दिली. जरा मागे सरकून त्या टेबलाजवळील खूर्चीवर बसल्या. कपडा फाटल्याचा आवाज आला. कापूस आत खेचला जाऊ लागला. एवढी जाडजूड उशी पण तिलाही मध्यभागी खड्डा पडला. कमलाताई टक लावून पाहात राहिल्या. उशी नाहीशी झाली.
कमलाताई काहीशा गोंधळल्या होत्या, पण त्यापेक्षाही संतापल्या होत्या. तसं पाहिलं तर कमलाताई खडूस बोलत असतील. त्यांच्या बोलण्यातून सातत्याने एक प्रकारचे असमाधान, एक चीड जाणवत असेल. पण त्या संतापत मात्र क्वचितच. कॉलेज सोडल्यापासून चिडल्याचे त्यांना आठवत नव्हते. बराच काळ त्या त्या फ्लॉवर पॉटकड़े पाहात राहिल्या. मग मनाशी काहीतरी निश्चय करून उठून त्या आतमध्ये गेल्या. त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते आणि हातात एक होता जाडजूड लोखंडी तवा. त्यांनी तो तवा पॉटच्या वरच्या तोंडावर ठेवला आणि त्या बाहेर गार्डनमध्ये आल्या. आता त्यांना खात्री होती की त्या जेव्हा परत आत जातील तेव्हा तो तवा तसाच तेथे असेल. त्या घराच्या मागच्या बाजूस अंगणाच्या कोपऱ्यात पोचल्या. त्यांनी फावडे उचलले. खताच्या खड्डयातील शेणकचऱ्याला झाकायला वर पसरलेला मातीचा थर त्यांनी भराभरा उपसून बाजूला खेचला. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. छातीचा भाता जोरजोरात चालू लागला. 'श्रम करण्याची आपली सवय फारच कमी झालीय, हे चांगलं नाही.' निश्चितच त्या थकल्या होत्या. पण तरीही त्यांनी खड्डयातील खत उपसून काढून पाटीत भरून पलीकडील क्वारीत टाकायला सुरुवात केली.
आपण खूप वेळ काम करत आहोत ह्याची त्यांना एकाएकी जाणिव झाली. त्यांनी फावडे बाजूला टाकले. त्या घराकडे निघाल्या. त्यांना जाणवले, आपली कमर, पाय, खांदे, सर्वच अवयव दुखत आहेत. पण त्याचबरोबर आपले मन स्वच्छ झालेय, मनावरील सावट पार साफ झालयं. शरीर थकले म्हणजे भूतकाळाच्या सावल्या नाहीशा होतात. त्यांनी आकाशाकडे नजर टाकली. सूर्य पश्चिमेकडे झुकला होता, क्षितीजावरील एका अवाढव्य  ढगामागे गेला होता. त्यांनी सभोवताली नजर टाकली. कॉलनीतील घरांची सुस्ती अजून उतरली नव्हती. मग त्यांना त्या पॉटची आणि तव्याची आठवण झाली. त्या स्वत:शीच हसल्या. म्हातारपणी असं होणारचं. भ्रमिष्टपणाचा झटकाच म्हणायचा हा. त्या दारातून आत आल्या. बेडरूमकडे न वळता त्या स्वैपाकघराकडे वळल्या. पण मग परत वळून त्या बेडरूमकडे वळल्या. त्यांना माहीत होते, ती उशी येथेच कुठेतरी पडली असणार! तो तवा पॉटच्या तोंडावर दिमाखाने बसलेला असणार. त्या सरळ कपाटाकडे वळल्या आणि त्यांची पावलं अडखळली, आ वासून पाहात राहिल्या. तो तवा तर तेथे नव्हताच पण तो फ्लॉवर पॉटही तेथे नव्हता. 'ह्याचा अर्थ काय? हे सगळे एक स्वप्नच का? भासच का? पोस्टमन आलाच नव्हता का?' त्या पुढे सरकल्या. ते पात्र तेथे नाहीये. 'पण तेथे काहीतरी आहे... नक्कीच तेथे काहीतरी आहे.'
त्या जवळ सरकल्या, डोळे बारीक करून आपली मान वाकडी करून वेगवेगळया कोनातून त्यांनी तिकडे पाहिलं. त्यांना जाणवलं..एक धूसर निळसर, काळसर आकार जमीनीपासून काही अंतरावर हवेत तरंगत होता. गरगरत होता. त्याच्या वरच्या कडा कपाटाच्या जवळ पोचल्या होत्या. तव्याचा, त्या चमकदार धातूच्या फ्लॉवर पॉटचा मात्र काहीच मागमूस नव्हता.
काही क्षण त्या सुन्न उभ्या राहिल्या आणि मग सावधपणे, सावकाश एक एक पाऊल टाकीत त्या टेबलाजवळ गेल्या. वरच्या शेल्फमध्ये ठेवलेली सायन्स डिक्शनरी त्यांनी खाली घेतली. भराभर पाने उलटत त्यांनी त्यांना हवा तो शब्द शोधला. 'ब्लॅक होल.. कृष्ण विवर.. ही एक शास्त्रिय संकल्पना आहे. कुणालाही प्रत्यक्षात कृष्णविवर असल्याचा पुरावा सापडलेला नाही. अनुमानसिध्द पुरावे आहेत. कृष्ण विवर म्हणजे एक असे क्षेत्र की जेथे गुरुत्वाकर्षणशक्ती एवढी प्रचंड असेल की ज्यातून पदार्थ तर सोडाच पण प्रकाशही बाहेर  पडू शकणार नाही. त्यामुळे कृष्णविवर दिसणे म्हणजे त्याची व्याख्याच खोटी असल्याचा पुरावा होऊ शकेल.'
कमलाताईंच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. 'होय, ही व्याख्याच चूकीची आहे. पाहा ना, हे माझं कृष्ण विवर चक्क दिसतंय. आणि हे इथं आहे अस्तित्वात. कुणी नाकारू नाही शकणार हे. आता व्याख्या बदला तुमच्या.' त्या मोकळेपणी हसल्या. 'हॅलीचा कॉमेट तसं हे कमलाताईंचं कृष्ण विवर. नाही, कमलाताईंचं कृष्णविवर नाही, कृष्ण विवराचं नावचं कमला. पण कृष्ण विवर म्हणजे ते विवर. कमला नाव कसं चालेल त्याला. नाही. हे विवर नाही. ही तर भोवरी. भूत भोवरी. कमला भूतभोवरी...
खुर्चीवर बसून त्या कितीतरी वेळ त्या दोन कपाटांमधील अंधाऱ्या पोकळीकडे पाहात राहिल्या. मग त्या उठल्या, त्यांनी जवळची खूर्ची उचलली, हात वर उचलून आपल्या खांद्याच्या पातळीवर खूर्ची धरून त्या हळूहळू पुढे सरकल्या. त्यांना ती भोवरी ह्या कोनातून दिसत नव्हती. पण सावधपणे एक एक पाऊल टाकत त्या पुढे सरकल्या. कपाटापासून काही अंतरावर जाऊन त्यांनी हलकेच ती खुर्ची दोन कपाटामधील पोकळीत जमिनीकडे न्यायला सुरुवात केली. कृष्णभोवरीने खुर्चीचा एक पाय धरला आहे आणि खुर्ची खाली खेचली जात आहे, हे त्यांना जाणवल्याबरोबर त्यांनी खुर्ची सोडून दिली. खुर्ची जमिनीपासून काही फुटांवर हवेत तरंगत राहिली काही वेळ मग स्वत:भोवती गिरक्या मारत वाकडी तिकडी होऊन फिरली, कड् कड् आवाज करीत तिचा एक पाय सांध्यापासून वेगळा झाला, खाली सरकत नाहीसा झाला. मंत्रमुग्ध झाल्यासारख्या कमलाताई खाली सरकत हळूहळू नाहिशा होणाऱ्या खुर्चीकडे पाहात राहिल्या. काही शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे, कृष्णविवराला दुसरं तोंड असणार, एका वेगळयाच परिमितीच्या विश्वात. कमलाताई मागे वळल्या. त्यांनी घाईघाईने पलंगावरील गादी चादरीसह गोळा केली आणि अंगातील शक्ती एकवटून त्यांनी ती गादी सर्वभक्षकाकडे फेकली. काही क्षणातच गादी नाहीशी झाली. तावातावाने कमलाताईंनी कपाट उघडले. अनेक वर्षापासून जमवलेले, नेहमी रेफरन्ससाठी लागणारे मोठमोठे ग्रंथ त्यांनी खाली खेचले, कपाटातील इतरही वस्तू त्यांनी खाली खेचल्या आणि खाली जमा झालेल्या त्या वस्तूंच्या ढिगातून त्यांनी एक एक पुस्तक दोन कपाटाच्या मधल्या पोकळीच्या दिशेने फेकायला सुरुवात केली. पुस्तके संपल्यावर त्यांनी खोलीतील इतरही वस्तू फेकायला सुरुवात केली. एक वस्तू नाहीशी झाली की दुसरी..ती नाहीशी झाली की तिसरी. त्यांच्या लक्षात आलं, बेडरूममधील सहजतेने हलवत्या येणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी आपल्या भूतभोवरीला अर्पण केल्या आहेत. आता काय राहिलं ह्याचा शोध घेत त्यांची नजर भोवताली फिरली. आणि त्यांना लाकूड तुटत असल्याचा आवाज ऐकू आला. एका कपाटाची एक बाजू कपाटापासून उचकटली गेली होती. फळया तुटून कपाटापासून खेचल्या गेल्या आणि काही क्षणातच नाहिशा झाल्या. कपाटातील आतील वस्तू एक एक करीत खेचल्या जात होत्या, नाहीशा होत होत्या. 'आपली भोवरी झपाटयाने वाढत आहे. आकारानं आणि ताकदीनंही. बाई अशी वाढू नकोस, मातू नकोस.' त्या पुटपुटल्या आणि तिकडे पाहत राहिल्या. दुसऱ्या बाजूचं कपाटही नाहीसं झालं. मग जवळचं टेबल हळुहळू खेचले जाऊ लागले. टेबलाचे तुकडे होऊन ते नाहीसे होत असतानाच लोखंडी कॉटही पुढे सरकू लागली.
दाराशी उभ्या राहून त्या पाहात होत्या. खोलीतील सर्व सामान आता संपले होते. रिकाम्या भिंतीवर लटकत असलेली दोन कॅलेन्डर्सही तरंगत तरंगत भोवरीच्या मुखाकडे गेली होती. त्या रिकाम्या भिंतीकडे पाहात होत्या. त्यांना वाटलं, पलिकडच्या खोलीतील सामानही आपल्या ह्या भोवरीला अर्पण केलं पाहिजे. आता अगदीच लहान नाही ही. लहानपणी संगोपनाची, पालनपोषणाची गरज असते. बाळाला काय खायला घालायचं, काय नाही, काळजी घ्यावी लागते. मुल मोठं झालं की, काहीही चालतं. त्या शेजारच्या खोलीच्या दाराशी गेल्या. दिवाणखान्यातील फर्निचरवरून, सामानावरून त्यांनी नजर टाकली. 'गेल्या चाळीस वर्षात एक एक करीत जमवलेला आपला हा वस्तूंचा संसार! ह्या वस्तू आपल्या मालकीच्या आहेत. पण ह्या निर्जीव वस्तू. त्या थोडंच आपलं नाव लावणार आहेत? एकाएकी त्यांना प्रचंड दमल्यासारखं वाटायला लागलं. दाराच्या चौकटीला पाठ टेकून त्या उभ्या ह्येत्या. पलिकडे त्यांना स्वैपाकघरातील वस्तूंही दिसत होत्या. ह्या वस्तू, ह्या खोल्या, हे घर.. ह्या माझ्या मालकीच्या आहेत. पण ह्या निर्जीव वस्तू माझ्या असण्याला काही अर्थ आहे का? पण ही भोवरी... कृष्णभोवरी. तिला माझं  माझं नाव चिकटलं आहे आता. कमला कृष्णभोवरी. आपलं अस्तित्व आता ह्या फालतू खुर्च्या टेबलांसारख्या वस्तूंवर निर्भर नाही. कृष्ण भोवरीच्या दुसऱ्या टोकाला, वेगळया परिमितीतील विश्व कसे असेल?
त्यांनी दीर्घ श्वास घेतला. त्या मागे वळल्या. बेडरूमच्या दरवाजातून त्या आत गेल्या. आपल्या कृष्णभोवरीच्या दिशेने त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली. मग त्यांना तिची ओढ जाणवली.. त्यांच्या शरीराला.. त्यांच्या मनाला ते आकर्षण जाणवलं, अन् त्यांनी स्वत:ला झोकून दिलं... त्याचं शरीर अलगद हवेत उचललं गेलं.. काही क्षण त्या जागीच हवेत तरंगत राहिल्या. त्यांना मनापासून हसू आलं. आयुष्यात कधीच असं हलकं, मोकळं मोकळं वाटलं नव्हतं. हळू हळू तरंगत त्या भोवरीच्या काठाला आल्या. त्यांनी आत डोकावून पाहिलं. अंतहीन अंधकार..

रविवार, ३ जुलै, २०११

कथा पाचवी


मला मूल दे


तुळशीराम पाटलांना आज उठायला जरा उशीरच झाला होता. रात्री पेडगावचे निंबाळकर पाटील जेवायला आले होते. तसं म्हटलं तर पेडगावचे जीवनराव स्वत:ला सरदार निंबाळकरांच्या नात्यातले म्हणून सांगत असले तरी तुळशीराम जाधव पाटलांना माहीत होतं, ह्या निंबाळकराचं फलटणच्या निंबाळकरांशी काहीही नातं नाही. पण असं असलं तरी पंचक्रोशीत तर जीवनराव निबाळकराला फार मान द्यायचे लोक. त्यामुळे रात्री तुळशीराम पाटलांनीही मैफल सजवली होती. 'साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा' सरपंच तुळशीराम जाधवांनी जीवनराव निंबाळकर पाटलांना सांगितले होते, अन् त्यावर जीवनराव निंबाळकर ह्या ह्या.. करून हंसले होते. जेवण झाल्यावर निंबाळकर नको सांगत असतानाही तुळशीराम जाधव पाटील त्यांना वाटेला लावायला गल्लीच्या टोकापर्यंत गेले होते. तेथे लखोबा लघवीला बसून परतत होता, तो भेटला होता. लखोबा चांभार नव्हता, पण त्याला चांभारचौकशा करण्याची सवय होती. मग पाटलांनीही त्याला निंबाळकर येऊन गेल्याची बातमी दिली होती. लखोबाला काही बातमी कळली की पाच सात तासात ती गावभर पसरत असे. आणि जीवनराव निंबाळकर आपल्या मांडीला मांडी लावून विस्की पितो ही बातमी गावात पसरल्यानें जाधव पाटलांना बरंच वाटणार होतं. लखोबाचा पिच्छा सोडवून घरी यायला व रात्री निजायला तुळशीराम पाटलांना फारच उशीर झाला होता.
जाग येऊनही पाटील तसेच पडून राहिले. त्यांना खरं तर अजून झोपायचं होतं, पण आनंदीबाईनी त्यांना उठवून दिलं होतं. उशीर झाला होता, तुळशीराम पाटील हातात पाण्याचं डब्बा घेऊन गावाबाहेर निघाले.
अजून सुर्यनारायण वर आला नव्हता. पण अंधार नव्हता. तुळशीराम पाटील घाईघाईनं गावाबाहेर निघाले. तरीही गणा कुंभारानं 'रामराम सरपंच' म्हणून जोहार घातलाच. रात्री उलीकसा पाऊस झाला होता, बांधीवरची माती ओली झाली होती. जपून पावले टाकीत चालत असताना तुळशीराम पाटलांची नजर ज्वारी वरून फिरत होती. आणि एकाएकी ते चमकले, शेतामध्ये काहीतरी चमकून गेलं.  ते थबकले. ते चमकणं नव्हतं, काहीतरी झगझगत होतं. क्षणभर त्यांना वाटलं रातच्या पावसानं शेतात पाणी साठलयं आणि पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब झगमगतंय. पण मग त्यांच्या लक्षात आलं, अजून सूर्यदेव तर वरतीही आलेला नाही. बांधीवरून खाली उतरण्यापूर्वी त्यांनी आसमंतात नजर टाकली. सर्व शांत होतं. कुणाचीही हालचाल नव्हती, चाहूल नव्हती. धोतर वर खेचत ते खाली उतरले. पोटरीला आलेल्या ज्वारीतून वाट काढत ते पुढे झाले. तो एक दगुड होता. नारळाच्या आकाराचा, पण असा झगमगत होता, सरपंचाचं डोळंच दिपलं. जणू तो दगुड नव्हताच, सुर्यच इथं पडला होता.  बापरे .. हे काय आहे लफडं? हा बाम्ब तर नव्हं? त्यांनी स्वत:लाच विचारले. बाम्ब उडाला तर मोठाल्या बिल्टींगाही कोसळतात हे त्यांना माहीत होतं.
'मी बांब नाही. मी देव आहे' एकाएकी आलेला घनगंभीर आवाज ऐकून ते जागीच वितभर उडाले. मग त्यांच्या लक्षात आले आवाज त्या दगडातून येत आहे. त्यांनी लगबगीनं हात जोडले आणि जिव्हणी रुंदावून ओठावर हास्य आणून त्यांनी डोकं किंचित खाली झुकवलं. ''रामराम देवा, काय बोला, काय काम काढलं?'' तुळशीराम जाधव पाटील सरपंचपदाच्या सवयीनूसार बोलले, अन् मग भानावर येत आपली दोन्ही गालफडं बडवत म्हणाले, ''नाही..नाही. चुकलं. देवाधिदेवा तूमी दर्शन दिलं, धन्य झालो''
तर तो दगड म्हणाला, ''तुळशीराम तु तसा चांगला माणूस होतास, पण गेल्या दहा वर्षापासून तू सरपंच झालायसं. पण ते जाऊ दे. मी तुझ्यावर लई.. म्हणजे लई प्रसन्न झालोय. माग, वर माग.''
तुळशीराम सरपंच गडबडूनच गेले. हे काय चालले आहे, हे खरं का स्वप्न हेच त्यांच्या लक्षात येत नव्हतं. रातची नशा अजून उतरली नाही असं त्यांना वाटत होतं. वर माग म्हटल्यावर त्यांनी वर पाहिलं, मग खाली पाहिलं, आता ते उजवीकडे पहाणार होतें, तर आवाज आला, ''अरे वत्सा, वर माग म्हणजे तुला काय पाहिजे ते माग, चल, लवकर माग. माझी दुसरीकडं अपाईंटमेंट आहे. चल लवकर. म्हणजे मी टूशन लावलीय हल्ली. प्रत्येक देवानं आता म्हणे लोकांची भाषा बोलायला हवी असा नियम केला नव्या बॉडीनं.'' 
तुळशीराम सरपंच पारच गडबडून गेले, त्यांना काही सुचेना, गडबडीनं म्हणाले, '' देवा, लग्नाला दीड वरस झालं, मला अजून मुल होत नाही. लोक काहीबाही बोलायला लागली आहेत. मला मुल दे''
दगड म्हणाला, ''तथास्तू'' आणि तो तेजानं झगमगणारा दगड नाहीसा झाला.
तुळशीराम सरपंच घरी आले. जे झालं ते खरं की खोटं? त्यांना काही समजत नव्हतं. त्यांनी मग आपल्या खास मित्राकडं लक्ष्मणकडं विषय काढला. लक्ष्मण बराच वेळ काही बोलला नाही, मग एकदम हलक्या आवाजात म्हणाला, ''सरपंच, मला वाटतं, तुम्ही अर्धवट झोपतं असावा, तुम्हाला सपन पडलं असावं.''
''नाही.. मला सपन पडलेलं नाही'' सरपंच एकदम त्याच्या अंगावर खेकसले. मग जाधव म्हणाला, '' पाटील हे खरं आहे का सपन, हे तर कळलचं की काही दिवसातच. पाटीलिणबाई पोटशी राहिली तर तुम्हाला देव खरंच भेटला होता असा वकिली पाईंट निघतो. आता कुणा बाईचं प्वॉट निघालं तर लपून राहातं काय? आपली ती भिका सुताराची रंगी, निंबाळकराच्या पोराशी..'' बोलता बोलता लक्ष्मणनं जीभ चावली, आणि तुळशीराम सरपंचही तेथून घाईघाईनं काढता पाय घेत म्हणाले, ''बरं, बरं. राहू दे आता ते''
त्यानंतर अडीच एक महिने सरले. पाटील सकाळीच शेताकडे निघाले. त्यांचा पूर्वीचा नूर सगळा उतरून गेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर तर चिंता दिसतचं होती, पण त्याचं शरीरसुध्दा थकल्यासारखं दिसत होतं. एक एक पाऊल टाकत ते शेताकडे निघाले. गेल्या पाच दिवसापासून ते रोज शेताकडे यायचे, शेतामध्ये भटकायचे, बांधावर बराच काळ बसून राह्यचे. त्यांना देवाला भेटायचं होतं. भेटायला पाहिजेच होतं. लई अर्जंट काम होतं. पण देवाचा तो दगड परत दिसेल असं काही त्यांना वाटत नव्हतं. आपल्याच विचारांच्या तंद्रीत ते बांधावर पोचले. आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं, तो दगड शेतात आहे आणि पूर्वीसारखाच तेजानं झळकत आहे. पाटील धावत पळत दगडापाशी पोचले, त्यानी नुसते हातच जोडले नाही, त्या मातीत, चिखलात त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, अगदी कळवळून ते म्हणाले, '' देवा.. हे काय केलं तुम्ही देवा. ही चुकीची आर्डर रद्द करा साहेब.. नाही देवा.. देवा.. हे केलं ना देवा, लई वंगाळ केलं. ''
'' काय वंगाळ केलं सरपंच. तुम्ही जे सांगितलं ते तुम्हाला दिलं. तुम्ही जे काही मागितलं असतं ते आम्ही दिलं असतं. तुम्ही सांगितलं असतं तर जिल्हा परिषदेचा अध्यक्षही केला असता. पण आता काय इलाज नाही.''
तुळशीराम पाटील एकदम नरम आले, त्यांच्या डोळयातून अश्रू वाहायला लागले. ''नाही देवा, असं म्हणू नका. आर्डर रद्द नाही होत तर तिला इस्टे तरी द्या''
दगड म्हणाला, ''त्ये आम्हा देवांमध्ये चालत नाही. त्या रामायण लिहिण्याऱ्या तुळशीदासांनी आम्हा सर्व देवांची मारून ठेवलीय.. म्हणे प्राण जाय पर बचन न जाय. आम्ही म्हणजे एकवचनी. पाटील, तुम्ही असं सागितलं का की तुमच्या पत्नीला मुल हवं! तुम्ही म्हणालात, मला मूल हवं. मी तुमची इच्छा पुरी केली. आता काही उपेग नाही.''
''पण देवा असं कसं हो. अहो मी पुरुष. अन् मी पोटुशी राहिलो, माझी काय इज्जत राहिली. ''
''अरे पाटला, प्रत्येक स्त्रीने पोराला जन्म दिलाच पाहिजे. माता होणं किती भाग्याचं. ते भाग्य तुला लाभलं.''
'' पण देवा, मी स्त्री नाही हो. '' पाटील रडतच म्हणाले.
''ते बी खरंच. पण तरीही तु भाग्यवान. फार थोडयांना हे भाग्य लाभलंय. त्या भस्मासूराला मारण्यासाठी विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं होतं. भस्मासूर तर मेला पण शंकर तिच्या मागे लागला. विष्णूला मोहिनीच्या रूपात पोर झालं होतं. भगवान विष्णूनंतर तूच. जा तूला उपवर देतो. तुझं नाव ग्रीनीच मध्ये येईल. जा, आता.'' असं म्हणून तो देवाचा दगडच तेथून नाहीसा झाला.
पाटील जमीनीवर हात टेकून उभे झाले. त्यांनी भोवताली पाहिलं, आसमंतात कुणी नव्हतं. हळूहळू चालत ते विहीरीपाशी पोचले. विहिरीजवळच्या पंपाच्या खोलीमध्ये गेले आणि त्यांनी आपला शर्ट वर करून पोटाकडे पाहिलं. त्यांच्या पोट अजून दिसण्यासारखं मोठ झालं नव्हतं. पण ओटीपोटाला गरगरीतपणा आला होता. आतून पोटाच्या कातडीवर ताण आल्यासारखं भासतं होतं. पाटलानी पोटावरून अलगद हात फिरवला. वेगवेगळया जागी दाबून पाहिलं. एकदम त्यांना वाटलं त्यांच्या पोटातून सर्वांगावर सुखाच्या, आनंदाच्या लहरी पसरत आहेत. त्यांनी हलकेच श्वास सोडला, मग बाहेर येता येता म्हणाले, ''देवाची मर्जी जर अशीच असेल तर मी दुबळा माणूस काय करणार?''
आणखी काही दिवस गेले. एका सकाळी पाटलांना जाग आली, आणि त्यांच्या लक्षात आलं सूर्याची उन्हे खिडकीतून आत आली आहेत. ते एकदम धडपडत उठले, आणि त्यांना चक्कर आल्यासारखे वाटले. त्यांच्या पोटात डचमळू लागले, भिंतीचा आधार घेत ते जोरातं 'आई ग्' म्हणून कळवळले. त्यांची पत्नी आतून धावत आली, तिने त्यांना आधार देवून मागच्या परसात नेलं, पायरीपाशी नेऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवीत ती म्हणाली, ''काय घाबरू नगा. तिसरा महिना सरला आता, तर असंच होणार. उलटया होणार. मळमळणार. पर घाबरू नगा''
तिचा पाठीवरून फिरणाऱ्या हाताच्या मऊ, उबदार स्पर्शानं त्याचं मन जसं काही भरून आलं. आपल्या बायकोचा आपल्याला किती आधार आहे असं वाटलं त्यांना. पण त्याचवेळी त्यांना वाटलं आपण मर्द आहोत मर्द. असं बाईलीसारखं धीर सोडून कसं चालेल. घाबरून कसं चालेल. त्यांनी खळखळून चूळ भरली, ताठ उभे राहात ओसरीकडे वळता वळता ते म्हणाले, ''ठीक आहे.. ठीक आहे. तुमचं काम बघा तुम्ही. दुपारी मी जातो नर्सिणबाईकडें, इंजेक्शन घेतो, समदं ठीक होईल.''
''तसं करा मंग'' असं म्हणत पाटलीणबाई आत वळल्या, त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हास्य होतं. पाटलांना चावडीत गेल्यावर कळलं. पाच, सहा महिन्यापासून नर्सिणबाई गावात आलेलीच नाहीये. त्यांनी ग्रामसेवकाला बोलावल, ''काय ग्रामसेवक, अहो गावात नर्स येत नाही. आणि तुम्ही काही तक्रारही करत नाही. सहा सहा महिने ही बाई फुकटचा पैसा खाते आणि तुम्ही...''
''पण साहेब, त्याच्या हजेरीबुकावर तुमीच सही करता.'' ग्रामसेवक जरा चाचरतच म्हणाला.
''बरं.. बरं. चला आता. आपण जाऊ तालुक्याला. त्या नर्सबाईलाही भेटू आणि बिडीओसाहेबालाही सांगू बाई येत नाही म्हणून.''
ग्रामसेवक जरा चाचरत म्हणाला, ''नाही पण सरपंच, म्हणजे आपण बाईला भेटू.. पण बि.डि.ओ.सायबाकडें...ही बाई आपल्या येमेलेसाहेबांचं मेहूणीची मैत्रिण आहे. साहेबांनी त्यांची जळगावावरून मंत्रीसाहेबाला सांगून बदली करून इथं आणलयं.''
''आणलं तर काय झालं. ती इथं म्हणून नोकरी करते ना? अरे नको येऊ दर हप्त्याला. महिन्याला तर येशील. चला. आपली बस किती वाजता आहे?''
''बस?'' ग्रामसेवकानं आश्चर्यानं विचारलं, ''आपली यामाहा बिघडली का? तसं असलं तर मी दुकानदाराकडून त्याची गाडी घेऊन येतो.''
  नाही.. नाही. बसनंच जाऊ आपण.सरपंचांनी नकळत आपल्या पोटावरून हात फिरवला. ग्रामसेवकानं चोरटया नजरेनं त्यांच्या पोटाकडं पाहिलं, मग म्हणाला, ''बरं तर, चला''
त्यादिवशी बसने जात असताना बसला बसणाऱ्या धक्क्यांनी सरपंच अगदी त्रस्त होऊन गेले. त्यांचे दोन्ही हात सतत पोटावरच होते.
त्यांच्या मनात आलं, हे आपल्या कधी ध्यानातच आलं नव्हतं. गावात डाक्टर येत नाही. नर्सचा पत्ता नाही. पोटूशा बायांच काय हाल होत असतील! आणि हा असा रस्ता... आजारी माणूस शहराला पोचण्याआधीच गचकायचा. गावानं जर मागणी केली तर गावात दवाखाना येऊ शकतो म्हणून पंचायत समिती अध्यक्षानं सांगितलं होतं, पण आपण त्याकडे लक्षचं दिलं नाही. गावला पाणी देणारी विहिर गावापासून एक कोसावर. '
बसमधून उतरल्याबरोबर सरपंच एमेलेच्या घराकडे निघाले.
ग्रामसेवक जरा चक्रावलाच, चाचरत म्हणाला, ''सरपंच, आपण बि.डि.ओ.साहेबाकडं जाणार होतो ना?''
''नाय, आधी आमदारासाहेबाकडं जाऊन येऊ. चला.''
''पण साहेब, मी कशाला?''
''मी त्यांना सांगणार आहे, साहेब, ताबडतोब आमच्या गावाजवळ विहीर झाली पाहिजे, त्यावर पंप पाहिजे, गावचा रस्ता ठीक झाला पाहिजे. त्यांनी काय माहिती विचारली तर तुमी पाहिजे की सांगायला'' सरपंच म्हणाले.
''पण साहेब, मी...मी. नाय साहेब. काय आहे, आमदारसाहेब म्हणजे मोठा माणूस. मी पडलो सरकारी नोकर? काय कमीजास्त बोलून गेलो तर बिडीओ साहेब कच्चा खाईल मला. लई वंगाळ माणूस आहे तो''
 ''ठीक आहे. तुम्ही असं करा. तुम्ही बि.डी.ओ.कडं जावा. मी आमदारसाहेबाला फोन करायला लावतो.''
ग्रामसेवक काही बोलला नाही, त्यानं जरा विचित्र नजरेनं सरपंचाकडे पाहिलं. त्यांच्या वाढणाऱ्या पोटाकडं पाहाताना त्याच्या मनात विचार आला, सरपंच काय वेगळे वागायला लागलेत हल्लीला. हा गडी बिडीओ साहेबाकडं यायलाबी तयार नसायचा. अन् आता डायरेक्ट एमेलेसाहेबाकडं चाललाय.
सरपंचांनाही स्वत:बद्दल जरा कौतुकच वाटत होतं. पण त्यावर जास्त विचार न करता त्यांनी एमेलेसाहेबांशी काय व कसं बोलावं ह्याचा विचार करायला सुरुवात केली.
एमेलेच्या बंगल्यात शिरल्यावर ते सरळ पुढच्या हॉलमध्ये घुसले. हॉलमधल्या खुर्च्यांवर एका कोपऱ्यात दोन माणसं बसली होती. दुसऱ्या कोपऱ्यात जगनभाऊ पाटील चार पाच जणांना आपल्याभोवती घेऊन बसले होते. आतल्या दरवाजाशी एमेलेसाहेबांचा मेहूणा उभा होता. सरपंचांनी सरळ आपला मोहरा आतल्या दिशेने वळवला, मेहूण्याच्या अंगावरून ते सरळ आत घुसत होते. पण मेहूण्यानं त्यांना मध्येच अडवत विचारलं, ''काय काम आहे, काय काम?''
त्याचवेळी जगनभाऊंचंही त्यांच्याकडें लक्ष गेलं. ते ही लगबगीनं पुढे आले. ''रामराम.. रामराम सरपंच. कसं काय आहे? काय काम काढलं? मग काय?'' जवळ येत ते म्हणाले.
सरपंच क्षणभर थबकले, मागे वळत म्हणाले, ''काय नाय. एमेलेसाहेबाना भेटतो जरा.'' मग जगनभाऊंकडे दुर्लक्ष करीत मेहूण्याला म्हणाले, ''आत कुणी आहे का?''
मेहूण्यानं नकाराची मान हलवली, तो पुढे काहीतरी बोलणारच होता, पण सरपंच सरळ आत घुसले. एमेले आरामात मागे रेलून खुर्चीत बसले होते. त्यांची नजर समोरच्या भिंतीवरच्या फोटोकडे लागली होती. समोरच्या भिंतीवर मधुबालेचा आणि यंशवंतराव चव्हाणांचा फोटो लावला होता. एमैलेनी एक नजर सरपंचाकडे टाकली परंतु ते काही बोलले नाहीत किंवा त्यांनी सरपंचांच्या अस्तित्वाची काही दखलही घेतलेली दिसली नाही. सरपंचांनी घसा खाकरला, हात जोडत म्हणाले, ''साहेब मी वडाळीचा सरपंच.''
''हां..हां. बोला. कसं काय?'' आमदारांच्या चेहऱ्यावर थोडासा त्रासिक भाव होता, त्यांनी सरपंचांना बसा म्हणूनही सांगितलं नाही. सरपंचांनीच समोरच्या खुर्चीवर आपलं बूड टेकवलं. मग म्हणाले, ''गावाचं काम होतं साहेब. गावाला दवाखाना नाय, डाकटर नाय. प्यायला पाणी नाही.'' सरपंच जरा थांबले. त्यांना अपेक्षा होती, एमेलेसाहेब काही प्रश्न विचारतील. पण एमेले चुपचाप भिंतीकडं बसून राहिले. सरपंचांनी थोडावेळ वाट पाहिली. पण एमेले जणू सरपंचांना विसरूनच गेले होते. सरपंचांनी अस्वस्थ चुळबूळ केली, एकदोन वेळा त्यांनी घसा खाकरला. पण एमेलेसाहेब लक्ष द्यायलाच तयार नव्हते. सरपंचांना एकदम संताप आला, ते ताडकन् उठले, उठतांना त्यांनी खूर्ची जोरात मागे ढकलली, आणि मोठया आवाजात म्हणाले, ''बराय. साहेब मी चलतो.'' त्यांचा चेहरा चांगलाच लालेलाल झाला होता. एमेले एकदम सावरून बसत म्हणाले, ''आं.. काय..काय तुमचं काम?''
''काम माझं नव्हतं. गावाचं काम होतं. गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. डॉक्टर नाही, रस्ता चांगला नाही. पण ते राहू द्या. एवढंच विनंती करतो, आता गावाकडं येऊ नका'' सरपंच झटक्यात मागं वळले आणि वेगानं खोलीबाहेर, हॉलबाहेर, बंगल्याबाहेर आले. मागून कोणीतरी धावत येऊन त्यांना 'सरपंच.. अहो सरपंच' म्हणून हाका मारत होते. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते तसेच तरातरा चालत राहिले. दूर आल्यावर त्यांना एकाएकी थकून गेल्यासारखं वाटायला लागलं. हातपाय थरथरायला लागले, कपाळाला, गळयाला घाम फुटला. त्यांना वाटलं आपल्याला श्वासोश्वास करता येत नाहीये. कुठेतरी बसावसं वाटलं त्यांना. ते जवळच्या हॉटेलमध्ये घुसले आणि घाईघाईनं त्यांनी एका खुर्चीवर बसकण मारली. समोरच्या ग्लासमधले पाणी प्यायल्यावर, पंख्याचा वारा खाल्यावर त्यांना जरा शांत वाटलं. पोटावरून हात फिरवतांना त्यांच्या मनात विचार आला, प्वोटात हे पोर घेऊन वागायचे म्हणजे कठीणच. अन् ह्या बायांना आठ दहा पोरं होतात, त्याचं काय होत असंल. त्यांना तर दिसरात कामबी करावं लागतं. एक पोरं हाताच्या बोटाला लटकतयं, एक कडेवर आणि एक पोटात घेऊन ह्या बाया कशा ठेसनाच्या दवाखान्यात जात असतील. अन् घरी आल्यावर परत रांधायचं, घर साफ राखायचं. रातला परत नवरा आहेच की. बाईचा जन्म लईच वंगाळ. देवा पुढल्या जल्मी बाईचा जल्म देऊ नको. मग एकदम त्याच्या लक्षात आलं, आपण बाईमाणुस नाही, ह्या देवानंच समदा घोटाळा करून ठेवलाय. पण तरीही बाईचा जल्म वाईटच. 
त्यांच्यासमोर कुणीतरी येऊन बसल्याची चाहूल लागली म्हणून ते विचारांच्या तंद्रीतून जागे झाले. समोर जगनभाऊ बसले होते. सरपंचाकडे पाहात ते हंसले, समजुतीच्या आवाजात म्हणाले, ''काय आहे सरपंच, आमदारसाहेबांच डोकं जरा तापलयं कालदीन. कुणीतरी वर्तमानपत्रवाल्यानं चौफुल्यावर डान्सपार्टीवर लेख लिवलाय. नसता घोर लागलाय पाठीशी. पण त्यांची चूक झाली हे मंजूर. त्यांनी मला पाठवलं तुमच्याकडं. माफी मागायला. अहो आमदारांना काय माहीत नाही का? वडाळी गावचं एकूणएक मत तुमच्यामुळं त्यांना मिळतं. बोला. काम बोला. आता बि.डी.ओ. कडे जाऊ. ताबडतोब काम सुरू करू. त्याच्याकडं पैसा नसलं तर साहेबाच्या प्लॅनमध्ये काम करू. चला.''
सरपंच काही बोलले नाहीत. केवळ जगनभाऊकडं पाहात राहिले. जगनभाऊ त्यांच्या बकोटीला धरून उठवत म्हणाले, ''तुम्ही उठा तर खरं. बघा मी काय करतो.. ''
सरपंच टेबलावर हात टेकवून हलकेच उठले, काहीवेळ तसेच उभे राहिले, कंबर ताठ करून लागलेली रग जाऊ दिली. मग ते निघाले. तोपर्यंत जगनभाऊंनी पुढे होऊन काऊंटरवर पैसे दिले होते, आणि तेथूनच त्यांनी आमदाराला फोन करून, सरपंचाबरोबर आपण बि.डि.ओ.कडे जात असल्याचं सांगून तिकडे फोन करायला सांगितला होता.
त्या संध्याकाळी सरपंच घरी आले तेव्हा ते इतके थकले होते की दाराजवळील ओसरीच्या ओटयावरच त्यांनी बसकण मारली. मोठमोठयानं उसासे सोडत, कण्हत ते तेथे बसून राहिले. खरं तर दारातून आत आल्या आल्या जाडयाभरडया आवाजात पाटलीणबाईला हाक द्यायची त्यांची सवय. पण आज ते आवाज न देता तसेच बसून राहिले.
त्यांच्या येण्याची चाहूल लागून त्यांची मोठी विधवा बहिण सुमनबाई बाहेर आली, त्यांच्या शेजारी बसली. त्यांच्याकडे बघत म्हणाली, ''लई थकला का रं भाऊ. अरं ह्या दिसात जरा जपून राहावं बाबा. जीवाला असा त्रास नाही करून घेऊ. कामं काय? बाईला जल्मभर करावीच लागतात, त्याच्यापासून काय सूटका हाय का? पण प्वोटातल्या नव्या जीवाची काळजी घ्यायले'' बोलता बोलता सुमनबाई एकदम थांबली. बहुधा तिच्या लक्षात आलं की आपण बाईशी बोलत नाही तं बुवाशी बोलतोय. ती थोडयावेळ थांबली, मग पाटलाजवळ सरकत त्यांच्या पाठीचा कणा चाचपडून तेथे बोटानं चेपत म्हणाली, ''ह्या इथं जरा मालीश केलं म्हणजे बरं वाटतं. रातला आनंदीकडून पाठ चोळून घेत जा.''
 आपल्या बहिणीचा पाठीवरून फिरणाऱ्या हाताच्या स्पर्शानं पाटलांचा सगळी शीण जणू हवेत उडून गेला. पाठ एकदम मोकळी झाल्यासारखं वाटलं त्यांना. किती वरसं झाली ताई घरी रंडकी होऊन आली. आठ वरस की दहा वरसं. ती कशी जगते, तिला काय दुखतं, खुपतं का, काही विचारलं नाही कधी आपण तिला. लहानपणी आणण दांडगेपणा करायचो, कधी पायाला लागलं, कधी ढोपराला. ताई जखमेला कोरफड बांधायची, हळद लावायची, गरम फडक्यानं शेकायची. आपल्या मनात यायचं, तिच्या हातात जादू आहे, दुख पळून जातं. पण ती घरी आल्यापासून आपण कधी तिचा हात हातात घेऊन विचारलं नाही. कधी पुसलं नाही. त्यांचे डोळे एकदम अश्रूनीं भरून आलें. ते सुमनताईकडे वळले, तिचा पाठीवर फिरणारा हात त्यांनी आपल्या दोन्ही हातात घेतला, म्हणाले, ''ताई.. तुझ्या हातात.. अजूनही.. जादू ..'' बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला. सुमनताईनं त्यांचा हात थोपटल्यासारखं केलं अन् उठता उठता म्हणाली, '' यडा, खूळा की काय तू तुळशा. उठ, आनंदी भाकऱ्या करत्येय. गरम गरम खाऊन घे. काय होतं नाही बघ. समदं ठीक होईल. ''
तुळशीराम पाटील उठले, त्यांनी शर्टाच्या बाहीनं आपले डोळे पुसले, गालावर ओघळलेले आसू पुसले आणि ते मनातच हसले. किती वर्षानी रडलो आपण. बापू गेले त्यावेळीही डोळयात अश्रू आले नव्हते.
दोनच दिवसांनी बिडीओ साहेबाची गाडी गावात आली. आणि एखाद्या महिन्यात विहीरीवर पंप बसला, पाईप लाईन टाकून चार ठिकाणी तोटया टाकल्या. त्याच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला आमदार स्वत: होऊनच आले होते. मधल्या काळात गावात डॉक्टरही आला होता. दवाखान्याकरता बांधकाम होईपर्यंत सरपंचानी त्याला वाडयातच एक खोली रिकामी करून दिली होती. सरपंचाचं दवाखान्याकडे सततचे लक्ष असायचे, त्यामुळे डॉक्टर वेळेवर यायचा, वेळेवर जायचा. गावातील बाया त्यांच्यावर आता खुष होत्या. गल्लीच्या टोकाशी पाणी आलं होतं. पोरांबाळांच्या दुखण्याखुपण्याला दवाखाना आला होता. सरपंचांनी गावातीलच एक पोरगी बालवाडीच्या ट्रेनींगला पाठवली होती.
आता सरपंचांना आठवा महिना चालू होता. त्यांचं पोट चांगलंच मोठं झालं होतं. उठतांना, बसताना त्यांना त्रास होत होता. कमरेला टेका देऊन कणा ताणला की जरा मोकळं वाटायचं, पण काही क्षणच. नाहीतर सतत हे ओझं जाणवतं राह्यचं. छातीला आतून कुणीतरी सतत दाबतयं असं वाटायचं. खरं तर आनंदीबाईंनी त्यांना सांगितलं होतं, ''काय जाऊ नका उदघाटनाला. समद्या गावाला माहीत्येय. हे तुमच्या मुळेच झाले ते. मदनभाऊ आहेत सर्व बघून घ्यायला. तुम्हाला सवंय नाही. पहिलटकरणीला लई त्रास होतो बघा.''
आनंदीबाई एकदम मध्येच थांबल्या आणि हसू लागल्या. त्यांना मोकळेपणी खदखदून हसताना पाहून तुळशीराम वेडयासारखं त्यांच्या चेहऱ्याकडं टक लावून पाहातच राहिलं. त्यांची नजर आपल्या चेहऱ्यावर लागलेली पाहून आनदीबाई हसता हसता थांबल्या, त्यांच्याकडे भुवया उंचावून पाहात त्यांनी विचारलं, ''काय झालं?''
पाटील म्हणाले, ''आनंदी अशी हसलीस ना, लई सुंदर दिसत्येस तू''
''अगं बया.. ऐका आता, म्हणे मी ..'' अंगाला एक झटका देऊन पदर अंगाभोवती गुंडाळून घेऊन त्या आत वळल्या.
चालताना त्रास होत असूनही पाटील कार्यक्रमाला गेले होते. स्टेजवर चढताना त्यांना त्रास होतोय असं पाहून आमदारसाहेब स्वत:च पुढे झाले होते आणि त्यांनी त्यांना हात दिला होता. कार्यक्रम संपून आमदारसाहेब, अधिकारी, सरपंच, डॉक्टर, पत्रकारमंडळी बाजूला बसली होती. चहाचा कप सांभाळत डॉक्टर पाटलांजवळ आले, सलगीच्या स्वरात म्हणाले, ''पाटील, रागावणार नसाल तर एक विचारायचंय.''
''बोला''
''नाही म्हणजे तुमच्या भगिनी म्हणजे सुमनताई आहेत ना! त्यांच्या हातात फार जादू आहे. म्हणजे काय, आपल्याकडे अजून नर्स नाही. मोरे आहेत, पण आपल्या दवाखान्यात बाईमाणसं जास्त येतात. तं कधीमधी सुमनताई येतात मदतीला. ताई लई हुशार, खूप कामं शिकून घेतली त्यांनी. अहो परवां पायाच्या टाचेला जखम होती, त्यालाही सुमनताईंनी बँडेज बांधल. एकदम ट्रेन्ड नर्ससारखं. मी त्यांना म्हटलं, रोजच येत जा तुम्ही. तर त्या म्हणाल्या, तुमची परवानगी पाहिजे. सरपंचसाहेब, मला वाटतं, त्यांना येऊ द्या. त्यांच्यात सेवावृत्ती आहे, दुसऱ्याची काळजी घेण्यात त्यांना आनंद वाटतो. नाहीतरी घरी राहून..'' डॉक्टर एकदम चाचरले, मग हळूच म्हणाले, ''तुमची जर इच्छा नसेल तर राहू द्या. पण त्यांना रागाऊ नका.''
 सरपंचांनी डॉक्टरांच्या खांद्यावर थाप मारली, मोठयाने हसत म्हणाले, ''अहो रागावायचे काय ह्यामधी. तिच्या हातात हायचं जादू. तिला काम आवडतं तर करू द्या की खुशाल. माझी काहीच हरकत नाही डॉक्टरसाहेब''
त्यानंतर सर्व पाहुणे राऊणे सरपंचाच्या घरी गेले, तेथे चहापाणी झाल्यावर सर्व निघाले, सरपंच सर्वांना दाराशी पोचवून आले, दिवसभराच्या धामधूमीमुळे ते अगदी थकून गेले होते, पण ते आज खुष होते. खुष होते कारण त्यांना माहीत होतं आज गावातल्या घराघरात प्रत्येक बाई खुष असणार. थकून त्यांनी खुर्चीला डोकं टेकवून डोळे मिटले. 
काही वेळानंतर त्यांनी डोळे उघडले, आतल्या दिशेने वळून ते जरा करडया आवाजात ओरडले, ''अगं ए... ऐकलं का, जरा बाहेर ये'' भाकरी भाजत असलेल्या आनंदीबाई एकदम दचकून घाईघाईत उठल्या, हातावर पाणी टाकून पदराला हात पुसत त्या बाहेर आल्या. गेल्या कित्येक दिवसात असा आवाज त्यांनी ऐकला नव्हता. घाबऱ्या घाबऱ्या त्या बाहेर आल्या, दाराशीच थबकत त्यांनी हलक्या घाबऱ्या आवाजात विचारलं, ''काय झालं? बरं वाटतं नाही का?''
''मला बरं न वाटायला काय धाड भरलीय मला? कुठे गेल्या तुझ्या जाऊबाई..बोलाव त्यांना?'' तुळशीराम पाटलांचा हा आवाज ऐकून सुमनताई मघाच दाराच्या आड येऊन उभ्या होत्या. आतूनच म्हणाल्या, ''मी आहे इथंच. काय हवंय?''
तुळशीराम पाटील खुर्चीच्या हातांचा आधार घेऊन उभे झाले, भसाडया आवाजात म्हणाले, ''मला काही नकोय? त्या डॉक्टरला काय हवयं ते विचार?''
आनंदीबाईला बाजूला सारून सुमनताई बाहेर पुढे आली, तिने आपल्या भावांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं, मग हलक्या परंतु स्पष्ट आवाजात तिने  विचारलं, ''काय सांगितलं डॉक्टरनं?''
तुळशीराम पाटीलांनी आनंदीकडे पाहिलं, ती तर एकदम घाबरून गेली होती, त्यांनी सुमनताईकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावर शांती होती, आणि डोळयात बंडखोरी. आता तुळशीराम पाटलांना स्वत:वर नियंत्रण ठेवणं आता कठीण झालं, तरीही हसू दाबत करडा आवाज काढत ते म्हणाले, ''तुझ्या हातांची जादू सर्व रोग्यांना द्यावी असं आहे त्यांच्या मनात. पोरगा चांगला आहे. उद्यापासून तू रोज दवाखान्यात यावंस असं आहे त्यांच्या मनात. आणि माझ्याही''
आणि तुळशीराम पाटील एकदम हसू लागले, आनंदीबाई आणि सुमनताईही हसू लागल्या..तुळशीराम पाटलांना हसू आवरत नव्हते, लाटामागून लाट येत होती. खरोखरच पोट धरून ते हसत होतं.
त्या दिवशी मध्यरात्रीचं त्यांना जाग आली, पोटांतल्या बाळाची हालचाल चालू होती, जणू ते आतून ढुश्या मारीत होतं, छातीला, पोटाला. ते अस्वस्थ झाले, तळमळू लागले. त्यांच्या पोटात दुखायला लागलं होतं, त्याच बरोबर त्यांच्या मनात भिती वाटायला लागली होती. आता काय होणार? पुरुषासारखे पुरुष आपण, घाबरायचं कसं. असं त्यांनी स्वत:ला समजावलं, पण तरीही त्यांच्या मनातील भिती कमी झाली नाही. मग त्यांच्या मनात आलं ही भिती कशाला? आपल्याला कशाची भिती वाटत्येय? कशाची चिंता वाटत्येय?  आपल्या जीवाची.. नाही केवळ आपल्या जीवाची नाही. ह्या जगात येणाऱ्या नव्या जीवाची? मग हे बरोबरच आहे की! भिती वाटणं सहाजिकच आहे. पण बायांना आणखीही एका गोष्टीची भिती वाटत असते. आपल्याला मुलगा न होता मुलगी होईल ह्याची! ही भिती वाटणं बरोबर नाही. आपल्याला काय हवंय? मुलगा की मुलगी? त्यांनी स्वत:लाच विचारलं, अन् त्याचवेळी त्यांच्या पोटात जोरदार कळ आली, क्षणभर त्यांना वाटलं आपले श्वास घेणंच थांबले आहे, आपण गुदमरतो आहोत, त्यांच्या हातापायांची तडफड झाली, डोकं जणू बधीर झालं, सर्व रक्त शरीरातून वेगानं धावत सुटलं, जणू धरणाची भिंत कोसळल्यावर पाणी धावावं तसं. ते हेलावणाऱ्या, हिंदकळणाऱ्या, उफाळणाऱ्या सागराच्या लाटांच्या थैमानात सापडले, इकडून तिकडे भिरकावले जाऊ लागले. त्या वेदनांच्या कल्लोळामध्येही त्यांना जाणवले, त्याचा एक हात आनंदीच्या हातात आहे, आणि दुसरा हात सुमनताईच्या. ह्या दोन हातांचा आधार असल्यावर आपल्याला काय भिती! वेदनेची दुसरी लाट आली, वरच्या दाताखाली खालचा ओठ आवळत त्यांनी आपलं लक्ष दुसरीकडं वेधण्याचा प्रयत्न केला, तर काय विचार करत होतो आपण? मुलगा होईल का मुलगी हे कुणाच्या हातात असतं. पण देवानं मला विचारलं तर मी सांगेन... एकदा नाही..दोनदा नाही..तीनदा...मला हवी मुलगी...मुलगी...मुलगी
कोणीतरी त्यांना गदागदा हलवत होतं, त्यांना जाग आली. त्यांच्या लक्षात आलं, आनंदी त्यांच्या खांद्याला धरून हलवत आहे, जवळच सुमनताई उभी आहे. त्यांच्या कपाळावर हात ठेवून पाहात आहे. तिच्या हातावर आपला हात ठेवत आणि आनंदीबाईकडे वळत ते म्हणाले, ''मी ठीक आहे. अगदी ठीक आहे.'' 
मग एकदम उडी मारून उठत ते म्हणाले, ''पण मला ताबडतोब निघायला पाहिजे. आज मी आमदारांकडे जाणार आहे, आपल्या गावाला नळयोजना आणायला हवी. येथे आरोग्य केंद्र आणायला हवं. आपल्या इथं सूईण आणायला हवी.''
''अगं बया... अन् तुम्हाला वं कसं कळलं?'' आनंदीने पदराआड तोंड लपवत कापऱ्या आवाजात विचारलं. तुळशीराम पाटलाला काही समजेच ना. गोंधळून त्यांनी सुमनताईकडे पाहिलं प्रश्नार्थक मुद्रेने. सुमनताई जरा गौंधळली मग अचंब्यानं म्हणाली, ''म्हणजे आनंदीनं तुला काही सांगितलं नाही. अरं ती पोटूशी राहिलीयं, तिला पोर होणारयं. तू सपनात ओरडत होतास, मला मुलगी पाहिजे, मुलगी पाहिजे. मला वाटलं तिनं तुला सांगतलं म्हणून. ''
खुंटीवरचा शर्ट अंगावर चढवणारा तुळशीराम जाधव पाटील, सरपंच चक्क लाजला, नकळत त्याचा हात आपल्या पोटाकडे गेला. मग म्हणाला, ''मग खरं आहे ते. मला मुलगीच पाहिजे..नाही म्हणजे मला नाही..आनंदीला मुलगीच झाली पाहिजे असं म्हणतोय मी. ''
घाईघाईनं तुळशीराम पाटील बाहेर पडले, त्या दोघी मात्र विस्मयानं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात होत्या.
समाप्त