शुक्रवार, २२ जुलै, २०११

कथा सहावी


कमलाताईंचे कृष्णविवर 
मोहिते पोस्टमन विद्यानगर हाऊसिंग सोसायटीत शिरला आणि आपली सायकल त्याने  सरळ सोसायटीच्या टोकाला, टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कमलाताई इंदुरकरांच्या बंगलीकडे वळवली. फाटकाबाहेर सायकल उभी करून त्याने सायकलला पाठीमागच्या कॅरियरला लावलेले भले मोठे पार्सल काढले. खरं तर अशा प्रकारचे मोठे पार्सल आणि ते व्हि.पी.पी.ने आलेले, अशावेळी ज्याचे पार्सल आले असेल त्याला पोस्टात येऊन पार्सलची डिलव्हरी घ्यायला सांगायचे ही नेहमीची पध्दत. शिवाय हे पार्सल कमलाताईंचे. म्हणजे बक्षिसी सोडाच, पाण्याचा ग्लासही विचारला जाण्याची शक्यता नाही. पोस्टमास्टरांनी त्याला पार्सल घेऊन जायला सांगितले तेव्हा त्याची तयारीच नव्हती खरं तर. परंतु पोस्टमास्टर तरुण होते आणि कमलाबाईचं नाही तर एकूणच वृद्धांबद्दल त्यांच्या मनात कळवळा होता. ते म्हणाले होते, ''अरे बाबा, कशाला बोलावतोस तिला इथे? बिचारी, लग्न न करता सर्व आयुष्य एकटी राहिली. पूर्वी तरी कॉलेज होते. आता तर पेन्शनीत. नेऊन दे तिला घरीच पार्सल.'' जवळच रेंगाळत असलेल्या जोशीनेही मग दुजोरा दिला होता, ''बरोबर आहे, इथं आली तर सर्वांनाच चाळीस मिनिटांचं लेक्चर ऐकावं लागेल सक्तीनं. ''
पोस्टमास्टर म्हणाले होते, ते खरं होतं. कमलाताई एकटया जगत होत्या. तशा त्या काही दिसायला कुरुप नव्हत्या. आणि कुरुप स्त्रियांची काय लग्नं होत नाहीत का? त्या काय संसार करत नाहीत का? पण कमलाताई हट्टाने विनालग्नाच्या राहिल्या होत्या. मोहितेला कुणीतरी सांगितलं होतं. पण असं असलं तरी मोहितेला त्यांच्या घरी जाणं जीवावर आले होते. म्हातारी अतिशय तोंडाळ आणि फटकळ. ह्या जगातील प्रत्येकजण जणू तिचा विद्यार्थीच आहे असा रीतीने वागते ती सर्वांशी. शिवाय खडूस आणि चंगूस! दिवाळीचे पोस्त मागायला सर्व पोस्टमन हिंडायचे, कॉलनीतील सर्वांकडे जायचे. त्या लहानशा खुरटया शहरातील प्राध्यापकांची ही कॉलनी. सर्वांकडे चांगले स्वागत व्हायचे पोस्टमन मंडळीचे, पोस्तही चांगले जमा व्हायचे. पण कमलाताईंच्या बंगल्याकडे जायचे कुणी नावही घेत नसे. कमलाताईंच्या बंगलीच्या कंपाऊंडचे फाटक उघडून मोहिते आत गेला. त्याची नजर आवतीभोवती फिरली. 'एक बाकी खरं आहे, अख्या सोसायटीत इतकी सुंदर बाग नाही. किती विविध प्रकारची झाडं! पण मग सतत ह्या झाडांच्या, फुलांच्या सहवासात असून ही म्हातारी एवढी खडूस कशी?' त्याने स्वत:लाच प्रश्न केला. एका फुलझाडांची फांदी बंगलीच्या दाराकडे जाणाऱ्या वाटेवर आडवी आली होती. लहान लहान, नाजूक पाकळया असलेल्या फुलांनी ती डवरलेली होती. क्षणभर मोहित्याला वाटलं, हा गोड सुवास ह्याच फुलांचाच का हे पहावं हुंगून. पण तो मोह आवरून फांदीला वळसा घालून तो दरवाजाशी पोचला. त्याने बेल दाबली आणि दार ताबडतोब उघडले गेले. कमलाताई हातात पैसे घेऊनच आल्या होत्या. त्याने पार्सल त्यांच्या हाती दिले. व्ही.पी.पी.चा कागद त्याने पुढे केला. कमलाताईंनी दिलेले पैसे त्याने मोजून घेतले. कमलाताईंना बहुधा पूर्वसूचना आली असणार, त्यांनी अगदी नेमकेच पैसे आणले होते. कमलाताईंची सही झालेला कागद हाती पडल्या बरोबर तो मागे वळला आणि लांब लांब ढांगा टाकत फाटक काळजीपूर्वक बंद करून सायकलवर टांग मारून तो सटकला.
कमलाताईंनी दरवाजा लावून घेतला. त्यांच्या बेडरूममधील टेबलावर त्यांनी पार्सल ठेवले. जवळच्याच फडताळात एका जागी कात्री, सुरी, डिंकाची बाटली एकूण नेहमी लागणारी सामानसामुग्री होती. कात्री घेऊन त्यांनी घाईघाईने पार्सल फोडले. आतापर्यंत त्यांनी कोणतही वस्तू अशी व्ही.पी.पार्सलने आणि केवळ जाहिरात वाचून मागवली नव्हती. त्यामुळे आसाममधील ह्या कुठल्यातरी कंपनीने दिलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेवून हा फ्लॉवर पॉट आपण मागवला हा मूर्खपणाच केला हे त्यांच्या लक्षात आले होते. परंतु आपण स्वत: होऊन केलेल्या मूर्खपणाची किंमत आपणच दिली पाहिजे हे मान्य करून त्यांनी व्ही.पी.पी.चे पैसे भरले होते. त्यांनी खोके उघडले, आत ब्राऊन पेपरमध्ये गुंडाळलेले बंडल त्यांनी उचलले, 'चांगलाच वजनदार पॉट दिसतोय हा. का आणखी काही कचरा भरून ठेवलाय कुणास ठाऊक?' त्यांनी ब्राऊन पेपर बाजूला केला आणि त्यांच्या तोंडून नकळत हर्षोद्गार बाहेर पडला. पॉटचा आकार, रंग, सर्वच रूप अगदी वेगळं, अन्युज्वल होतं. वरच्या तोंडाला रुंद, मध्ये कमी होत जाऊन तळाला परत रुंद. पण आकारापेक्षा लक्ष वेधून घेत होती, काळया रंगावर राखी रंगाने काढलेली नक्षी. कमलाताईंनी पात्रावर टिचकी मारून पाहिली. आवाज बद्दच आला. कुठल्यातरी वेगळयाच धातूचं बनवलेलं होतं ते पात्र. पण धातू कुठलाही असो, काळया धातूच्या त्या पृष्ठभागाला विलक्षण चमक होती. आणि त्या चमकदार पृष्ठभागावर काढलेली नक्षी अशी धूसर आणि अस्पष्ट होती की, निळया पाण्याच्या पृष्ठभागाखाली पसरलेल्या हलत्या वेलींचा भास व्हावा, किंवा दूरस्थ अवकाशातील पहाटे सूर्योदयाच्या वेळच्या अस्पष्ट चांदण्या दिसाव्यात. पण जरा निरखून पाहिलं की, लक्षात येत होतं, काही विशिष्ट, अत्यंत गुंतागुंतीचे आकार उपयोगात आणलेले होते ह्या नक्षीत. त्यामुळे हे आकार एकमेकांत मिसळत आहेत, नवनवीन आकार निर्माण होत आहेत असं वाटायचं निरखून पाहिल्यावर. पण ह्या आकारांच्या मांडणीत काही संगती नव्हती. कमलाताईंनीं त्या नक्षीत ही संगती शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची नजर त्या नक्षीवर खिळूनच राहिली. त्यांना भास झाला, आपली नजर त्या नक्षीत आत आत शिरत चाललीय, हरवत चाललीय. अन् एकाएकी त्यांच्या अंगावर शहारा उठला. भीतीची एक लहर त्यांच्या अंगावरून सरसरत गेली. घाईघाईने त्या पात्रावरील नजर त्यांनी सोडवून घेतली व त्या बाजूला सरकल्या. टेबलावर फ्लॉवर पॉट ठेवून त्या मागे सरकल्या.
आपल्या मनाची प्रतिक्रिया बघून त्यांना स्वत:लाच आश्चर्य वाटलं. त्या आपल्या कॉटवर जाऊन बसल्या. नकळत त्यांची नजर परत त्या पात्राकडे वळली. 'काय झालंय आपल्याला?' त्यांनी आपली नजर खिडकीबाहेर वळवली प्रयत्नपूर्वक. ही हुरहूर आणि ही भीती! किती विचित्र ही अस्वस्थता. पण मुळात आपण हा फ्लॉवर पॉट मागवलाच का? आयुष्यात कधी लहर आली म्हणून काही केलं नाही आपण! बेहिशेबीपणा आपल्याला माहीतच नाही. पण मग हा पॉट आपण का मागवला? त्याचं मन भूतकाळाकडे झेपावले, परेशचा चेहरा त्यांच्या नजरेसमोर तरळला...पण क्षणभरच. 'नाही' असं स्वत:लाच जोरात सांगून त्या झटक्यात उठल्या. भूतकाळाच्या आठवणीत त्यांना रमायचे नव्हते, त्या आठवणी रमण्यासारख्या नव्हत्याच. काही प्रश्नांना उत्तरं नसतात.
टेबलापाशी जाऊन त्यांनी ते पात्र उचलले, त्या पात्राकडे नजर न वळवता त्यांनी ते पात्र बाजूला असलेल्या पुस्तकांच्या दोन कपाटांच्या मधल्या रिकाम्या जागेत स्टूलावर ठेवले. येथे काहीसा अंधार होता. आपली नजर येथे पात्रावर सहज पोचणार नाही हे त्यांना माहीत होते. त्यामागे वळल्या. त्यांच्या लक्षात आलं, ही जी भीतीची भावना आपल्या मनात आकारली आहे, तिला घृणेचीही छटा आहे. 'मला वाटतं, माझं मन आज ताळयावर नाही.' त्यांनी ठरवलं, 'आज बागेमध्ये भरपूर काम करायचं. मागच्या बाजूला खताचा खड्डा उकरायचं किती दिवसापासून राह्यलयं. आज शरीराला थकवायचं, खूप..खूप. आणि दोन चार दिवस त्या पात्राकडे पाह्यचं देखील नाही. अधुनमधून आपली नजर जाईलच. पण सवयीनं त्या पात्राचे अनोखेपण नाहीसे होईल. त्या पात्राच्या अस्तित्वाची सवय झाली की मन अशी विचित्र प्रतिक्रिया देणार नाही.' त्या हसल्या, दाराशी गेल्या. मागे वळून त्यांनी त्या पात्राकडे नजर टाकली. ते अंधारात होते, त्याचा आकार स्पष्ट दिसत नव्हता. पण तरीही अंधारात अधुनमधून त्याचा गुळगुळीत पृष्ठभाग चमकत होता. चमचमते बिंदू. म्हणूनच आपल्याला मघा आकाशाचा भास झाला, आकाशाच्या पोकळीत चालल्यासारखे जाणवले. आणि मग कमलाताईंच्या लक्षात आलं, त्या पात्राच्या तोंडाला मोठा होत जाणारा भोवरा गरगरत आहे. हा भोवरा पारदर्शक होता, पण त्याचा बाहेरचा पृष्ठभाग गरगरत होता हे निश्चित. त्यांना भूतभोवरीची आठवण झाली. कॉलेजच्या त्या पिकनिकला गेल्या असताना त्या आणि परेश दोघेच जरा इतरांपासून बाजूला गेले होते. समोर पसरलेल्या विशाल जलाशयाकडे पाहात ते झाडाखाली विसावले होते. आणि मग पैलतीरावरून ती पाण्याच्या पृष्ठभागावर उतरली होती. पाण्यावरून सरकत, गरगरत येणारी भूतभोवरी त्यांच्या दिशेनं जमिनीकडे आली होती. तिचा गरगरण्याची गती इतकी तेज होती की, वाटेत येणारा धूळ, पालापाचोळा, झोपडयांवरील गवताच्या पेंढया, दोरीवरील कपडे गरगरत आकाशाच्या घुमटाला जाऊन पोचले होते, अतीवेगानं गरगरणारी ती भूतभोवरी अगदी संथपणे पाण्यावरून सरकत पुढे आली होती, आणि रमत गमत वर गेली होती, डोंगराच्या दिशेनं. भारावल्यासारखे ते दोघे पाहात राहिले होते. तो घोंघावणारा, वाढत जाणारा आवाज. विस्मय आणि भीती. एक अनामिक भावनेनं त्यांच्या अस्तित्वाचा ताबा घेतला होता. नकळत, थरथरत त्या परेशकडे सरकल्या होत्या. 'नाही, आपण दोघेही एकमेकाकडे सरकलो होतो. त्यानंतर दीड तासातच.'
'छे! आपल्याला हे विचित्र भास का होत आहेत आज?' त्यांना स्वत:चा संताप आला. 'व्हाय आय ऍम अलॉवींग धीस फुलीशनेस?' त्यांनी घुश्यातच चार पावले पुढे टाकली. ते पात्र त्यांच्या नजरेत आलं. 'काय मूर्ख आहोत आपण!' त्या कपाटापाशी पोचल्या. 'साधा फ्लॉवर पॉट हा, अडीचशे रुपये किंमतीचा. ही चमक काही काळातच उडेल.' नकळत त्यांचा हात त्या पॉटच्या तोंडाशी गेला आणि त्यांच्या तोंडून अस्फूट किंचाळीच बाहेर पडली. आपल्या हाताला झटकत त्या बाहेर पळाल्या. दाराबाहेर येऊन त्या उभ्या राहिल्या. आपल्या कपाळावर घामाचे थेंब उभे आहेत, आपला श्वासोश्वास जोरजोरात चाललाय, उर वेगाने वरखाली होतय हे त्यांच्या लक्षात आलं. 'नाही, हा भास नव्हता...आपला हात खरोखरच त्या पात्रात खेचला जात होता.. म्हणजे हात आत गेला नव्हता, पण..' त्या पायरीवर बसल्या. आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. 'त्या पात्रात काहीतरी वेगळेपणा आहे हे निश्चित. पण त्यात एवढं घाबरायचं काय कारण? आपल्याला ते पात्र आवडलं नसेल तर ते केव्हाही बाहेर फेकून देऊ शकतो आपण किंवा आपल्या बागेत मागच्या बाजूस ठेवून देऊ शकतो. पण त्याआधी आपला हात आत का खेचला गेला? ह्या प्रश्नाचं उत्तर काय? पण कित्येक प्रश्नाची उत्तरं कधीच मिळत नाहीत हे आपल्याला माहीत नाही का? धरमतरची खाडी पोहणारा परेश धरणाच्या शांत पाण्यात मजेत पोहता पोहता खाली गेला तो परत आलाच नाही. का? ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं का?' त्या झटक्यात उभ्या झाल्या, 'इतका जीवंत भास होऊ शकतो का? आपल्या मनावरील ताबा जात चाललाय का? वयामुळे आपलं मन भरकटायला लागलंय का?'
त्या आत आल्या. त्यांनी टेबलावर पडलेलं ताजं वर्तमानपत्र उचललं, कपाटाजवळ जाऊन त्यांनी पेपरची घडी त्या भांडयाच्या तोंडावर ठेवली. 'आता काही दिवस ह्या पात्राबद्दल विचारही करायवयाचा नाही. विसरून जाऊया हे पात्र येथे आहे म्हणून?' आणि त्यांचे डोळे विस्फारले, त्या पुढे झुकल्या, ' हा भास नाहीये..' कागदाच्या मध्यभागी खळगा पडला होता, कागद मध्यभागाला आत खेचला जात होता.. हळूहळू भोवतालचा कागदही चुरगळून, चोळामोळा होऊन आत सरकत होता. कागदाचा मध्यभाग आत दिसेनासा झाला. कुणीतरी.. काहीतरी त्या पेपरला आत खेचून घेत होते, गिळत होते. संथ पण निश्चित गतीने कागद आत खेचला जात होता. कमलाताई स्तंभित होऊन पहात राहिल्या. काही क्षणातच त्यांच्या नजरेसमोर तो पेपर आत नाहीसा झाला. त्यांनी सावधपणे भांडयाच्या तोंडातून आत डोकावून पाहिलं. पेपरचा मागमूसही नव्हता आतमध्ये. आत मध्ये होता अंधार.  त्यांना वाटलं ह्या पॉटला तळच नाही. खोल..खोल अंतहीन..एखाद्या खोल खोल विहीरीत आपण डोकावून पहातोय. छे! काही क्षणापूर्वी आपणच उचलून ठेवलं ना हा फ्लॉवर पॉट. दीड-दोन फूट उंचीचा. आत हात घातला तर सहज तळ लागेल आणि तळाला पेपरही असेल. त्यांनी हात पुढे केला, पण पॉटच्या तोंडाशी नेला नाही. त्यांनी आत नजर टाकली. बेसिनमध्ये पाणी भरल्यावर खालच्या भोकावरचे बूच काढून घेतल्यावर भोवऱ्यासारखे गरगर फिरत आत जाणाऱ्या पाण्याच्या केंद्राला असणाऱ्या विवरासारखे.. पात्राच्या तोंडाशी प्रकाश आहे, पण आत आत प्रकाश नाहीसा होत गेलाय. त्यानी टक लावून त्या पात्राकडे पाहिले. 'अं हं! तू मला बुद्दू बनवू शकत नाहीस. मी शास्त्राची प्राध्यापिका आहे. पदार्थ विज्ञान शिकलेली. अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीत सहभागी झाले होते मी. जीवनात काही दुर्दैवी घटना घडतात योगायोगाने. पण त्यात कुणी दोषी नसतो, कुणी पांढऱ्या पायाचं नसतं. पाण्याच्या पृष्ठभागावर आरामात तरंगत असलेल्या परेशला पाणी किती खोल आहे हे पाहण्याची लहर यावी ह्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. कसा असणार?'
 त्या परत टेबलापाशी गेल्या. कुणातरी जुन्या विद्यार्थिनीने त्यांना आपल्या थिसीसची प्रत दिली होती. तो जाडजूड ग्रंथ त्यांनी उचलला. त्या पात्रापाशी पोचल्या. त्यांनी तो ग्रंथ पात्राच्या तोंडावर ठेवला. 'हं, आता गिळ तुझी कुवत असेल तर' त्या स्वत:शीच पुटपुटल्या. काहीक्षण त्या ग्रंथाकडे टक लावून पाहात राहिल्या. काहीही हालचाल नाही दिसली त्यांना. त्यांनी समाधानाने मान हलवली. 'ओके, समजली मला तुझी कुवत! मर्यादित क्षमता आहे तुझी. तू काय आहेस ह्याचा शोध घेईन मी यथावकाश. पण तोपर्यंत मात्र तू येथे दोन कपाटांच्या मधल्या जागेत राहिलास तरी काही बिघडत नाही. नाहीतरी बाहेर बागेमध्ये ह्याला ठेवणे रिस्कीच आहे.' मागच्या झोपडपट्टीतील तो उंचाडया पोरगा त्यांना अनेकदा दिसला होता कंपाऊंडच्या मागच्या बाजूस रेंगाळताना. त्याची शोधक नजर बागेतून आणि मागच्या भिंतीशी असलेल्या उघडया शेडमधील सामानावरून फिरताना त्यांनी पाह्यली होती. 'हे असे भांडे बाहेर ठेवणे म्हणजे त्याला चोरी करण्याला प्रवृत्त करण्यासारखेच आहे.' कागद फाटल्याचा आवाज आपल्या कानी पडतोय असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी थिसीसच्या ग्रंथाकडे पाहिलं. निश्चितच आवाज तेथूनच येत होता. त्यांची नजर त्या ग्रंथावर खिळून राहिली. त्यांच्या लक्षात आलं, ग्रंथाच्या खालच्या बाजूचं पुठ्ठयाचं कव्हर आत नाहीसं झालं आहे, आणि खालून एक एक पान नाहीसं होत आहे.. ग्रंथाची जाडी कमी कमी होत आहे. त्या पाहात राहिल्या. काही मिनिटातच थिसीसचा ग्रंथ आत नाहीसा झाला. 'बरं झालं. कटकट गेली.' त्या थिसीसची तीन पानेही त्यांच्याकडून वाचली गेली नव्हती. 'नाहीतरी  शमा कुलकर्णी गाईड असल्यावर, ही बया काय लिहिणार होती! ' त्यांनी परत त्या पात्रात डोकावून पाहिलं. त्यांना भासलं की तो भोवरा आता अधिकच विस्तारलाय. अधिक गतीने गरगरतोय. 'तू किती खादाड आहेस, बघते मी.' त्या मागे वळल्या. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. गादीवरील उशी त्यांनी उचलली आणि पात्राच्या तोंडावर ठेवून दिली. जरा मागे सरकून त्या टेबलाजवळील खूर्चीवर बसल्या. कपडा फाटल्याचा आवाज आला. कापूस आत खेचला जाऊ लागला. एवढी जाडजूड उशी पण तिलाही मध्यभागी खड्डा पडला. कमलाताई टक लावून पाहात राहिल्या. उशी नाहीशी झाली.
कमलाताई काहीशा गोंधळल्या होत्या, पण त्यापेक्षाही संतापल्या होत्या. तसं पाहिलं तर कमलाताई खडूस बोलत असतील. त्यांच्या बोलण्यातून सातत्याने एक प्रकारचे असमाधान, एक चीड जाणवत असेल. पण त्या संतापत मात्र क्वचितच. कॉलेज सोडल्यापासून चिडल्याचे त्यांना आठवत नव्हते. बराच काळ त्या त्या फ्लॉवर पॉटकड़े पाहात राहिल्या. मग मनाशी काहीतरी निश्चय करून उठून त्या आतमध्ये गेल्या. त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते आणि हातात एक होता जाडजूड लोखंडी तवा. त्यांनी तो तवा पॉटच्या वरच्या तोंडावर ठेवला आणि त्या बाहेर गार्डनमध्ये आल्या. आता त्यांना खात्री होती की त्या जेव्हा परत आत जातील तेव्हा तो तवा तसाच तेथे असेल. त्या घराच्या मागच्या बाजूस अंगणाच्या कोपऱ्यात पोचल्या. त्यांनी फावडे उचलले. खताच्या खड्डयातील शेणकचऱ्याला झाकायला वर पसरलेला मातीचा थर त्यांनी भराभरा उपसून बाजूला खेचला. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. छातीचा भाता जोरजोरात चालू लागला. 'श्रम करण्याची आपली सवय फारच कमी झालीय, हे चांगलं नाही.' निश्चितच त्या थकल्या होत्या. पण तरीही त्यांनी खड्डयातील खत उपसून काढून पाटीत भरून पलीकडील क्वारीत टाकायला सुरुवात केली.
आपण खूप वेळ काम करत आहोत ह्याची त्यांना एकाएकी जाणिव झाली. त्यांनी फावडे बाजूला टाकले. त्या घराकडे निघाल्या. त्यांना जाणवले, आपली कमर, पाय, खांदे, सर्वच अवयव दुखत आहेत. पण त्याचबरोबर आपले मन स्वच्छ झालेय, मनावरील सावट पार साफ झालयं. शरीर थकले म्हणजे भूतकाळाच्या सावल्या नाहीशा होतात. त्यांनी आकाशाकडे नजर टाकली. सूर्य पश्चिमेकडे झुकला होता, क्षितीजावरील एका अवाढव्य  ढगामागे गेला होता. त्यांनी सभोवताली नजर टाकली. कॉलनीतील घरांची सुस्ती अजून उतरली नव्हती. मग त्यांना त्या पॉटची आणि तव्याची आठवण झाली. त्या स्वत:शीच हसल्या. म्हातारपणी असं होणारचं. भ्रमिष्टपणाचा झटकाच म्हणायचा हा. त्या दारातून आत आल्या. बेडरूमकडे न वळता त्या स्वैपाकघराकडे वळल्या. पण मग परत वळून त्या बेडरूमकडे वळल्या. त्यांना माहीत होते, ती उशी येथेच कुठेतरी पडली असणार! तो तवा पॉटच्या तोंडावर दिमाखाने बसलेला असणार. त्या सरळ कपाटाकडे वळल्या आणि त्यांची पावलं अडखळली, आ वासून पाहात राहिल्या. तो तवा तर तेथे नव्हताच पण तो फ्लॉवर पॉटही तेथे नव्हता. 'ह्याचा अर्थ काय? हे सगळे एक स्वप्नच का? भासच का? पोस्टमन आलाच नव्हता का?' त्या पुढे सरकल्या. ते पात्र तेथे नाहीये. 'पण तेथे काहीतरी आहे... नक्कीच तेथे काहीतरी आहे.'
त्या जवळ सरकल्या, डोळे बारीक करून आपली मान वाकडी करून वेगवेगळया कोनातून त्यांनी तिकडे पाहिलं. त्यांना जाणवलं..एक धूसर निळसर, काळसर आकार जमीनीपासून काही अंतरावर हवेत तरंगत होता. गरगरत होता. त्याच्या वरच्या कडा कपाटाच्या जवळ पोचल्या होत्या. तव्याचा, त्या चमकदार धातूच्या फ्लॉवर पॉटचा मात्र काहीच मागमूस नव्हता.
काही क्षण त्या सुन्न उभ्या राहिल्या आणि मग सावधपणे, सावकाश एक एक पाऊल टाकीत त्या टेबलाजवळ गेल्या. वरच्या शेल्फमध्ये ठेवलेली सायन्स डिक्शनरी त्यांनी खाली घेतली. भराभर पाने उलटत त्यांनी त्यांना हवा तो शब्द शोधला. 'ब्लॅक होल.. कृष्ण विवर.. ही एक शास्त्रिय संकल्पना आहे. कुणालाही प्रत्यक्षात कृष्णविवर असल्याचा पुरावा सापडलेला नाही. अनुमानसिध्द पुरावे आहेत. कृष्ण विवर म्हणजे एक असे क्षेत्र की जेथे गुरुत्वाकर्षणशक्ती एवढी प्रचंड असेल की ज्यातून पदार्थ तर सोडाच पण प्रकाशही बाहेर  पडू शकणार नाही. त्यामुळे कृष्णविवर दिसणे म्हणजे त्याची व्याख्याच खोटी असल्याचा पुरावा होऊ शकेल.'
कमलाताईंच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. 'होय, ही व्याख्याच चूकीची आहे. पाहा ना, हे माझं कृष्ण विवर चक्क दिसतंय. आणि हे इथं आहे अस्तित्वात. कुणी नाकारू नाही शकणार हे. आता व्याख्या बदला तुमच्या.' त्या मोकळेपणी हसल्या. 'हॅलीचा कॉमेट तसं हे कमलाताईंचं कृष्ण विवर. नाही, कमलाताईंचं कृष्णविवर नाही, कृष्ण विवराचं नावचं कमला. पण कृष्ण विवर म्हणजे ते विवर. कमला नाव कसं चालेल त्याला. नाही. हे विवर नाही. ही तर भोवरी. भूत भोवरी. कमला भूतभोवरी...
खुर्चीवर बसून त्या कितीतरी वेळ त्या दोन कपाटांमधील अंधाऱ्या पोकळीकडे पाहात राहिल्या. मग त्या उठल्या, त्यांनी जवळची खूर्ची उचलली, हात वर उचलून आपल्या खांद्याच्या पातळीवर खूर्ची धरून त्या हळूहळू पुढे सरकल्या. त्यांना ती भोवरी ह्या कोनातून दिसत नव्हती. पण सावधपणे एक एक पाऊल टाकत त्या पुढे सरकल्या. कपाटापासून काही अंतरावर जाऊन त्यांनी हलकेच ती खुर्ची दोन कपाटामधील पोकळीत जमिनीकडे न्यायला सुरुवात केली. कृष्णभोवरीने खुर्चीचा एक पाय धरला आहे आणि खुर्ची खाली खेचली जात आहे, हे त्यांना जाणवल्याबरोबर त्यांनी खुर्ची सोडून दिली. खुर्ची जमिनीपासून काही फुटांवर हवेत तरंगत राहिली काही वेळ मग स्वत:भोवती गिरक्या मारत वाकडी तिकडी होऊन फिरली, कड् कड् आवाज करीत तिचा एक पाय सांध्यापासून वेगळा झाला, खाली सरकत नाहीसा झाला. मंत्रमुग्ध झाल्यासारख्या कमलाताई खाली सरकत हळूहळू नाहिशा होणाऱ्या खुर्चीकडे पाहात राहिल्या. काही शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे, कृष्णविवराला दुसरं तोंड असणार, एका वेगळयाच परिमितीच्या विश्वात. कमलाताई मागे वळल्या. त्यांनी घाईघाईने पलंगावरील गादी चादरीसह गोळा केली आणि अंगातील शक्ती एकवटून त्यांनी ती गादी सर्वभक्षकाकडे फेकली. काही क्षणातच गादी नाहीशी झाली. तावातावाने कमलाताईंनी कपाट उघडले. अनेक वर्षापासून जमवलेले, नेहमी रेफरन्ससाठी लागणारे मोठमोठे ग्रंथ त्यांनी खाली खेचले, कपाटातील इतरही वस्तू त्यांनी खाली खेचल्या आणि खाली जमा झालेल्या त्या वस्तूंच्या ढिगातून त्यांनी एक एक पुस्तक दोन कपाटाच्या मधल्या पोकळीच्या दिशेने फेकायला सुरुवात केली. पुस्तके संपल्यावर त्यांनी खोलीतील इतरही वस्तू फेकायला सुरुवात केली. एक वस्तू नाहीशी झाली की दुसरी..ती नाहीशी झाली की तिसरी. त्यांच्या लक्षात आलं, बेडरूममधील सहजतेने हलवत्या येणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी आपल्या भूतभोवरीला अर्पण केल्या आहेत. आता काय राहिलं ह्याचा शोध घेत त्यांची नजर भोवताली फिरली. आणि त्यांना लाकूड तुटत असल्याचा आवाज ऐकू आला. एका कपाटाची एक बाजू कपाटापासून उचकटली गेली होती. फळया तुटून कपाटापासून खेचल्या गेल्या आणि काही क्षणातच नाहिशा झाल्या. कपाटातील आतील वस्तू एक एक करीत खेचल्या जात होत्या, नाहीशा होत होत्या. 'आपली भोवरी झपाटयाने वाढत आहे. आकारानं आणि ताकदीनंही. बाई अशी वाढू नकोस, मातू नकोस.' त्या पुटपुटल्या आणि तिकडे पाहत राहिल्या. दुसऱ्या बाजूचं कपाटही नाहीसं झालं. मग जवळचं टेबल हळुहळू खेचले जाऊ लागले. टेबलाचे तुकडे होऊन ते नाहीसे होत असतानाच लोखंडी कॉटही पुढे सरकू लागली.
दाराशी उभ्या राहून त्या पाहात होत्या. खोलीतील सर्व सामान आता संपले होते. रिकाम्या भिंतीवर लटकत असलेली दोन कॅलेन्डर्सही तरंगत तरंगत भोवरीच्या मुखाकडे गेली होती. त्या रिकाम्या भिंतीकडे पाहात होत्या. त्यांना वाटलं, पलिकडच्या खोलीतील सामानही आपल्या ह्या भोवरीला अर्पण केलं पाहिजे. आता अगदीच लहान नाही ही. लहानपणी संगोपनाची, पालनपोषणाची गरज असते. बाळाला काय खायला घालायचं, काय नाही, काळजी घ्यावी लागते. मुल मोठं झालं की, काहीही चालतं. त्या शेजारच्या खोलीच्या दाराशी गेल्या. दिवाणखान्यातील फर्निचरवरून, सामानावरून त्यांनी नजर टाकली. 'गेल्या चाळीस वर्षात एक एक करीत जमवलेला आपला हा वस्तूंचा संसार! ह्या वस्तू आपल्या मालकीच्या आहेत. पण ह्या निर्जीव वस्तू. त्या थोडंच आपलं नाव लावणार आहेत? एकाएकी त्यांना प्रचंड दमल्यासारखं वाटायला लागलं. दाराच्या चौकटीला पाठ टेकून त्या उभ्या ह्येत्या. पलिकडे त्यांना स्वैपाकघरातील वस्तूंही दिसत होत्या. ह्या वस्तू, ह्या खोल्या, हे घर.. ह्या माझ्या मालकीच्या आहेत. पण ह्या निर्जीव वस्तू माझ्या असण्याला काही अर्थ आहे का? पण ही भोवरी... कृष्णभोवरी. तिला माझं  माझं नाव चिकटलं आहे आता. कमला कृष्णभोवरी. आपलं अस्तित्व आता ह्या फालतू खुर्च्या टेबलांसारख्या वस्तूंवर निर्भर नाही. कृष्ण भोवरीच्या दुसऱ्या टोकाला, वेगळया परिमितीतील विश्व कसे असेल?
त्यांनी दीर्घ श्वास घेतला. त्या मागे वळल्या. बेडरूमच्या दरवाजातून त्या आत गेल्या. आपल्या कृष्णभोवरीच्या दिशेने त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली. मग त्यांना तिची ओढ जाणवली.. त्यांच्या शरीराला.. त्यांच्या मनाला ते आकर्षण जाणवलं, अन् त्यांनी स्वत:ला झोकून दिलं... त्याचं शरीर अलगद हवेत उचललं गेलं.. काही क्षण त्या जागीच हवेत तरंगत राहिल्या. त्यांना मनापासून हसू आलं. आयुष्यात कधीच असं हलकं, मोकळं मोकळं वाटलं नव्हतं. हळू हळू तरंगत त्या भोवरीच्या काठाला आल्या. त्यांनी आत डोकावून पाहिलं. अंतहीन अंधकार..

1 टिप्पणी: