संस्कार
“मॅडम, मी लोंढे.“
“या, या, तुमचीच वाट पहात होते मी. मला वाटतं आता येता की नाही. चला, ताबडतोब कामाला सुरुवात करूया. खूर्चीवरून उठत वंदना म्हणाली.टेबलावरील कागद ट्रेमध्ये ठेवताना तिने समोर अवघडून उभ्या असलेल्या तरुणाकडे पाहिले. सडपातळ बांधा, कोवळा बोलका चेहरा. तिचे लक्ष त्याच्या हातातील पुस्तकाकडे गेले. त्याच्या हातात कविता संग्रह होता, कुसूमग्रजांचा. हा तरुण निश्चितच भावनाप्रधान दिसतोय, संवेदनाशील.. ती काहीशी उल्हसित झाली. आतल्या खोलीकडे वळत बाजूच्या खुर्चीत बसलेल्या एका बाईला इशारा करत म्हणाली, चला स्मिताबाई, लवकर मोकळे करते तुम्हाला. आधीच जरा उशीर झालाय.“
आतील खोली ओलांडून ते आणखी आतल्या खोलीत पोचले. त्या खोलीत एका बाजूला एक टेबल व दोन खूर्च्या होत्या. पण खोलीची दुसरी बाजू मात्र मोकळी होती. केवळ मध्ये एक खुर्ची होती. वंदनानं स्मिताबाईंना त्या खूर्चीत बसवले. खूर्चीच्या पाठीला लावलेल्या बेल्टमधील एक बेल्ट बगलेतून छातीवरून घेऊन पट्टा घट्ट करीत वंदना म्हणाली, “स्मिताताई, घाबरायचं काहीही कारण नाही. माझं लक्ष आहे तुमच्याकडे सतत. तुम्हाला काहीही होणार नाही. पण उठण्याची धडपड करू नका. “
बोलता बोलता वंदनाने आणखी एक पट्टा स्मिताताईंच्या कमरेभोवती घट्ट आवळून बांधला. तसाच एक पट्टा त्यांच्या मांड्यांवरूनही आला होता. खुर्चीच्या पाठीशी असलेले बटण दाबत तिने स्मिताताईंना सांगितले होते, “हा माईक ऑन झालाय. आता तुमचा श्वासोच्छ्वास देखील स्पष्ट ऐकू येईल आम्हाला. “ मग लोंढेकडे इशारा करून तिने त्याचे लक्ष खूर्चीमागे वेधले होते. खुर्चीच्या मागून दोन वायर्स भिंतीकडे गेल्या होत्या. ती खुर्ची धातूची होती. लोंढेच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करीत स्मिताबाईंच्या खांद्यावर थोपटल्यासारखे करून लोंढेली खुणावून ती बाहेर आली. खोलीचा दरवाजा बंद करून त्याच्याकडे वळत म्हणाली, “दार बंद केले की, आतली खोली एकदम साऊंडप्रुफ होते. आतला आवाज बाहेर येणार नाही, बाहेरचा आत जाणार नाही. अर्थात तुमच्याजवळ स्पीकर आहे. माईकचा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येईल. हा बघा, तुमच्या खुर्चीजवळच स्पीकर आहे. “
वंदनाने बाहेरच्या खोलीतील एका मशीनजवळ लोंढेला नेले होते. वजन करण्याच्या काट्यासारखी ह्याची डायल दिसत होती. पॅनलवर एका बाजूस व्होल्ट मिटर बसवलेला होता. त्याच्या खालच्या बाजूला पिवळ्या, हिरव्या व लाल रंगांचे लहान दिवे एका ओळीत दिसत होते. स्पीकरमधून हमींगचा आवाज येत होता.
“बसा, खुर्चीवर बसा. हे उजव्या बाजूचं हॅन्डल हलकेच पुढे मागे करून पहा. “
लोंढे खुर्चीवर बसला. त्याने मूठ असलेल्या दांडीवर पकडून दांडी पुढे ढकलली. कर्रकर्र आवाज करीत दांडी पुढे गेली.
“तुम्हाला तुमच्या सायन्स प्राध्यापकांनी सर्व कल्पना दिलीच असेल. पण मी परत एकदा ब्रिफींग करते. आमची ही संस्था मानसशास्त्रात संशोधन करते. आम्ही जे प्रयोग करतो त्यात जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या कॉलेजच्या तरुण तरुणींचे साह्य आम्ही घेतो. आतापासूनच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अशा संशोधनात गुंतवले तर त्यांच्यात संशोधनाची आवड निर्माण होईल अशी आशा आहे आम्हाला. ह्या आधी तुमच्या कॉलेजातीली काही तरुण तरुणी येऊन गेल्या आहेत. ह्या प्रयोगात शंभर सॅम्पल्स घेणार आहोत आम्ही. तुम्ही वाचलं असेल, काही महिन्यापूर्वीच बातमी होती. युरोपातील एक तरुण शेकडो व्होल्टसचा वीजप्रवाह आपल्या शरीरातून वाहू देतो. आपल्या शरीराचा वायरसारखा उपयोग करून दिवा पेटवतो.आता तर अमेरिकेत ज्या खुर्चीवर देहांताची सजा दिली जाते, त्या खूर्चीवर तो बसणार आहे. आपल्या येथेही २५०-३०० व्होल्टस् वीजप्रवाहाचा परिणाम होत नाही असे लोक आहेत. ह्या स्मिताबाईंही त्यातील एक आहेत. अशा माणसांच्या शरीरात किती वीजदाबाचा प्रवाह जाऊ शकेल? हा विशेष गुण त्यांच्यात कसा आला असावा? हा गुण वाढविता येईल का? कोणत्या परिस्थितीत अशा माणसाचा उपयोग करता येईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.“
लोंढेला यंत्राचे भाग दाखवत वंदना पुढे सांगू लागली, “ हे मशीन तसं अगदी साधं आहे. तुमच्या हातातील ही लिव्हर पुढे ढकलून तुम्हाला विद्युतप्रवाहाचा दाब वाढवता येतो. काही ठराविक मिलीसेकंडस् प्रवाह वहात जाईल आणि मग आपोआप कट होईल. तुम्ही हळूहळू दाब वाढवत जायचा. मी तेथे पलिकडच्या खुर्चीत आहे. तेथे खुर्चीतील माणसाच्या शरीरातील वेगवेगळ्या बदलांची नोंद घेणारी मिटर्स आहेत. शिवाय मला त्या व्यक्तीचा चेहराही पहाता येईल अशी व्यवस्था आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या शरीरात वीजप्रवाह गेला की, त्याला वेदना तर होणारच. विजेबद्दल माणसाच्या मनात भीती तर लहानपणापासूनच आकारात आलेली असते. ह्या भीतीवर मात करणं सोपं नसतं. त्यामुळे मनावर ताण येतो. म्हणून हा प्रयोग अगदी अल्पकाळ करतो आम्ही. त्यामुळे दोन शॉक्सच्या मध्ये अगदी अल्प काळ गेला पाहिजे. तुम्ही लिव्हर पुढे ढकलली, काही मिलीसेंकदांनी प्रवाह खंडीत झाला की फार वेळ न घालवता तुम्ही परत लिव्हर पुढे सरकवायची. “
बोलता बोलता वंदना पलिकडच्या टेबलापाशी गेली. समोरील माईक हातात घेऊन तिने विचारले, “काय स्मिताताई, सुरूवात करायची का?’
स्पीकरमधून आवाज आला, “होय मॅडम. मी तयार आहे. “
लोंढेचा चेहरा गंभीर झाला. काहीशी भीती, काहीशी उत्सुकता, काहीशी शंकाकूल स्थिती वंदनाने लोंढेला सांगितले, “हं, करा सुरू लोंढे. पन्नास व्होल्टस् पासून सुरुवात करा. तिने तिच्या पॅनलवरील बटण ऑन केले. लोंढेच्या पॅनेलवरील दोन छोटे हिरवे दिवे चकाकू लागले. लोंढेने हळूच हॅन्डल पुढे ढकलले, मिटरवरील आकडा पन्नासवर गेला. काही क्षण काटा स्थीर राहिला आणि मग परत शुन्यावर आला. स्मिताचा अस्पष्ट आवाज ऐकू आला होता, हुंकार दिल्यासारखा.
“साठवर घ्या. “ वंदनाचा आवाज आला. लोंढेने हॅन्डल पुढे ढकलले. स्पीकरवर “आ... “ असा आवाज आला. लोंढे क्षणभर घोटाळला, पण परत वंदनाचा आवाज आला, “ हं, ढकला पुढे लिव्हर. आणि लोंढे मी सांगण्याची वाट पाहू नका. मला इथल्या मिटर्सकडे लक्ष ठेवावे लागतेय. “
लोंढेनं हाताची मूठ घट्ट करीत लिव्हर पुढे ढकलली. स्मिताताईंचा चित्कार काहीसा तीव्र झाल्याचे त्याला जाणवले. मिटरचा काटा शुन्यावर आला. त्यानं लिव्हर पुढे ढकलली, सत्तर..
वंदनाच्या समोरील पॅनेलवर अनेक मिटर्स होते, अनेक वेगवेगळ्या रंगांचे दिवे होते. पॅनेलवर हालचाली होत होत्या. पण वंदनाचे लक्ष तिकडे नव्हते. ती लोंढेकडे पहात होती. त्याने आपले ओठ घट्ट मिटले होते. त्याची नजर एकटक मिटरवर लागलेली होती. आणि लिव्हरवरील हाताची मूठ घट्ट आवळली गेली होती.
लोंढेने लिव्हर पुढे ढकलली. “आई..ग् “ आवाजाची तिव्रता आता वाढली होती. मिटरचा काटा शुन्यावर आल्याबरोबर लोंढेनं लिव्हर पुढे ढकलली.. सत्तर.. ऐंशी.. नव्वद...प्रत्येक झटक्याला स्पीकरवरील प्रतिक्रिया तीव्र होत चालली होती, हुंदक्यासारखा आवाज..सुटकेचा निश्वास..खटक्याचा आवाज .. दबती किंचाळी... निश्वास
मिटरने एकशेवीसचा आकडा दाखवला. स्मिताबाईंनी दीर्घ किंचाळी मारली होती. “मॅडम, आता.. “ पण त्याचे शब्द पुरे होण्याच्या आतच लोंढेच्या हाताने लिव्हर पुढे ढकलली होती.. विनवणीच्या शब्दांचा शेवट किंचाळीत झाला होता.
लोंढेनं लिव्हर पुढे ढकलली. धडपडल्याचा आवाज.. “ नको..नको हो.. “ थरथऱता आवाज, आणि मग हुंदका. लोंढेच्या कपाळावर घामाचे थेंब उभे राहिले होते, त्याचे डोळे समोर चकाकत असलेल्या दिव्याकडे होते, मिटरकडे होते. नजर दूर न करता त्यानं जोरात विचारलं, “मॅडम.. “
लगेच वंदनाचा आवाज आला, “डोन्ट वरी लोंढे.. मध्ये जितका वेळ काढाल, तितका त्यांना जास्त त्रास होईल. मी आहे इथं. मी आहे जबाबदार. तुम्ही लिव्हर पुढे सरकवत राहा. योग्य वेळ येताच मी थांबवेन तुम्हाला, किंवा इथूनच बंद करेन. “
लोंढेने लिव्हर पुढे ढकलली.. एकशे चाळीस.. एकशे पन्नास.. लोंढेचे ओठ घट्ट मिटले गेले होते, त्याची नजर मिटरवर खिळली होती, हुंदके.. घुसमटल्याचे आवाज.. मध्येच दबलेल्या किंचाळ्या.. धाप लागल्यासारखे श्वासोच्छवासांचे आवाज.. आता स्पीकरवर मध्यन्तर नव्हते.. सतत हुंदके, किंचाळ्या.. विनविण्या.. आवाजाची तिव्रता सतत वाढत होती.
आणि वंदनाची अस्वस्थता वाढत होती. हा लोंढेही असाच. कोवळ्या चेहऱ्याचा. संवदेनाशील.. ओ डॅम. कविता करतो म्हणे.. आपल्या मनाला स्थिर ठेवून एका तटस्थ वृत्तीने ती त्याच्यात होणारे बदल निरखित होती. त्याचा चेहरा, त्याच्या मुठीची पक, किंचाळी ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर होणारे बदल.. त्याचं पुढे झुकलेलं शरीर.. त्याच्या गळ्याच्या कंठमण्याची होणारी हालचाल..आपलं मन तटस्थ ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती, पण तिला जाणवत होतं, तिचं मन सैरभैर झालं आहे. एक विचित्र नैराश्याचा ढग तिच्या मनावर ओथंबून आलाय. आपल्या मेंदुवर प्रचंड दाब येतोय असं भासत होतं तिला. हा कवी मनाचा माणूस.. पहा.. पहा त्याच्या चेहऱ्यावरील भाव.. ढकलतोय लिव्हर पुढे पुढे..किंचाळ्या ऐकतोय.. हुंदके ऐकतोय.. विनंत्या, विनवण्या. छे, काहीतरी चुकतंय. काहीतरी गडबड आहे. तेराव्या माणसांपर्यन्त, त्या जोशीपर्यन्त सर्व कसं ठीक होतं. तोपर्यन्त ह्या लोंढेच्या सहविद्यार्थ्यांच्या, मुलामुलींच्या प्रतिक्रिया कशा नॉर्मल होत्या. पण १३ व्या सॅम्पलनंतर काहीतरी गडबड झालीय. तसंच असलं पाहिजे.. नाहीतर सर्वच एवढे क्रूर, संवेदनाहीन कसे असू शकतात?
काळजाला चीरत जाणारी एक किंचाळी.. आणि वंदना भानावर आली. तिने मिटरकडे पाहिले.. दोनशे दहा..
“मिस्टर लोंढे, पुरे करा“ तिने ओरडून सांगितले. तिच्या लक्षात आले होते, दिडशे व्होल्टस नंतर लोंढे सतत व्होल्टेज वाढवत राहिला होता. मध्ये एकदाही दोलायमान ना होता, तिच्याकडून नैतिक पाठिंब्याची प्रतिक्षा न करता, तिच्याकडून पुढे सरकण्याची सूचना न मिळता..
पहिल्या तेरा मुलांमुलींची प्रतिक्रिया वेगळी होती. वारंवार त्यांनी तिच्याकडून अनुमती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परिणामाला आपण जबाबदार आहोत, असं वंदनाकडून वदवून घेतलं होतं. आठ नंबरच्या तरुणाने तर १६० नंतर व्होल्टेज वाढवायला नकारच दिला होता. त्यानं स्वच्छ भाषेत सांगितले होते, “माफ करा मॅडम, तुम्ही जबाबदारी घ्या वा घेऊ नका. ह्या किंचाळ्या, ह्या यातना माझ्याकडून आता हे ऐकवलं जाणार नाही. “त्या माणसानं तर आतल्या खोलीतील माणसाची क्षमा मागण्याचा आग्रह धरला होता. वंदनाने कसेबसे त्याला त्यापासून परावृत्त केले होते.
वंदना उठून लोंढेजवळ आली. त्याचे शरीर थकल्यासारखे खुर्चीवर विसावले होते. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही घामाचे थेंब उभे होते. डोळे विस्फारून तो समोरच्या पॅनेलकडे पहात होता. आणि त्याच्या हाताची मूठ अजूनही लिव्हरच्या हॅन्डलवर होती.
“चला लोंढे, आता उठा. “ तिच्या आवाजात कडवटपणा होता. “चलूया आता. तुम्हाला त्रास झाला. थॅंक्स अ लॉट. “ पण असं म्हणतानाही तिच्या आवाजात चीड होती. लोंढे धडपडत उठला. बहुधा त्यालाही तिच्या आवाजातील बदल जाणवला असावा. चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करीत त्यानं तिचा निरोप घेतला होता. पण एखादे दु:स्वप्न पाहिल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. आपल्या अंतरात लपलेल्या वेगळ्याच लोंढेचं दर्शन होऊन लोंढेच स्वत:च हादरला होता का? त्याला दाराशी सोडून ती आत आली. खोलीच्या मध्यभागी येऊन ती थांबली. दीर्घ श्वासोच्छ्वास करून आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला तिनं. तिला समजत नव्हतं. हे असं का होतंय? आपल्या मनाचं संतुलन आपल्याला का सांभाळता येत नाहीये. ती स्वत:लाच समजावण्याचा प्रयत्न करत होती. अजून प्रयोग पूर्ण व्हायचाय वंदना. शंभरपैकी केवळ ३३ तर सॅम्पल्स झाले आहेत. तू सायन्टीस्ट आहेस वंदना. हे स्पष्ट आहे, आपल्या ह्या प्रयोगाच्या पद्धतीतच काहीतरी चूक आहे. नाहीतर तेराव्या नंबरपर्यन्त सर्वसाधारणपणे सामान्य अपेक्षित प्रतिक्रिया आणि तेरानंतर एकदम सलग वेगळ्या प्रतिक्रिया.. हे कसं शक्य आहे? असं का व्हावं? तेरापर्यन्त सर्व मुलंमुली साधारणत: संवेदनाक्षम, सहृदय आणि तेरानंतर सर्व अती स्वयंकेंद्रीत, क्रूर, रोबोटप्रमाणे हुकूम पाळणारे. छे.. हे योगायोगानं घडणार नाही. ह्या मुलांमुलींमध्ये काही गोची नाही. गोची आहे आपल्या प्रयोगाच्या पद्धतीत.
आपली पर्स उचलून वंदना झपाट्यानं बाहेर पडली. बाहेरच्या बाजूस गुरखा उभा होता. त्यानं दिलेल्या सलामाकडे तिचं लक्षचं नव्हतं. ती झपाट्यानं इस्टिट्यूट बाहेर पडली आणि स्टेशनकडे न वळता, हायवेच्या बाजूला वळली. संध्याकाळच्या हवेत लांबवर फिरायला जाऊन वंदनाला आपलं सैरभैर झालेलं मन ताळ्यावर आणायचं होतं.
हे सर्वच प्रकरण सुरू झालं होतं, दोन महिन्यांपूर्वी. वंदनाचे सहकारी मानसतद्न्य कुरेशीनी वंदनाला एका सायकोथिरापीच्या जर्नलमधील आर्टीकल दाखवलं होतं. एका अमेरिकन मानसशास्त्रद्न्याने केलेल्या प्रयोगाची व त्यानं काढलेल्या निष्कर्षाची माहिती त्यात दिली होती. वंदना जो प्रयोग करीत होती, त्या प्रकारचाच तो प्रयोग होता. सहाय्यक म्हणून आलेले स्त्रीपुरुष खरे म्हणजे ह्या प्रयोगातील गिनी पिग्ज होते. लिव्हर पुढे ढकलून, खूर्चीवरील माणसाला यातना देणारे हे स्त्रीपुरुष हेच खरे मानसतद्न्याच्या अभ्यासाचे लक्ष्य होते. अमेरिकन सोसायटीतील वेगवेगळ्या स्तरातील शंभर माणसांवर प्रयोग करून ह्या मानसतद्न्याने अत्यंत भयावह निष्कर्ष काढला होता. जर कुणी वरीष्ठ अधिकारी नैतिक जबाबदारी घेत असेल तर बहुसंख्य सामान्य नागरीक, दुसऱ्या व्यक्तीचा छळवाद करण्यात, तिला यातना देण्यात वाटेल त्या पातळीवर जाण्यास तयार असतात असा तो निष्कर्ष होता. दुसऱ्यांचा, वरीष्ठांचा हुकूम पाळण्याची सामान्य अमेरिकन माणसाला इतकी सवंय झालेली असते की, हुकूम आहे म्हणून वाटेल ती अमानूष कृती करावयास ती व्यक्ती तयार असते. ह्या जर्नलमधील रिपोर्टवर मत व्यक्त करताना डॉ. कुरेशी म्हणाले होते, “ मिस वंदना, माणसाचा स्वभाव हा असा आहे. अधिकारशाहीसमोर, वरीष्ठांसमोर झुकण्याची सवंय माणसाच्या रक्तातच आहे. अधिकार गाजवणे आणि अधिकारासमोर मान तुकवणे ह्या दोनच गोष्टी माणसाला माहीत असतात.”
वंदनाने डॉ. कुरेशींच्या हातातील जर्नल घेतलं होतं. तिची नजर भराभर शब्दाशब्दांवरून सरकत गेली होती, “ डॉ. कुरेशी, मला ह्या मानसतद्न्याने काढलेला निष्कर्ष पटत नाही. आणि तुमचंही मत मला पटत नाही. ह्या प्रयोगातून मिळालेल्या फॅक्ट्सच्या संबंधात मला काही शंका नाही. ह्या डाटाबद्दल मला काही म्हणायचं नाही. माझी हरकत आहे ती निष्कर्षाबद्दल.”
डॉ. कुरेशीनी त्यांच्या हातातील पुस्तक बाजूला ठेवले. डोळ्यांवरील चष्मा हातात घेतला. बोलणाऱ्याचे बोलणे एकाग्रतेनं ऐकताना चष्मा काढण्याची त्यांची सवंय होती. वंदनाने शब्दांची जुळवाजूळव केली मनातल्या मनात.
“ पहिला मुद्दा म्हणजे ह्या प्रयोगातून जो निष्कर्ष काढला आहे, तो सर्वच मानवी समाजाला लागू आहे असं म्हणता येणार नाही. सर्वसामान्य सर्वच अमेरिकन माणसांनाही हा निष्कर्ष लागू होईल असं मला वाटत नाही. अमेरिकेत अनेक वंशांचे लोक आहेत. त्यांना सर्वांना हा निष्कर्ष लागू होणार नाही. परंतु हे अमेरिकन माणसांबद्दल खरं आहे असं जरी मानलं तरी तेच युरोपातील वा आशियातील माणसांबद्दल म्हणता येईल असं नाही.”
डॉ. कुरेशीनी वंदनाला पुढे बोलण्याचा इशारा दिला. आता इन्स्टीट्यूटमधील इतर काही सहकारीही भोवती जमा झाले होते.
“ह्या प्रयोगातून, मला वाटतं, सामान्य अमेरिकन माणसांतील वरीष्ठांपुढे झुकण्याच्या, अधिकारशाही प्रवृत्तीपेक्षा सिद्ध होते, अमेरिकन माणसाच्या स्वभावातील क्रूरता, अमानुषता, संवेदनशीलतेचा अभाव. समोरील माणूस यातनांनी तडफडत आहे, त्याच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे, ह्याची स्पष्ट जाणीव असूनही, वीजदाब वाढवत जाण्याची तयारी, ही दर्शवते अमेरिकन माणसाची कमालीची स्वयंकेंद्रितता आणि असामाजिक प्रवृत्ती. हेच ह्या प्रयोगातून सिद्ध होते. हुकूम पाळण्याच्या प्रवृत्तीचे मोजमाप करण्यासाठी आणखी काही वेगळ्या पद्धती वापरण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, हुकूम देणारे, जबाबदारी घेणारे कुणीतरी आहे म्हणून सर्वसामान्य माणूस स्वत:लाच वेदना द्यायला तयार होईल का?”
डॉ. कुरेशी काहीवेळ आपल्याच विचारात मग्न राहिले. मग चष्मा डोळ्यांवर चढवत ते म्हणाले, “तुमचा दुसरा मुद्दा विचार करण्यायोग्य आहे. हुकूम पाळण्याची प्रवृत्तीच केवळ ह्या छळवादी कृतीचं कारण असू शकत नाही. इतरही काही फॅकर्स त्यात असतील. पण तुमचा पहिला मुद्दा जरा स्पष्ट करा.”
“ युरोप आणि अमेरिका ह्यांच्या तुलनेचं सोडा. कारण युरोपातही नाझी राजवट आकारात येऊ शकली होती.” वंदना म्हणाली, “ आपण भारतीय माणसाबद्दल बोलूया. अमेरिकन सर्वसामान्य माणसाने दाखवलेली ही क्रूरता, असामाजिकता भारतीय माणूस दाखवू शकणार नाही आणि डॉक्टर ह्याचं कारण आहे दोन्ही देशांतील सामाजिक वास्तवातील फरक. अमेरिकन कुटुंबव्यवस्था संपुर्णपणे विस्कळीत झालेली आहे. तुकडे तुकडे झालेली आहे. भारतात आजही कुटुंबव्यवस्था मजबूत आहे. आणि कुटुंबात व्यक्तीला लहानपणापासून हे बाळकडू मिळालेले असते की, केवळ व्यक्तीचा आपला स्व महत्वाचा नाही. कुटुंबातील इतर व्यक्तीही महत्वाच्या आहेत. केवळ व्यक्तीचं सुख, समाधान, आनंद महत्वाचा नाही, कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुखदु:खालाही तेवढेच महत्व आहे. किंबहुना कित्येक वेळा, कुटुंबातील इतर सभासदांसाठी, आपल्या इच्छांना, अपेक्षांना, महत्वाकांक्षांना देखील मर्यादा घालणे, नाकारणे हे जास्त नैतिक आहे, समाधानकारक आहे, दुसऱ्यासाठी जगणे, दुसऱ्यासाठी त्याग करणे, मन मारणं ह्यातंच व्यक्तीचं भलं आहे, असे संस्कारचं भारतीय कुटुंबव्यवस्थेत होत असतात.
अमेरिकन माणसाला शिकवलं जातं, लीव्ह ऍन्ड लेट डाय. जगायचे असेल, अस्तित्वात राह्यचे असेल तर इतरांशी स्पर्धा कर, इतरांचा उपयोग कर. संधी सापडेल तेथे स्वार्थ साध, इतरांना मागे खेचून पुढे जा. अमेरिकन व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे सहविकास नसतो, स्वंयकेंद्री विकास असतो. भारतीय व्यक्तीमत्व आकारात येते ते व्यक्तीमत्व विकासाच्या मर्यादा मान्य करून. अमेरिकन व्यक्तीमत्व आकारात येते ते भोवतालचा समाज आपल्या व्यक्तीमत्वाच्या विकासाला मर्यादा घालणारी विरोधी शक्ती आहे ह्या जाणीवेतून..”
डॉ. कुरेशीनी हात उंचावून वंदनाला थांबण्याची खूण केली. वंदनाने भोवती पाहिले. तिचे इतर सहकारी विस्मय आणि कौतुक भरल्या नजरांनी तिच्याकडे पाहात होते. डॉ. कुरेशींनी मृदू व संयमित आवाजात बोलायला सुरुवात केली, “मिस वंदना, मला तुमच्या पूर्वायुष्याची माहिती आहे म्हणून, नाहीतर मी म्हटलं असतं, ज्यानं डबक्याबाहेरचं विश्व पाहिलेलं नाही, अशा कूपमंडूकाचा हा दुराभिमान आहे. पण मला माहीत आहे, तुमचा जन्म आणि शिक्षणही युरोपात झालंय. मला माहीत आहे तुमच्या कवटीमध्ये वैद्न्यानिकाचा मेंदू आहे. अमेरिकन जीवनातील संपन्नतेनं प्रभावित न होता, तुम्ही एका बुद्धीवाद्याच्या अलिप्तततेतून त्या जीवनाकडे पाहिलं, म्हणून मला तुमचं कौतुकही वाटतं. पण आताच्या तुमच्या विधानामागे एक ऍन्टी अमेरिकन प्रेज्युडीस आहे का अशी शंका येण्यासारखं तुमची विधानं आहेत. ह्याला भारतीय शॉव्हेनिझम्, जे जे भारतीय त्याबद्दल दुराभिमान, असं म्हणणार नाही मी. पण..”
त्यानंतर दोघांची बराच वेळ चर्चा चालू होती. काही वेळा त्या चर्चेला वादाचे रूपही आले होते. इतर सहकाऱ्यांनीही तिलाच पाठींबा दिला होता. डॉ. कुरेशी आणि वंदना ह्यांच्यात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. वादाच्या अखेरीस वंदनाने डॉ. कुरेशींसमोर जाहीर केलं होतं, तिचं म्हणणं ती प्रयोगानं सिद्ध करून दाखवेल आणि त्यानंतर ती प्रत्यक्ष तयारीलाही लागली होती.
इंस्टीट्यूटकडून ऑफिशियली ह्या तिच्या प्रॉजेक्टला ताबडतोबीने पैसे मिळणं कठीणचं होतं. वंदनाने स्वत:च्या खर्चाने प्रयोग करण्याची तयारी चालवली तेव्हा डॉ. कुरेशीनी पुढाकार घेऊन डायरेक्टरकडून इंस्टीट्यूटची साधन सामूग्री वापरायची परवानगी मिळवली होती. तिच्या सहका-यांनीही तिला साह्य दिले होते. स्मिता, शेंडे, धारप ह्यांनी तर तिच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याचीही तयारी दाखवली होती. प्रयोगासाठी सर्व साधनांची जुळवाजूळव करणे गरजेचे होते. इलेक्ट्रीशियन, फिटर अशा कारागीरांची मदत हवी होती. आणि हे सर्व रोजचे रूटीन सांभाळून करायचे होते. कारण डायरेक्टरनी तशी अटच घातली होती. पण वंदना दिवसरात्र ह्यामागे लागली होती. तिच्या कामाचा सपाटा पाहून डॉ. कुरेशीनी तिला एकदा सावधगिरीचा इशाराही दिला होता, “ मिस वंदना, मला वाटतं, तुम्ही हा प्रयोग काही दिवस पुढे ढकलावा. अगदी झपाटल्यासारख्या गुंतलाय तुम्ही ह्यात. आपण प्रयोग करतो ते सत्य शोधण्यासाठी. आपल्याला जे सत्य आहे असे वाटते ते सत्यच आहे, हे सिद्ध करण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी नाही. आपल्या मनाची संतुलनता, अलिप्तता गमावून चालणार नाही आपल्याला. तुमचा रिस्पॉन्स, तुमची इन्व्हॉल्व्हमेंट फार भावनात्मक नाहीये ना?”
वंदनाने डॉ. कुरेशीशीं वाद घातला नव्हता. डॉ. कुरेशींच्या म्हणण्यात काही तथ्यांश आहे हे तिला माहीत होतं. माणसांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणीघडणीमध्ये संस्काराला किती महत्त्व असते हे डॉ. कुरेशीना दाखवणे गरजेचे आहे, असं तिला वाटत होतं. माणूस हा मानव असतो हे खरं असलं तरी माणूस एका विशिष्ट कुटुंबातील, विशिष्ट सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वास्तवात वाढत असतो. एका समाजाचाही भाग असतो. व्यक्तीचं स्वतंत्र व्यक्तीमत्व असतेच, पण एक राष्ट्रीय व्यक्तिमत्वही असते. लंडनसारख्या शहरात जेथे अनेकविध राष्ट्रीयत्वाची माणसं राहातात तेथे वंदनाने हेच अनुभवले नव्हते का? ह्या भावनेच्या आधारावरच तिच्या वडील परदेशातील एकाकी जीवन निष्ठेने जगले नव्हते का? तिने भराभर तयारी केली. ज्या मुलांमुलींवर प्रयोग करावयाचा होता, त्यांना विजेचा माणसांवर होणाऱ्या परिणामांवर संशोधन करायचे आहे असं सांगून, त्यांना बेसावध ठेवून त्याचं निरीक्षण करायचं, त्यांना कुठेही संशय येऊ नये म्हणून तिने अगदी काटेकोर योजना आखली होती. साऊंडप्रुफ खोली बनवली होती. स्पेशल खुर्ची तयार केली होती. पॅनेल्स बसवले होते. खरं तर खुर्चीवर कोणा व्यक्तीला बसवून इलेक्ट्रीक शॉक्स दिले जाणार नव्हते. पण तरीही तिनं तसे भासावे अशी सर्व तयारी केली होती.
स्मिताला, शेंड्यांना, धारपांना मदतीला घेऊन, परत परत रिहर्सल घेऊन सुस्कारे, हुंदके, विनवण्या, किंचाळ्या, आक्रोश अशा प्रतिक्रिया असलेल्या स्त्रीपुरुषांच्या आवाजातील ऑडिओ कॅसेटस् तिने तयार करून घेतल्या होत्या. खुर्चीत माणूस बसवून, पट्टे बांधून खोलीबाहेर येऊन दार बंद केल्यावर, मशीनचे हॅन्डल ढकलून वीजप्रवाह जसजसा वाढविला जाईल तसतसा टेप रेकॉर्डवरील आवाजही पुढच्या पातळीवर व तीव्रतम होत जात असे. आपल्या ह्या प्रयोगात कुठेही कमतरता राहू नये, कुठलाही धोका राहू नये म्हणून तिने दिवसरात्र कष्ट घेतले होते आणि एवढी मेहनत घेऊनही ही समस्या, हा प्रश्न निर्माण झाला होता.
प्रथम आलेल्या काही मुलांमुलींच्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच मिळाल्या होत्या. तेरातील आठव्या तरुणाने एकशे पन्नास व्होल्टसच्या पुढे व्होल्टेज वाढवायला नकार दिला होता. बाराव्या अलका पवारने तर, ह्या असल्या खुळचट प्रयोगातून काय साधणार आहे? असाही वाद घातला होता. ह्या तेरा मुलांमुलींच्या प्रतिक्रियांत फरक नव्हता असं नाही. पण अमेरिकन मानसिकतेपेक्षा भारतीय मानसिकता जास्त मानवी, सामाजिक आहे, असाच त्यावरून अर्थ निघत होता. पण मग चौदावा तो जोशी आला आणि त्याने तेरा माणसांनी गाठलेल्या पातळीची सीमा ओलांडली. अमेरिकन माणसांप्रमाणेच तो व्होल्टेज वाढवतच राहिला. वंदनाने स्वत:ची समजूत घातली होती. असाही असणारच एखादा. तांदुळातील खडा. किंवा ह्याच्या लहानपणी काही वेगळ्या अनुभवाला, वेगळ्या घटनेला सामोरं जावं लागलं असेल ह्याला त्याचा परिणाम असेल हा. पण त्यानंतर पंधरावी तरुणी, सोळावा तरुण, सतरावा प्रौढ पुरुष, अठरावा.. प्रत्येक व्यक्ती वंदनाचा अपेक्षाभंगच करत राहिली. सव्विसावा तरुण झाल्यानंतर तिनं पंचवीस स्त्रीपुरुषांची माहिती तपासून पाहिली. पहिल्या तेरा जणात आणि त्यानंतरच्या तेरा जणांत काही फरक आहे का? हे शोधायचा तिनं प्रयत्न केला. त्यातील स्त्रियांच्या व पुरुषांच्या प्रतिक्रियात फरक आहे का, हेही तपासून पाहिले. तिनं मिटर्स तपासून घेतले. सर्व यंत्रणा तपासून घेतली. आपण बोलतांना काही गडबड करतो का ह्याचीही छाननी केली. आपल्या प्रयोगाच्या पद्धतीत काही फरक पडलाय का ह्याचाही तिने शोध घेतला. पण गूढ गूढच राहिले होते. येणारी नवीन व्यक्ती हे गूढ अधिकच गूढ करत होती. वंदना अस्वस्थ होत गेली होती. आणि आता हा लोंढे, तेहतिसावा, त्यानं तर तिला नैराश्याच्या कड्याशी नेऊन उभे केले होते. भारतीय स्त्रीपुरुषही अमेरिकन स्त्रीपुरुषांपेक्षा वेगळे नाहीत. कुणी अधिकारी व्यक्ती नैतिक जबाबदारी घ्यावयास तयार असेल, सामान्य माणूस दुसऱ्या माणसाचा छळ करण्याची कुठलीही सीमा गाठतो असाच ह्याचा अर्थ निघतो का? नाही. तसं नाहीये. नाहीतर १३ नंतरच प्रतिक्रियांत बदल का यावा? ह्या तफावतीचं कारण काय? कारण काय? गेले चार आठवडे तिच्या डोक्यात हाच प्रश्न थैमान घालत होता.
त्या दिवशी ती घरी पोचली तेव्हा तिचं डोकं चांगलंच ठणकत होतं. हायवेवरून जाताना तिच्या मनात एकदम एक विचार चमकून गेला होता. डॉ. कुरेशींचा तर ह्यात काही हात नसेल ना? आणि समजा, वीजदाब वाढविणाऱ्या व्यक्तीला हे माहिती असेल की, खुर्चीत बांधून ठेवलेल्या व्यक्तीला प्रत्यक्षात शॉक दिला जातच नाही. हॅन्डलचा वीजदाब वाढविण्याशी काहीही संबंध नाही. मग ह्या तरुण तरुणी वाटेल त्या मर्यादेपर्यन्त वीजदाब वाढवायला तयार होतील ना? तेरा नंतर हे रहस्य डॉ. कुरेशीनी चौदाव्या व्यक्तीला सांगितलं नसेल ना? पण मग ती मनातच शरमली होती? डॉ. कुरेशीबद्दल अशी भलतीसलती शंका घेणेही चुकीचे होते. पण मग खरं कारण काय असावं? तेरा.. तेरा हा अशुभ आकडा. स्वत:च्या मनातील वेडगळ शंका झटकून टाकीत, जेवण न करताच ती अंथरूणावर आडवी झाली होती.
दुसऱ्या दिवशी, सर्व दिवसभर वंदनाने आपल्याला रोजच्या कामात गुंतवून ठेवले होते. पण तिच्या मेंदुच्या आतील कप्प्यात तो प्रश्न निनादतच राहिला होता. गोलघुमटात एकदा उच्चारलेला शब्द जसा परत परत प्रतिध्वनित होत राहावा तसा. संध्याकाळी ती डॉ. कुरेशी व इतर स्टाफ गेल्यानंतर त्या दिवशी येणाऱ्या तरुणावर प्रयोग करण्याआधी सर्व यंत्रणेची तपासणी करण्यासाठी ती आतल्या खोलीत गेली. खोलीतील एका कोपऱ्यात, खुर्चीपासून दूर ठेवलेल्या टेप रेकॉर्डकडे ती वळली. टेप रिवाईंड करून ठेवणे आवश्यक होते. तिने रिवाईंडींगचे बटण पुश केले, गूं...ईं.. आवाज ऐकत ती उभी होती. उद्यापासून स्मिता रजेवर जाणार म्हणजे येऊ शकणार नाही. आजचा प्रयोग झाल्यावर उद्या कोण येतेय ते बघून टेप बदलावा लागेल. पण आज...आज कालचीच पुनरावृत्ती होणार का.. आज तरी हे थांबायला हवे.. निदान अपवाद म्हणून तरी..आजचा तरुण पहिल्या तेरा प्रमाणे निघायला हवा. आजचा माणूस तरी संस्कार असलेला, संवेदनाशील निघायला हवा. हे असंच होत राहिले तर.. तिच्या विश्वासाला, तिच्या श्रद्धेला धक्काच पोचणार होता. कुटुंबव्यवस्थेत काही दोष आहेत हे मान्य करावेच लागेल. वर्चस्ववादाची उतरंड.. पहिली ओळख कुटुंबातच होते ना? पण हे मान्य करूनही भारतीय कुटुंब व्यवस्थेबद्दल तिला सतत अभिमानच वाटत आला आहे ना.. कुटुंबात व्यक्तीवर माणूसपणाचे संस्कार होतात असा विश्वास होता तिचा, आणि ह्या विश्वासाचा पाया केवळ अंधविश्वास नव्हता, शॉव्हेनिझम् नव्हता. हा विश्वास वैद्न्यानिक पायावर उभा होता. पण आता ह्या विश्वासाचा पायाच घसरू लागलाय का?
नाही.. नाही. तेरामध्ये आणि तेरानंतर, अशी विभागणी होण्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. हे कारण त्या मुलांमुलींमध्ये नाहीये. कारण इथेंच असलं पाहिजे.. इथंच.. ह्या यंत्रणेत..
एकाएकी खट्ट आवाज होऊन रेकॉर्डर बंद झाला. ती दचकली आणि आपली नजर कुठल्या वस्तुवर स्थिरावली आहे हे लक्षात येऊन परत दचकली. टेप रेकॉर्डरच्या बाजूला दुसरा ऑडियो कॅसेट पडला होता. वंदनाच्या लक्षात आलं होतं. बाराव्या माणसांवर प्रयोग चालू असताना कॅसेटमधून खर्र.. खर्र..आवाज येऊ लागला म्हणून तिनं प्रयोग थांबविला होता आणि त्यादिवशी आलेल्या तरुणाला निरोप दिल्यानंतर तिने दुसरा तयार कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये सरकवला होता. बाराव्या माणसांपर्यन्त वापरलेला कॅसेट आणि नंतर वापरलेला कॅसेट वेगळे होते.
डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखी वंदना चाचपडत चाचपडत आतल्या खोलीतून एकदम बाहेर आली. व्हरांड्यावर येऊन ती पायऱ्यांशी उभी राहिली. स्तंभित...सुन्न.
खरं तर तिच्या आधीच लक्षात यायला हवं होतं. पहिला टेप धारपांच्या आवाजात होता. दुसरा टेप स्मिताच्या आवाजात होता. पहिल्या टेपमधील हुंदके देणारा, विनवण्या करणारा, किंचाळणारा, संतापाने पुरे म्हणणारा आवाज पुरुषाचा होता. दुसरया कॅसेटमधील केविलवाणा, किंचाळणारा, हुंदके देणारा, आक्रोश करणारा आवाज स्त्रीचा होता. बाराव्या माणसांपर्यन्त धारपांना खुर्चीत बांधल्याचे नाटक केले जात होते, त्यानंतर त्यांची जागा स्मिताने घेतली होती..
बायजा, सप्टे – ऑक्टो १९८४
yee³epee, meHìs.-Dee@keÌìes. 1984
i really liked the story... you cannot leave it without completing in a single go....
उत्तर द्याहटवासर, सर्वच कथा खूप अप्रतिम आहेत. विशेषत: ही कथा अनेक प्रकारे अत्यंत मूलभूत विचार करायला लावणारी आहे. खूप ग्रेट. धन्यवाद.
उत्तर द्याहटवा