तिळा उघड
अभिजीतनं जिभेवर घोळत ठेवलेला वाईनचा घोट हळूच घशाकडे ढकलला. त्यानं भोवताली पाहिलं. हा वाईन बार त्याला आवडला होता. म्हणजे ही वाईन आणि कोल्ड्रींक बारची कल्पनाच त्याला एकदम भावली होती. त्याच्या मनात हा प्रश्न अनेक वेळा आला होता. खरं तर भारतासारख्या उष्ण प्रदेशातील लोकांनी लिकरपेक्षा वाईन पिणं हे सर्वार्थाने श्रेयस्कर. युरोपात किंवा जेथे तापमान सर्वसाधारणपणे कमी तेथील लोकांनी लिकर पिणे योग्य. पण प्रत्यक्षात उलटंच दिसतं. पण हा नवीन प्रकार त्याला एकदम भावला होता. शिवाय मुंबईपासून दूर असलेल्या ह्या अशा लहानशा तालुक्याच्या गावी असा काही प्रकार पाहायला मिळेल अशी त्याची बिलकूल अपेक्षा नव्हती. त्यानं समोर बसलेल्या प्रदिपकडे आणि वसुधाकडे नजर टाकली. पाच वर्षे झाली ह्यांच्या लग्नाला, आणि आपण येथे भारतात येऊन जायला, पण ह्यांच्या सहवासात आल्यापासून मधला काळ नाहीसाच झाल्यासारखं वाटतंय. आपल्या नात्यातला ताजेपणा ह्या जोडीनं कसा छान टिकवून ठेवलाय.
टेबलावरील ग्लास जरासा बाजूला सरकवत तो पुढे झुकला आणि प्रदिपच्या खांद्यावर थोपटत म्हणाला,
''एवढा अस्वस्थ होऊ नकोस रे बाबा. अवघं चाळीस किलोमिटर्सचं अंतर, सहज वीस मिनिटांत पोचशील तेथे. काय वसुधा, बरोबर की नाही?'' अभिजीतने प्रदिपच्या शेजारी बसलेल्या वसुधाकडे बघून डोळे मिचकावत विचारले.
पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे वसुधाने हसून त्याच्या म्हणण्याला दुजोरा देण्याऐवजी गंभीर स्वरात ती म्हणाली, ''नाही. तो काय पंधरा मिनिटातही पोचेल तेथे. पण माझीच शपथ आहे त्याला पन्नास किलोमिर्सपेक्षा अर्धा किलोमिटरही वेग वर जाऊ द्यायचा नाही. भले उशीर झाला पोचायला, काही बिघडत नाही. नाहीतरी आठची मिटींग म्हणजे नऊशिवाय सुरु होणार नाही.''
''ते त्याच्याकडून होणार नाही. मिटींग आठला आहे ना? तो आठला पोचणार. कुणी येवो वा ना येवो. आम्ही ह्याला अर्धा ब्रिटीश म्हणतो ते काय उगीच का? आता तू म्हणशील अर्धा का? अर्धा अशासाठी म्हणतो की, पुर्ण ब्रिटीश असता, तर आठ वाजता पोचून बरोबर पंधरा मिनिटं वाट पाहून मिटींग सुरु होत नाही म्हटल्यावर सरळ तेथून निघून गेला असता. पण त्याबाबतीत तो वास्तववादी आहे. ब्रिटीशांचा गुलामीतून मुक्त झालेल्या भारताची संस्कृती वेगळी आहे हे त्याला माहीत आहे, पण आपण वेळेवर जायचं, हे मात्र पाळणारच.''
''ते काय आता तुम्ही मला सांगायला हवं का?'' मग प्रदिपकडे वळत ती म्हणाली, ''पण मला वाटतं तू निघ आता, आणि लक्षात आहे ना? बरोबर अठरा किलोवर पोचलात की फोन करायचा. गाडी सुरु झाल्याबरोबर डिस्टन्स मोजणारा तो मिटर झीरोवर आणून ठेव.''
प्रदिपनं केवळ होकारार्थी मान हलवली, मग अभिजीतकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला, ''मला वाटतं तुम्ही घरी जाण्याची घाई करू नका. माझा फोन आल्यावरच निघा पाहिजे तर. आजच्या मिटींगमध्ये खरं म्हणजे फार काही ठरवायचं नाहीये, किंवा काही कामाचा आढावाही घ्यायचा नाहीये. पण ही विकली मिटींग म्हणजे एक बुस्टींग मिटींग असते. आणि अशी मिटींग व्हावी म्हणून मीच आग्रह धरला, म्हणून मला जायलाच हवं. मी येथेच येतो. मग बरोबरच घरी जाऊ. मिटींग सुरू झाली की पंधरा मिनिटांत मी निसटेन तिथून. आणि वसुधा, डोन्ट वरी. दर दहा मिनिटाला फोन करतो पाहिजे तर तुला. केवळ तिथे पोचून निघेपर्यंतचा काळ सोडून. नाहीतर मी तुला फोन करतोय म्हटल्यावर मिटींगमध्ये दुसरा विषयच चर्चिला जाणार नाही.''
''पण प्रदिप तुझ्या पेशन्सचं कौतुकच करायला हवं. ह्या लहानशा शहरात पाण्याचं शास्त्रीय पध्दतीनं नियोजन करण्याची गरज पटलेले एवढे प्रतिष्ठित आणि वजनदार नागरीक मिळवणं, तुलाच साधू शकतं. पण वसुधा मला खरंच समजत नाहीये. ही फोन करण्याची काय भानगड आहे. नाही म्हणजे तुझं त्याच्यावर किती अगाध प्रेम आहे, कल्पना आहे मला, पण वीस मिनिटाचा विरहही सहन होत नाही म्हणजे फारच झालं. आणि मुख्य म्हणजे मी जगाच्या दुसऱ्या टोकाहून तुझ्याशी गप्पा मारायला येथे आलो असताना? आपण फारच झाडकी पत्ती आहोत असं वाटायला लागलंय मला त्यामुळे.''
''ए..चुप रे उगाच चावटपणा करू नकोस. हे प्रकरण जरा वेगळं आहे. खरं तर तू इतक्या चांगल्या मूडमध्ये आहेस. पण ठीक आहे. सांगते मी तुला सविस्तर. नाहीतरी तुझ्यासारखा सायन्टीस्ट अनायसे येणार म्हटल्यावर आम्ही बोलणारच होतो तुझ्याशी ह्या विषयावर. पण ठीक आहे, मी बॅकग्राऊंड तर तयार करते, तोपर्यंत हा येईलच. ह्या रस्त्याला अठरा किलोमिटर्सवर एक स्पॉट आहे, रोड चांगला आहे, सरळ आहे, पण विचित्र आणि गूढ अपघात होतात त्या स्पॉटवर. सर्व अपघात कारचेच. कार रस्ता सोडून बाजूला थांबलेली असते, आणि ड्रायव्हर एक तर हार्ट ऍटकने गेलेला असतो किंवा मानसिक धक्का बसून कोमात गेलेला असतो.''
अभिजीत त्यावर काही विचारण्याच्या आधीच प्रदिप उठून उभा राहिला, ''चल अभिजीत, मी चलतो, नाहीतर एकदा तो विषय निघाला, की त्यात गुंतेन, ह्या विषयावरच बरंच ऐकावं लागेल तुला. बाय् वसुधा. आणि बिलकूल काळजी करू नकोस. दर दहा मिनिटांनी फोन करतो.''
तो टेबलापासून काही अंतरावर गेल्यावर वसुधाने परत एकदा त्याला आवाज दिला, ''प्रदिप..''
पण प्रदिप मध्येच मागे वळून म्हणाला, ''अगोदर डिस्टन्स काऊंटींग मिटर चालू करतो, मगच निघतो. डोन्ट वरी''
प्रदिप झपाटयाने कारकडे गेला. कार रोडवर पोचली, वळली, हळूहळू इंजिनचा आवाज कमी होत नाहीसा झाला, तरी वसुधा त्या दिशेनं पाहात होती. तिचा चेहरा खरोखरच चिंताग्रस्त दिसत होता. काही वेळ आभिजीत तिच्या चेहऱ्याकडे पाहात राहिला. त्याला वाटलं की, ह्या अपघात विषयावर बोलायचं तर प्रदिप आल्यावरच बोलूया. वसुधाबरोबर इतर विषय भरपूर आहेत की बोलायला. मधल्या काळात कितीतरी गोष्टी घडल्या असतील. ह्यांच्या लग्नाला आलो होतो तेव्हा वातावरण तसं टेन्सच होतं. दोघांच्या घरच्या लोकांचा लग्नाला विरोध होता, पण तरीही दोघांनी हट्टाने लग्न केलं. आपण काही दिवस अगोदर येऊन प्रचंड संख्येनं मित्र हजर व्हावेत म्हणून खास प्रयत्न केले होते. प्रदिपचे आईवडील लग्नाला आले नाहीच. आंतरजातीय विवाह पसंत नव्हता त्यांना. पण त्यानंतर काय झालं, हल्ली घरच्या लोकांशी कसे संबंध आहेत हे सर्व जाणून घ्यायची अभिजितला इच्छा होती. ही चर्चा प्रदिपच्या पश्चातच झाली तर बर, असंही त्याला वाटत होतं.
पण त्यानं तो विषय सुरु करण्याआधीच वसुधानं सुरु केलं होतं. ''अभिजीत, मला माहीत आहे, तुला हा सर्व विषय हास्यास्पदच वाटेल. पण गेल्या वर्षात चार घटना झाल्यात तशा. पहिल्या घटनेपासूनच ह्या अपघातांकडे लोकांचं लक्ष गेलं. ते साहजिकच होतं. रस्ता अगदी सरळसोट. वळण नाही, कल्व्हर्ट नाही, रस्त्याला खड्डेखुड्डेही नाहीत. आणि अपघात झाला तो असा विचित्र. अपघात रात्रीच झाला असणार. पण लक्षात आलं सकाळी सात वाजता. बाजूच्या गावातला एक माणूस सायकलवरून जात असताना त्याचं कारकडे लक्ष गेलं. कार रस्ता सोडून तीनएकशे मिटर आत घुसून शेताच्या मधोमध थांबलेली. सायकल थांबवून हा माणूस तेथे गेला तर कारचा मालक ड्रायव्हींग व्हीलवर डोकं ठेवूनच मेलेला. बाकी कारला काहीही झालेलं नाही. आणि त्यालाही काही दुखापत नाही. मग पोलीस स्टेशनला खबर. मग येथील एकूण जीवनाच्या संथ गतीनूसार कालानुक्रमाने पोलीस आले. डॉक्टरांनी निर्वाळा दिला हार्ट ऍटक. पण गाडी रस्ता सोडून शेतात कशी गेली? ड्रायव्हींग करताना हार्ट ऍटक आला असेल. पण मग ड्रायव्हरचा गाडीवरील कंट्रोल कसा सुटला नाही? आणि मुख्य चमत्कारीक बाब म्हणजे, शेतात गहू लावलेला, चांगला पोटरीला आलेला. पण कारमुळे गव्हाचं काहीही नुकसान झालेलं नाही. रस्ता सोडून गाडी शेतात घुसलेली इतकी आतपर्यंत. पण कुठेही चाकाच्या खाणाखुणा नाहीत. जणू कारला रस्त्यावरून उचलून शेताच्या मध्ये ठेवल्यासारखी. दोन दिवस अगोदरच गव्हाला पाणी दिलं होतं, शेतं ओलं होतं. प्रथम पोलिसांनी माहिती देणाऱ्या त्या खेडूतालाच अडकवलं. कारण चिखलातून कारपर्यंत पोचणारी पावलं केवळ त्याचीच. मग कुणा तरी अधिकाऱ्याला शंका आली. कारच्या टायर्सच्या खुणा कशा नाहीत. त्यामुळे तो अपघाताची माहिती देणारा तरी सुटला. त्यानंतर असेच चार अपघात झाले. दुसऱ्या अपघातात कार पडीक माळरानात. रोडच्या दुसऱ्या साईडला. कारच्या ड्रायव्हरने ब्रेक लावल्याच्या खूणा रोडच्या मध्यावर दिसत होत्या. पण कार जेथे सापडली तेथे पोचली कशी ह्याच्या काहीही खाणाखुणा नाहीत. बाकी प्रकार तोच. हा ड्रायव्हर मात्र दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. कुठल्या स्पॉटला अपघात झाला हे लक्षात आल्यावर पोलिसांनी तेथे एक बोर्ड लावून टाकला - अपघाताची जागा. पण त्यानंतर तसेच दोन अपघात झाले. चारी अपघातात कॉमन गोष्टी म्हणजे प्रत्येकवेळी अपघात कारचाच. ड्रायव्हींग करणारी व्यक्ती एकटीच. कार रस्ता सोडून दूर शेतात. वेळ रात्रीचीच.''
अभिजित बराच वेळ काही बोलला नाही, मग म्हणाला, ''सॉरी वसुधा, आता लक्षात आलं तुझं चिंता करणं सहाजिक आहे. मला वाटतं, प्रदिपने एका इमेलमध्ये ह्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. आता मला आठवलं. हे म्हणजे त्या बर्म्युडा ट्रँगलसारखंच झालं.''
''ज्या पत्रकारानं दुसऱ्या अपघाताची बातमी दिली. त्यानं हेच म्हटलं होतं. हा प्राणी सायन्स लाईनचा, मुख्य म्हणजे चौकस. म्हणून खोलात जाऊन माहिती काढली त्यानं. सविस्तर रिपोर्टींग केलं. मग कुणातरी वाचकाने वाचकांच्या पत्रव्यवहारात ह्यात कसा काही अर्थ नाही असं लिहीलं. त्याचं म्हणणं बर्म्युडा ट्रँगलमध्ये नाहीशा होणाऱ्या बोटी परत कधीच सापडत नाहीत. इथे कार नाहीशी होत नाही, माणूसही नाहीसा होत नाही. केवळ बर्म्युडा ट्रँगल ही जशी एक विशिष्ट जागा आहे त्याचप्रमाणे हे अपघाताचं एक स्थान आहे एवढेच साम्य. त्या पत्रकाराचं म्हणणं एक कार कुणीतरी उचलल्यासारखी रोडपासून दोन चारशे मिटर्स अंतरावर ठेवली जाते हा तसाच चमत्कार नाही का? पण ह्या पत्रकारामुळे, आणि निर्माण झालेल्या वादामुळे एक झालं ह्या एकूण प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले. नाहीतर पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून केस फाईल करून टाकली असती. पण अभिजीत बर्म्युडाचं काय आहे रे. नाही, तू सायन्टिस्ट म्हणून विचारते?''
अभिजीतला हसू आलं. पण त्यानं ताबडतोब काही उत्तर दिलं नाही. त्याचवेळी एक लुकडासा, गालाची हाडं वर असलेला तरुण त्याच्या देहयष्टीला न शोभणारी कॅमेऱ्याची बॅग खांद्यावर कशीबशी सांभाळत आत आला आणि त्यांच्या टेबलाजवळून जाता जाता परत मागे वळून त्यांच्याजवळच असलेल्या टेबलाशी जाऊन बसला होता. त्या तरुणाचा उद्देश स्पष्ट होता, त्याला त्या दोघांची होणारी चर्चा ऐकायची होती.
अभिजीत हसतच पुढे म्हणाला, ''प्रत्येक पेशाबद्दल एक एक स्टिरिओ टाईप प्रतिमा झालेल्या असतात. सायन्टीस्टस् बाबतही तेच आहे. पण विज्ञानाचं जग इतके बदललेय ना? वैद्यकीय क्षेत्रात जसं ज्ञानाचं फ्रॅगमेंटेशन झालंय ना तसंच सर्व क्षेत्रात झालंय. काही जण ह्याला स्पेशलायझेशन म्हणतात. पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचे. आता असतो का तसा काही प्रकार? मेंदु तज्ञाला पोट दुखल्यावर काय करायचं हे माहीत नसतं. विज्ञानात तसंच झालंय. खरं तर हल्ली विज्ञान संशोधनाचं रूप इतकं बदललं आहे ना, वसुधा, आम्ही हल्लीचे सायन्टीस्टस् खरं म्हणजे टेकनिशियन्सच. काहीवेळा तर मला वाटतं, सरकारी कचेरीत एमए. झालेल्या आवक जावक कारकूनाचं त्याच्या शिक्षणाशी जे नातं असतं ना तसंच आमचंही असतं. पण ते जाऊ दे. बर्म्युडा ट्रँगलबाबतच बोलायचं झालं तर कुणाला अजून ते गूढ उमगलेलं नाही. हायपोथिसीसेस तर अनेक आहेत. माणसाच्या कल्पनाशक्तीला कोण लगाम घालणार! पण तरुण वैज्ञानिकांची आवडती थिअरी म्हणजे तेथे कुठेतरी आपल्या त्रिमिती जगाच्या आणि चतुर्मिती जगाच्या सीमारेषा एकमेकाला भिडल्या आहेत. आणि जहाजं कधीमधी चुकून ह्या जगातून निसटून त्या जगात पडतात. आता चतुर्मिती विश्वात त्याचं काय होतं, विशेषत: त्यातील जीवंत प्राण्यांचं काय होतं हे सांगणं कठीण आहे. पण ह्या आपल्या त्रिमिती जगातून मात्र ह्या बोटी काहीही खाणाखूणा न ठेवता नाहीशा झालेल्या असतात.''
''आपलं त्रिमिती विश्व म्हणजे लांबी, रुंदी आणि खोली ह्या मिती असलेलं जग. आणि चौथी मिती म्हणजे काळ. पण म्हणजे काय कुणास ठाऊक?'' वसुधाचा आवाज गंभीर झाला होता, ''एक वेळ माझं स्वप्न होतं अभिजीत. स्त्रीमुक्तीची हवाच नाही तर वावटळ डोक्यात होती तेव्हा. हवा तर अजूनही आहे म्हणा. आपण शास्त्रज्ञ व्हायचं, पुरुषाच्या मोनोपॉली असलेल्या क्षेत्रात पुढे जायचं असं स्वप्न पाहायचे मी तेव्हा. तेव्हा वाचायचे भरपूर. पण विज्ञानाची इतक्या गतीने प्रगती होतंय म्हणतात की कालचं ज्ञान आज आऊटडेटेड् झालेलं असतं.''
''हे विधान अगदीच निरर्थक नाही म्हणता येणार. आता बघ ना. चौथी मिती कुठली ह्याबद्दलही वाद आहे. काही जणांचं असं म्हणणं आहे की, काळ ही पाचवी मिती आहे. चौथी नाही. मागल्या शतकात जेव्हा प्रथम ही संकल्पना आकारात आली, तेव्हा ह्या मितीचा संबंध भूमितीतील मितीशीच होता. शून्य मिती असलेलं जग म्हणजे एक बिंदु. बिंदुला जाणीव असेल तर बिंदुचं जग बिंदु इतकेच मर्यादित असणार. द्विमिती जग म्हणजे फ्लॅटलँड. केवळ लांबी आणि रूंदी असलेलं जग. मग तिसरी मिती म्हणजे उंची, किंवा जाडी. म्हणजे आपलं त्रिमिती जग. जर तीन मिती असलेलं जग असू शकते, आणि ह्या जगाची जाणिव असणारे सजीव असू शकतात तर चतुर्मिती असण्याचीही शक्यता आहे, किंवा पुढच्याही अनेक मिती असू शकतील. अशा कल्पनेतून खरं तर चतुर्मितीची कल्पना पुढे आली. वैज्ञानिक कल्पनाविश्व म्हणूया आपण. अठराव्या शतकाच्या अखेरीस जेम्स हिंटनने ह्यावर बरंच लिखाण केलंय. पण मग काही जणांनी देव, भूतं, स्पिरीट्स् हे सर्व अलौकिक अनुभव म्हणजे चर्तुमिती विश्वात अस्तित्वात असलेल्या सजीवांचं आपल्या जगात येणं, किंवा आपल्याला एकाएकी त्या जगात डोकावण्याची संधी मिळणं असा त्याचा अर्थ लावला. त्या अर्थानं चतुर्मिती विश्वावर बरीच चर्चा झालीय. पण मग आईन्स्टाईनने काळ ह्या मितीची कल्पना मांडली, कालप्रवास संकल्पना मांडली, मग विज्ञान कथालेखकांना अधिक विशाल कुरण सापडलं हुंदडायला. मला स्वत:ला काळ ह्या मितीपेक्षा ही चवथी भौमितीक मितीची संकल्पना जास्त भावते.''
''पिशाच्च, देव, राक्षस, या योनी न मानणाऱ्यांना हे सोयीचं आहे ना? आपल्या विश्वात जे एक्स्प्लेन करता येत नाहीत अशा अनुभवांचा अर्थ लावायला हे बरं. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ हे सर्व एकाच वेळी अस्तित्वात आहेत हे कल्पनेच्या विश्वातही पटायला जरा कठीण. सर्वसामान्य बुध्दीच्या किंवा कल्पनाशक्तीच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना.'' खुर्चीवर जरा पुढे सरसावून वसुधा म्हणाली. तो कॅमेरावाला तरुण कान देऊन त्यांचं बोलणं ऐकतोय हे लक्षात आल्यावर तिचा चर्चेचा उत्साह अधिकच वाढला होता,
''आपल्या ह्या जगाबरोबरच दुसऱ्या मितीतलं जग आहे, पण जे आपल्याला दिसत नाही हे पटण्यासारखं आहे ना? नाहीतरी व्हायरसेस, बॅक्टेरिया ह्यांचं सुक्ष्म जग कुठे आपल्याला दिसतं. तसाच हा चर्तुमितीचा प्रकार असावा हे पटतं मला. मला असं वाटतं.'' वसुधा क्षणभर थांबून पुढे म्हणाली, ''केवळ आपलं परसेप्शन बदलण्याचा प्रश्न असतो. ती चित्रं असतात की नाही, प्रथम दर्शनी साधीसुधी दिसतात, पण त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारे पाहिलं की वेगळेच चित्र दिसायला लागते. आपले डोळे तेच, पण नजरीया बदल जाती है''
''व्वा! क्या बात है'' मध्येच अभिजीतने दाद दिली.
''आपल्याला चर्तुमिती विश्वात डोकावून पहाता आलं तर.. सुक्ष्मदर्शकाचा, किंवा दूरदर्शकाचा जसा शोध लागला तसा चर्तुमितीदर्शकाचा शोध लागला पुढे मागे तर तेही विश्व खुलं होईल आपल्याला. पण आपल्याला अज्ञात असं एक विश्व आपल्या विश्वासोबतच अस्तित्वात आहे ही कल्पना खरी रोमॅन्टिक वाटते मला. पण ह्या दोन विश्वांना जोडणारा सेतू कोणता?''
अभिजीत काही क्षण कौतुकभरल्या नजरेनं तिच्याकडे पाहात राहिला. मग भानावर आल्यासारखा म्हणाला, ''हल्ली तीच चर्चा करताहेत काही तरुण शास्त्रज्ञ. हे डोअर ऑफ परस्पेशन काय असावं? चतुर्मिती जग अस्तित्वात आहे, भौतिक पातळीवर अस्तित्वात आहे असं गृहीत धरलं तरी, हे वेगळे जग पाहण्याची क्षमताही असायला हवी. खरं तर चतुर्मितीचं हे जग आणि पहाणाऱ्याचं वेगळं परस्पेशन ही अतूट अशी जोडगोळीच असायला हवी. तुझ्या भाषेत वेगळी नजरीया हवी. आमच्या इथे हल्ली ह्या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. नव्याने वेगवेगळया संकल्पना मांडल्या जाताहेत. अस्मादिकांचाही सहभाग आहे ह्या चर्चेत.'' अभिजीत मागे खुर्चीवर रेलत म्हणाला.
''काय म्हणतोस? आम्हाला तरी ऐकव काय वाद आहेत ते. तु कुठल्या स्कूलचा आहेस?''
''माझी कल्पना अगदी साधी आहे. तुला मोबियस स्ट्रीप माहीत आहे. दोन प्लेन्स, किंवा सरफेसेस एकमेकाला जोडलेली गोल पट्टी. आता बघ, साधी कल्पना आहे. त्रिमिती आणि चर्तुमिती हे तसेच दोन सरफेसेस आहेत. एकमेकाला जोडलेले तरी वेगळे, निराळे. त्या स्ट्रीपमध्ये बघ. जेथे वरचा प्लेन खालच्या प्लेनला जोडलेला असतो ना तेथे बघ, दोन्ही प्लेन्सचे दोन त्रिकोण एकमेकाला भिडलेले असतात. उलट सुलट. बर्म्युडा ट्रँगल हे झालेलं नामकरण योग्यच आहे असं मला...''
''एक मिनीट..एक मिनिट अभिजीत. मोबाईल आहे कुणाचा तरी.'' घाईघाईने टेबलावरील पर्समधील मोबाईल काढता काढता, तिने मनगटावरील घडयाळाकडेही नजर टाकली, ''अरे काय हे? पंचवीस मिनिटं होऊन गेलीयत. प्रदिपचाच फोन असणार. हां ..हलो..हलो.. मीच.''
''काय हे वसुधा. मला वाटलं होतं तू मोबाईल कानात खुपसून बसली असशील. आणि तू तर मोबाईल पर्समधून देखील काढला नव्हतास ना?'' प्रदिपचा स्पष्ट आवाज तिच्या कानाशी येत होता.
''सॉरी हं. अरे अभिजीत चतुर्मिती विश्वाबद्दल सांगत होता.''
''बरोबर आहे. बरोबर आहे. तु सायन्सवाली ना? मी आर्टसवाला. माझ्यासारख्या अडाणी माणसासमोर बोलण्याऐवजी त्यानं योग्य संधी शोधलीय. चालू द्या. चालू द्या.''
''ए..चूप रे. तुझ्या बोलण्याला जेलसीचा दुर्गंध येतोय हं. पण ते सोड, तो स्पॉट क्रॉस नाही ना केलास तू अजून?''
''तो बघ समोर तो बोर्ड दिसतोय. आता एकही वहान नाहीये रोडवर. सर्व रोड रिकामा आहे, पूर्ण रिकामा दिसतोय समोर. हे सगळे मेंबर्स जमा असतील ना वशा तेथे. तर अर्ध्या तासात मी...''
एकाएकी त्याचा आवाज कमी होत गेला, कुणीतरी दुरून बोलत असल्यासारखा काही क्षण आवाज येत राहिला आणि मग आवाज येईनासा झाला,
''हां हां.. बोल तू. मी ऐकत्येय....''
''प्रदिप, गप्प का झालास? ए.. भलती थट्टा नको हां.... प्रदीप.. अरे बोल ना, गप्प का झालास एकाएकी..''
वसूधा धडपडत उभी झाली होती, तिच्या आवाजातील तिव्रता वाढली होती, ''प्रदिप.. अरे बाबा, नको थट्टा भलत्यावेळी. अरे माझा जीव चाललाय रे, बोल..काहीतरी... बोल..प्रदीप..प्रदीप...''
तिचा आवाज अती तीव्र झाला होता, काहीसा कर्कश..तिचं सर्व शरीर थरथरत होतं, मोबाईल तिनं इतका तोंडाजवळ आणला होता, की ओठावर जणू घट्ट दाबून ठेवलाय, भोवळ आल्यासारखी लटपटत तिनं एक दोन पावलं पुढे टाकली, ''प्रदीप..प्रदीप..प्रदीप..'' क्षणाक्षणाला तिचा आवाज तीव्र होत गेला होता, आता तर ती किंचाळल्यासारखी प्रदीपच्या नावाचा जप करत होती..अभिजीत धडपडत खुर्चीवरून उठला, तिच्याकडे धावला, पलिकडच्या टेबलावरील तो तरुणही धावत आला होता..
वसुधा पुढे कोसळणारच होती, अभिजितने तिच्या खांद्याला धरून तिला सावरले, ''वसुधा..वसुधा ..डोन्ट गेट पॅनिकी..काहीही झालेलं नाही प्रदिपला..तू..पाणी..पाणी''
बोलता बोलता त्यानं टेबलावरील थंड पाण्याच्या बाटलीकडे हात लांबवला, जवळ आलेल्या त्या तरुणाने घाईघाईने त्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला, क्षणभर अभिजित घोटाळला, पण मग त्यानं ग्लासमधील पाणी वसुधाच्या चेहऱ्यावर फेकले, ग्लास परत त्या तरुणाच्या हातात देत वसुधाच्या खांद्यांना गदागदा हलवत तो म्हणाला, ''वसुधा, शुध्दीवर ये. आणि तू ओरडू नकोस. तो काय म्हणतोय ते ऐक तरी..''
चेहऱ्यावर बसलेल्या थंड पाण्याच्या शिडकाव्यांने वसुधा भानावर आली, तिने स्वत:ला सावरले, ओठांजवळ घट्ट धरलेला मोबाईल तिने दूर केला, कानाजवळ नेला, ''प्रदिप..प्रदिप..''
अभिजीतने तिला खुर्चीवर बसवले होते. तो तरुण क्षणभर घोटाळून बाहेर धावला होता. वेटर आणि काही माणसं भोवती जमा झाली होती..
तिने तोंडाजवळील मोबाईल कानाकडे नेला आणि ''ओ माय गॉड..'' तिने दीर्घ सुस्कारा सोडला, आणि तिच्या ओठांवर किचिंत स्मीत उमटले.. काही क्षण ती ऐकत राहिली, ''पण..पण प्रदिप, तुझा आवाज इतका मंद का? काय होतंय तुला? काय झालंय?''
पण त्याचवेळी अभिजीतने पुढे होऊन तिच्या हातातील मोबाईल खेचून घेतला, एका हातानं तिच्या खांद्यावर थोपटत त्यानं मोबाईलमध्ये अत्यंत धीम्या आवाजात बोलायला सुरुवात केली, ''हं प्रदिप, ते कारचं काय झालं ते मागून बघूया. तुझी कार रस्त्यात मध्ये उभी नाही ना? गुड! आता असं कर तुझ्या शर्टाचं बटणं मोकळी करून हा मोबाईल तुझ्या डाव्या बाजूला हृदयाशी लाव. मला तुझे ठोके ऐकायचे आहेत. पण एकदम काही हालचाल करू नकोस. सावकाश, शांतपणे...''
काही क्षण अभिजीत, नीट ऐकत राहिला, मग शांत आवाजात तो म्हणाला, ''हे बघ, मी काय सांगतो ते नीट ऐक. तुला सहज घेता येईल अशा जागी पाण्याची बाटली असेल तर एक दोन घोट पाणी पी. मग दोन्ही पाय सीटवर बाजूला घेऊन, मागे दाराला पाठ टेकवून हळू हळू पाठीवर आडवा हो. सावकाश.. कुठलीही हालचाल एकदम करू नकोस. डोळे मीट आणि झालेल्या घटनेबद्दल काही विचार न करता, शांतपणे, पडून राहा. श्वासोश्वासावर लक्ष असू दे पण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नकोस बिलकूल. तुझं हार्ट व्यवस्थित आहे. पण प्रिकॉशन इज बेटर दॅन..शांतपणे पडून राहा. मोबाईल कानाजवळ ठेव. आम्ही इथून निघतोय, वीस पंचवीस मिनिटात आम्ही तेथे पोचतोय. पण तू शांत पडून राहा. वसुधा तुझ्याशी बोलत राहील. परंतु तू काहीही बोलू नकोस. केवळ हं हं केलेस तरी खुप आहे. पाय वर घेतलेस, सीटवर? गूड. थांब..घाई करू नकोस...दाराला पाठ टेकव, अगदी हळू हळू खाली घसर..पण ऐक, आराम कर. चिंता करू नकोस, तू.. खांद्याचे स्नायू ढिले सोड, आम्ही निघतोच आहोत. चल, वसुधा .. मी जरा मालकांना भेटतो..''
अभिजीतने मोबाईल तिच्याकडे सोपवला. तो काऊंटरच्या दिशेनं वळतच होता, तोच तो तरुण बाहेरून धावत आत त्यांच्याजवळ आला, ''चला, माझी गाडी आहे, मी तुम्हाला घेऊन चलतो..अरे गोपू,'' त्यानं वेटरच्या दिशेनं वळून सुचना द्यायला सुरुवात केली, ''हे बघ. हे इथलं सर्व सामान जरा इथेच टेबलावर राहू दे. आम्ही परत येतो, पप्पुसेठला सांग मी येतोय परत.'' मग वसुधाकडे वळत तो म्हणाला, ''चला ताई, निघूया. मी डॉक्टर चव्हाणांना फोन केलाय, त्यांना रस्त्यात पीक अप् करूया'' त्यानं झपाटयाने दाराशीच उभ्या असलेल्या कारकडे जायला सुरुवात केली. वसुधानं हलक्या आवाजात मोबाईलवर सांगितलं, ''प्रदिप, आम्ही इथून निघतोय, आपल्या मित्राची कार मिळालीय ऐक..शांत पडून राहा.''
ते दोघं कारमध्ये बसल्याबरोबर त्या तरुणाने गाडी चालू केली. वसुधाचं मोबाईलवरचं बोलणं थांबल्याबरोबर तो मागे वळत म्हणाला, ''ताई, बिलकूल चिंता करू नका. माझं नाव गावीत. ह्या प्रकरणाला प्रसिध्दी देणारा पत्रकार मीच.''
एवढी माहिती देवून त्यानं गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केले. चौकात गेल्यावर काही क्षण त्यानं गाडी थांबवली, कोपऱ्यावर हातात लहानशी हॅन्डबॅग घेऊन उभे असलेले डॉ. चव्हाण पुढे होऊन पत्रकार गावीताजवळ बसले. कार झपाटयाने त्या स्पॉटकडे धावू लागली. वसुधा अधुनमधून हलक्या आवाजात प्रदिपशी बोलत होती. बाकी सर्वजण न बोलता प्रतिक्षा करत होते.
दहा, पंधरा मिनिट गेल्यावर अभिजीतने इशारा करून तिच्या हातातील मोबाईल घेतला, ''हं प्रदिप, अभिजीत हिअर. मग काही क्षण ऐकत राहिल्यावर तो म्हणाला, ''आमच्या बरोबर डॉ. चव्हाण आहेत. आता काहीही चिंतेचं कारण नाही. प्रदिप, तू उठून बसलेला नाहीस ना? पण तुझ्यात खूपच बदल झालेला दिसतोय. असं कर परत एकदा तुझ्या हृदयाची धडधड मला ऐकव जरा. ओ..गूड.. फाईन..मला वाटतं प्रदिप यू आर ऑल राईट. हाऊ डू यू फील? बरं आणखी एक पाच मिनीटं. आम्ही पोचतोच आहोत.''
त्यांची कार त्या स्पॉटवर पोचेपर्यंत प्रदिप चांगलाच सावरला होता. उठून सीटवर बसला होता. डॉक्टरांनी तपासल्यावर आणि सर्व काही नॉर्मल असल्याचा निर्वाळा दिल्यावर तर त्याचा नुरच बदलला होता. आपणच गाडी चालवतो असं त्याचं म्हणणं होतं. पण डॉ. चव्हाणांनी त्याला कडक शब्दात सांगितलं होतं. ''तुमचं हार्ट एकदम ठणठणीत आहे. पण तरीही तुम्हाला चांगलाच धक्का बसला आहे. तुम्ही पुर्ण आराम करा. माझी खात्री आहे, आपण बारला पोचेपर्यंत तेथील लोकसंख्या बरीच वाढलेली असेल. बातमी एवढ्यात बऱ्याच ठिकाणी पोचली असेल.''
डॉक्टरांचा अंदाज शंभर टक्के खरा ठरला होता.
परत त्याच टेबलाभोवती ते पाचजण बसले होते, आता डॉ.चव्हाण आणि पत्रकार गावीतही त्यांच्या बरोबर बसले होते. त्यांच्या टेबलासमोर आवाजाच्या टप्प्यात खुर्च्या व्यवस्थित मांडलेल्या होत्या आणि बरेच लोक जमा झाले होते. दोन तीन जण कॅमेरे घेऊन हजर होते. बहुधा पत्रकार असावेत. रस्त्यात केव्हातरी पत्रकार गावीतांनी मोबाईल वरून काही खास लोकांना माहिती दिलेली दिसत होती.
''फारसं काही सांगण्यासारखं माझ्याजवळ नाहीच आहे. कारण ते काही क्षण माझं मन, माझा मेंदु जणू एका अतीवेगानं गरगरणाऱ्या वादळात सापडला होतं.'' प्रदिपने अडखळत सुरुवात केली, ''मी वसुधाशी बोलत होतो, रस्ता मोकळा होता, गाडी रस्त्याच्या मधून वेगानं चालली होती. समोर दीड दोन किलोमिटर्स पर्यंतचा रस्ता मला स्पष्ट दिसत होता. सहाजिकच मी गाडी रस्त्याच्या मध्यावर घेतली होती. बऱ्याच गतीनं गाडी जात असावी. आणि एकाएकी खट्टकन आवाज झाला होता, माझ्या मेंदुत की गाडीच्या इंजनमध्ये की बाहेर..कठीण आहे सांगणं.. पण एकाएकी माझ्या भोवतालचं जग बदललं, कसं सांगू मी? पण आपण अनेक पैलू असलेल्या लोलकामधून पाहिल्यावर जसं दिसतं ना तसं काहीसं दिसत होतं जग. सातत्याने हलणाऱ्या, चमकत्या तुकड्यांमध्ये, तुकडे तुकडे झालेलं. पण त्या जगाकडे बघणं कसं शक्य होतं. माझ्या गाडीची गती प्रचंड वाढली होती, आणि मला वाटतं...जग उलटं पालटं झालं होतं, मी उजवीकडे वळवलं चाक, आणि गाडी डावीकडे वळली, मला वाटतं होतं, माझ्या गाडीच्या चाकांनी रस्ता सोडलाय, आणि ती हवेतच तंरगताहेत. माझं हृदय प्रचंड वेगानं धावतंय, सर्व शरीरातून घाम गळतोय, छातीचा भाता अतीवेगानं हलतोय, मला..मला भासलं की गाडीचं यंत्र हे माझ्याच शरीराचा भाग आहे, आणि अतीवेगानं धावणाऱ्या ह्या यंत्रात स्फोट होऊन आमचे तुकडे तुकडे होणार आहेत..दोन्ही हातांनी स्टिअरींग घट्ट पकडण्यासाठी मी प्रयत्न केला आणि माझ्या लक्षात आलं, माझ्या हातात मोबाईल आहे, वसुधाचा आवाज येतोय त्यामधून..अगदी क्षणाकरता माझं लक्ष भोवतालच्या त्या विश्वापासून वेगळं होऊन वसुधाच्या आवाजाकडे वेधलं आणि ..खटकन् आवाज झाला, मी परत रस्त्यावर होतो, परंतु त्या अपघात स्पॉटपासून चारएकशे मिटर्स पुढे.''
कुणीतरी उठून उत्स्फुर्तपणे टाळया वाजवल्या, मग सर्वांनीच त्याला साथ दिली.
मग पत्रकार गावीत काहीतरी प्रश्न विचारण्यासाठी पुढे सरकला, पण तोच डॉक्टर चव्हाणांनी त्याला थांबण्याचा इशारा करत सांगितलं, ''मला वाटतं, आता ह्या प्रसंगी कुणीही प्रदिप मोहित्यांना प्रश्न विचारू नयेत. इतरांशी बोलायला काही हरकत नाही. येथे जमलेल्या लोकांना माहीत नसतील, पण योगायोगानं आज आपल्या येथे एक विद्वान शास्त्रज्ञ आले आहेत. डॉक्टर अभिजीत. मला वाटतं त्यांना ह्या घटनेवर काही प्रकाश टाकता येईल.''
अभिजीत क्षणभर ह्या एकाएकी आलेल्या परिस्थितीमुळे जरासा गांगरूनच गेला. एखाद्या सेमिनार हॉलमध्ये पोडियममागे उभे राहून पेपर वाचून दाखवण्यापेक्षा हा प्रकार वेगळा असल्याची जाणीव त्याला तिव्रतेनं होत होती. तरीही तो उठला, टेबलाला टेकून उभा राहिला. त्याचं प्रदिपकडे लक्ष गेले, त्याच्या जिव्हणीवर हंसू होतं. त्यानं मूठ वळून अभिजीतला अंगठा दाखवला, वसुधा मात्र केवळ गालातल्या गालात हसत होती, मिस्कीलपणे.
अभिजीतने बोलायला सुरूवात केली. ''खरं तर मी जरी ह्या आताच्या घटनेचा साक्षीदार असलो तरी, घडलेल्या घटनांचा पुर्ण तपशील मला माहीत नाही. मला वाटतं, ह्या पूर्वीच्या घटनांबाबत वसुधाबाईंनी मला थोडीफार माहिती दिली आहे. पण मला वाटतं, ह्या सर्व घटनांचा अभ्यास केलेले पत्रकार येथे हजर आहेत. त्यांनी मला जरा सविस्तर माहिती दिली तर मला माझं मत व्यक्त करता येईल.''
क्षणाचाही विलंब न लावता गावीत उभा राहिला, लोकांकडे वळून तो म्हणाला, ''मी काही सर्व तपशील सांगत बसणार नाही. कारण तो तुम्हाला आता तोंडपाठ झाला असेल. पण ऑस्ट्रेलियाहून आलेल्या ह्या सन्माननिय विद्वान वैज्ञानिक पाहुण्यांना आवश्यक तेवढी माहिती मी देतो. अर्थात त्यांना त्याशिवाय अधिक माहिती हवी असल्यास, त्यांनी विचारावे, मी आनंदाने ही माहिती पुरवेन.''
तो काही क्षण थांबला, टेबलावर जवळच ठेवलेल्या कॅमेऱ्याच्या बॅगेशी तो एका हाताने चाळा करत होता, ''पहिला अपघात झाला तो व्याऱ्याच्या गोवर्धनदास शहांचा. ते व्यापाऱ्याच्या निमित्ताने मालेगावला गेले होते. तेथून परतायला त्यांना जरा उशीर झाला होता. वाटेत ते एके ठिकाणी जेवायला थांबले होते. तुम्हाला माहीतच आहे, गुजरातमध्ये दारूबंदी आहे. म्हणजे आपल्या इथे जसे उघडपणे पेयपान करता येते तसे गुजरातमध्ये करता येत नाही. आणि चुपचाप घरी बसून कितीही भारी दारू प्यायली तरी मला वाटतं, पब्लीकमध्ये उघडपणे पिण्यात काही तरी वेगळा मजा येत असणार. ते असो. थोडक्यात ते जरासे प्यायलेले होते. ते आजच्या भाषेत सांगायचे तर सिनिअर सिटीझन्स होते. त्यामुळे त्यांना गाडी चालवताना हार्ट ऍटक येणं ही काय फार अघटीत अशी घटना नव्हती. पण त्यांची कार सापडली ती गव्हाच्या शेताच्या मध्यात. रस्त्यापासून तीनशे चाळीस मिटर्स अंतरावर. आणि मुख्य म्हणजे शेत ओलं असूनही रस्त्यापासून कारपर्यंत चाकांच्या बिलकूल खाणाखूणा उमटलेल्या नव्हत्या. रस्ता सोडून कार शेताच्या मध्यावर कशी पोचली हे गूढच होते.
दुसरा अपघात झाला होता, देवासचे नितीनभाईचा. ते नवापूरला आपल्या एका नातेवाईकाकडे चालले होते. हा माणूस एकदम सोवळा होता. त्याच स्पॉटवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडीही रस्त्यापासून चारशे सदोतीस मिटर्स दगडाधोंडयांच्या खड़काळ माळरानात उभी होती. तिसरा माणूस आपल्याच गावातील होता. एक अधिकारी. आणि चवथा माणूस सुरतेचा होता. हा माणूस अजून हॉस्पीटलमध्ये आहे. परंतु कोमात. तो कोमातून बाहेर निघेल अशी काही स्थिती दिसत नाही. आपल्या गावातील अधिकारी साहेब काही दिवस हॉस्पीटलमध्ये जीवंत होते. पण त्यांना भोवतालच्या जगाचेही भान नव्हते, आणि स्वत:च्या स्थितीचेही भान नव्हते. ते अशा स्थितीत होते, की ते फार दिवस जगले नाहीत व यातनांतून मुक्त झाले हे चांगलेच झाले असे म्हणावे लागेल. पण मला वाटतं, माझ्याकडे ज्या प्रकारची माहिती आहे तिचा फारसा उपयोग डॉक्टरसाहेबाना होईलसं दिसत नाही. मला वाटतं त्यापेक्षा त्यांनी मला प्रश्न विचारावेत, मला माहीत असल्यास मी माहिती देईन.''
आता परत एकदा सर्वांच्या नजरा अभिजीतकडे वळल्या होत्या.
ह्यावेळी मात्र अभिजीत घाईघाईत उभा झाला, काही क्षण आपल्या भोवती जमलेल्या लोकांकडे तो पहात राहिला. त्यानं परत एकदा प्रदिप आणि वसुधाकडे धावता कटाक्ष टाकला, आणि बोलायला सुरुवात केली.
''काय झालं असावं, वा होत असावं, ह्याविषयी माझ्याकडे निश्चित उत्तर नाही. एक अंदाज मांडतो, एक हायपोथिसिस मांडतो. हायपोथिसिस म्हणजे ज्या फॅक्टस् माहीत आहेत, त्यांच्या आधारे संभाव्य असलेले स्पष्टीकरण. येथे सर्वच बाबी मला सोप्या पध्दतीने विशेषत: मराठीमध्ये मांडता येणार नाहीत. पण तरीही त्यातल्यात्यात सोप्या भाषेत मांडतो. मला वाटतं, त्या रस्त्यावर कुठेतरी असा स्पॉट आहे की जेथे त्रिमिती जग आणि चतुर्मिती जगाच्या सीमा एकमेकाला भिडलेल्या आहेत. एखादं असं विवर आहे की, ज्यातून आपल्या त्रिमिती जगातील वस्तु चतुर्मिती जगात जाते. असं काही तरी घडतं की वेगानं जाणारी कार काही पळांकरता, काही क्षणांकरता दुसऱ्या चतुर्मिती जगात जाते. पण येथे आपण चतुर्मिती असलेले भौतिक जग अस्तित्वात आहे असं धरतोय.
आपण ज्या जगात वावरतो, जगतो, जे जग आपल्याला दिसते, समजते, ते जग त्रिमिती जग आहे. लांबी, रुंदी व उंची. परंतु वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, असंही जग असणं शक्य आहे की, जेथे त्रिमितींपेक्षा कमी मिती असतील किंवा जास्तही असतील. अठराव्या शतकाच्या शेवटाला हंटन नावाच्या माणसाने ह्या विषयांवर बरेच काही लिहून ठेवले आहे. शून्य मितीच्या जगात, वा एकमिती, द्विमितीच्या जगात भोवतालचे जग कसे दिसण्याची शक्यता आहे ह्याविषयी यानं कल्पनेने बरंच काही लिहीले आहे. त्या काळात वैज्ञानिकांना कल्पनाविश्वात भराऱ्या घ्यायला हे बहुमित्यांचे विश्व सोयीचे होते. पण हे लक्षात घेतले पाहिजे की जसे त्रिमिती विश्व म्हणजे केवळ त्रिमिती असलेले भौतिक जग नाही तर त्या जगाचे आकलन करू शकतील, त्या जगाचे परसेप्शन ज्यांना होते असे सजीवही. समजा उद्या आपल्याला चतुर्मिती जगात जाण्याचा रस्ता सापडला, आपण त्या जगात घुसलो तर काही उपयोग होणार नाही. कारण त्रिमितीच्या विश्वात राहाणाऱ्यांना ते विश्व समजूच शकणार नाही, उमजूच शकणार नाही. कल्पना करा तुम्ही एका खोल स्विमींग टॅंकच्या काठाला उभे आहात. तुमच्या भोवती हवा आहे, नाकाने तुम्ही ती आत घेत आहात, बाहेर सोडत आहात. भोवती प्रकाश आहे, भोवताली अनेक वस्तु आहेत, आणि त्या विश्वात तुम्ही वावरत आहात. आपल्या हातापायांचा, अवयवांचा उपयोग करून तुम्ही हालचाल करत आहात. आता तुम्ही एकाएकी तलावात पाण्याच्या तळाशी गेलात, पाण्यातील जग एकदम वेगळेच दिसू लागेल तुम्हाला. पलिकडील भिंत किती लांब आहे हे सांगणं कठीण होईल तुम्हाला. पाण्यात हालचाल करणं, चालणं, एखादी वस्तु हातांनी पकडणं हेही कठीण वाटेल त्रिमिती जग आणि चतुर्मिती जग ह्यात अशाच प्रकारचा फरक आहे. पण तुर्तास ही दोन वेगळी जगं आहेत असं समजलं तर हे लक्षात घ्यायला हवं की त्या जगांचा अनुभव घेण्यासाठी ते जग तुम्हाला वेगळया प्रकारे पाहावे लागेल, वेगळया प्रकारची ज्ञानसंपादनाची कुवत किंवा क्षमता तुम्हाला लागेल, कदाचित तुमची ज्ञानेंद्रियेही वेगळया प्रकारची असावी लागतील.
आता तुम्ही विचाराल, हे चतुर्मिती जग आहे कुठे? कुठल्या ग्रहावर? आपल्याच ग्रहावर असेल तर त्या विश्वाने काही जागा व्यापलेली असेल की नाही? खरोखरच चतुर्मिती जग भौतिक रुपात अस्तित्वात आहे का? शास्त्रज्ञांचे मत आहे की हे शक्य आहे. चतुर्मितीच का त्यापेक्षाही अधिक मिती असलेलं जगही अस्तित्वात असणं शक्य आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस अनेक शास्त्रज्ञ ह्या संकल्पनेने प्रभावित झाले होते. ज्याला आपण स्पिरीच्युअल जग म्हणतो, आपल्या डोळयांनी दिसत नसलं, कानांनी ऐकू येत नसलं, हातांनी स्पर्शता येत नसलं तरी जे अस्तित्वात आहे असं आपण समजतो. किंवा भूत, प्रेत अशा एन्टीटीज् ज्या ह्या जगात अस्तित्वात नाहीयेत, पण तरीही काही वेळा काही व्यक्तींना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो, अशी ही सर्व मंडळी चतुर्मिती जगातील असावीत, आणि चुकून अनिच्छेने किंवा इच्छेने ती आपल्या त्रिमिती जगात डोकावत असावीत हे एक्प्लनेशन त्यांना पटणारं होतं. त्यामुळे चतुर्मिती विश्वाची संकल्पना त्याकाळी फारच पाप्युलर झाली होती. पण मग पुढच्या काळात आईन्स्टाईनने 'काळ' हीच चवथी मिती आहे, असं विधान करून माणसाच्या कल्पनाशक्तीला वेगळीच दिशा दिली. मग टाईम ट्रायव्हल करण्याचा काळ आला. ही संकल्पना लेखकांच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव देणारी होती, सामान्य वाचकालाही भावणारी होती. अजूनही आहे. आपल्या त्रिमिती जगात उपयोगी असलेली ज्ञानेंद्रियेच तेथेही उपयोगी पडतात. म्हणजे काळप्रवास करून तुम्हाला भूतकाळात किंवा भविष्यकाळातही भ्रमण करता येतं. त्यामुळे ही संकल्पना चांगलीच पाप्युलर झाली. तरीदेखील भौमितिक पातळीवरील ही चतुर्मितीची कल्पना नाहीशी झाली नाही.''
अभिजीत काही क्षण थांबला, त्यानं टेबलावरील पाण्याचा ग्लास तोंडाला लावला, आणि एक नजर आपल्या श्रोत्यांवर टाकली. आपलं हे विवेचन ह्यांना किती समजतंय कुणास ठाऊक? पण ते लक्ष देऊन ऐकत तर आहेत.
''गेल्या काही वर्षात नवीन तरुण वैज्ञानिक जरा वेगळाच विचार करत आहेत. त्यांचं म्हणणं केवळ कल्पनेनं चतुर्मिती जग काय असेल ह्याचं चित्र रंगवण्यापेक्षा ह्या जगातून त्या जगात प्रवेश करण्याचा गुप्त दरवाजा, भूयार किंवा तिळा आपण शोधून काढुया. हे खिंडार कसं असेल त्याचा तरी शोध घेऊया. अलीबाबाला चाळीस चोरांची गुहा उघडण्याचा परवलीचा शब्द सापडला होता. तिळा उघड. कदाचित शास्त्रज्ञांनाही अशी एखादी युक्ती सापडेल. त्या संदर्भात एक हायपोथिसिस असा आहे की, ह्या दोन्ही मिती म्हणजे मोबियस स्ट्रीपच्या दोन बाजू आहेत. एकमेकापासून वेगळया परंतु तरीही एकमेकाशी जोडलेल्या. मोबियस स्ट्रीप तुम्हाला माहीत असेलच. असं पहा आपण एक अर्धा इंच रुंदीची, एक साडेतीन चार इंच लांबीची साधी कागदाची पट्टी घेतली. तिच्या दोन्ही टोकांना डींक लावून चिकटवताना ती उलट सुलट करून चिकटवली. म्हणजे सुलट पृष्ठभागावर उलट पृष्ठभाग, पट्टीला एक पीळ देऊन, वेढा देऊन चिकटवली. ह्या रिंगचं वैशिष्टय असं असतं की एखादी मुंगी समजा वरच्या पृष्ठभागावरून चालू लागली तर एक बिंदु असा येईल की ज्याठिकाणी दोन्ही पृष्ठभागांचे ट्रॅगल्स एकमेकाशेजारी उलट सुलट असलेले तुम्हाला दिसतील आणि पुढे पुढे चालणारी मुंगी एका पृष्ठभागावरून दुसऱ्या पृष्ठभागावर पोचेल. वरच्या पृष्ठभागावरून आतल्या पृष्ठभागावर उतरेल. अर्थात मुंगीला आपल्या मर्जीनूसार असा प्रवास करणं कदाचित आवडणार नाही. पण त्याऐवजी पेन्सीलच टोक पुढे सरकवत नेलं तरी काय होतं हे बघता येईल.
अपघाताचा स्पॉट म्हणजे ह्या दोन मित्या असलेली जगांना जोडणारा मोबियस स्ट्रीपवरील भाग असावा. म्हणजे वहान जेव्हा वेगाने, रस्त्याच्या मध्यावरून जात असेल तेव्हा ते वहान आपल्या त्रिमिती जगातून एका पॉईंटला चतुर्मिती जगात प्रवेश करत असावे. बहुधा तो स्पॉट रस्त्याच्या मध्ये असावा, आणि फारसा रुंद नसावा असं मला वाटतं. म्हणूनच केवळ कार्सच ह्या स्पॉटवर चतुर्मिती जगात पडत असतील. पण कार चालवणारी व्यक्तीची ज्ञानेंद्रिये आणि मेंदु चतुर्मिती जगात काम करू शकत नाहीत, भोवतालच्या ह्या विचित्र विश्वाचा अर्थ लावण्याच्या प्रयत्न करणारा मेंदु मग कॉम्प्युटरच्या हार्ड डीस्कप्रमाणे क्रॅश होतो असं म्हणा पाहिजे तर. बऱ्याच जणांना मी काय म्हणतोय लक्षात आलं नसेल तर तो त्यांचा दोष नाही. दोष माझा आहे. मला काय म्हणायचे आहे ते सांगण्याची माझी कुवत मर्यादित असेल. मी असं करतो की पुढील काही दिवसात आपल्या पत्रकार मित्रांच्या मदतीने मी एक लेख मराठीत लिहून काढतो. म्हणजे कदाचित मी काय म्हणतो ते तुम्हाला समजायला साह्य होईल.''
अभिजीत थांबला, आणि आता काय करायचं ह्या विचारांनं गोंधळून तसाच टेबलापाशी घुटमळत उभा राहिला.
मग डॉक्टर चव्हाण उभे राहिले. त्यांनी दोन्ही हातांचे पंजे एकमेकात अडकवून डोक्यावर हात ताणून शरीराला आळोखे पिळोखे दिले. आजुबाजूच्या लोकांमध्ये हास्याची खसखस पिकली. अभिजीतही हंसत खुर्चीवर विसावला, मग डॉक्टर चव्हाण म्हणाले, ''मी डॉक्टरांचे आभार मानतो, त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. आता त्यांना जे काही म्हणायचं होतं ते सर्व सर्वांना समजलं असं उगाच काहीतरी विधान मी करणार नाही. पण एक साधा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटतो, तुमचा हायपोथिसिस योग्य आहे असं गृहीत धरलं तर परत असे अपघात होऊ नयेत म्हणून काय करावं ह्याविषयी काही मार्गदर्शन करू शकाल का?''
अभिजीत काही बोलला नाही, पण तो आपल्या मनातच प्रश्नाचं उत्तर शोधत असावा असं दिसत होतं. त्याच्या चेहऱ्यावर काहीसे गोंधळल्याचेही भाव होते. काही क्षण अशाच शांततेत गेल्यावर वसुधा उभी झाली. ''डॉक्टर, तुम्हाला एका प्रसिध्द वैज्ञानिकाची गोष्ट माहीत असेल.'' तिने बोलायला सुरुवात केली. ''आपल्या मांजरीला आणि तिच्या पिल्लाला घराबाहेर जाता येता यावे म्हणून ह्या हुशार माणसाने घराच्या दरवाजाला दोन भोके पाडली होती. एक मोठे, आईकरता, दुसरे पिलाकरता. मतितार्थ एवढाच की शास्त्रज्ञांना कित्येकदा व्यवहारी पातळीवर मार्गदर्शन करणं कठीण होतं, आणि माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या गृहीणीला ते शक्य होतं. डॉक्टर अभिजीताचं विवेचन ऐकून मला असं सुचवावंस वाटतं की, ह्या चारपाचशे मिटर्स अंतर रस्त्यावर आपण डिव्हाईडर बसवूया. म्हणजे आपल्या कार्स रस्त्याच्या मध्यावर जाणार नाहीत, त्यांना आपली गतीही कमी करावी लागेल.''
कुणी काहीी प्रतिक्रिया देण्याआधीच अभिजीत उभा झाला, आणि पाचसात वेळा टाळया वाजवून मग वसुधाचा हात आपल्या दोन्ही हातात घेऊन तो म्हणाला, ''कॉग्रॅटस् वसुधाबाई. ही योजना सहजच तुम्हा लोकांना अंमलात आणण्यासारखी आहे. येथेच कुणीतरी ऍथारिटीला भेटून ही सूचना प्रत्यक्षात आणण्याची विनंती करण्याची जबाबदारी घ्यावी.''
चार पाच जणांचे हात वर गेले, आणि मग टाळयांचा गजर सुरू झाला.
भोवतालची गर्दी कमी झाल्यावर अभिजीतचा निरोप घेताना डॉक्टर चव्हाणांनी हलक्या आवाजात विचारले, ''डॉक्टर अभिजीत, मला तुमचे वैयक्तिक आभार मानले पाहिजेत. एक तर मोबाईलचा असाही उपयोग करता येईल ही आयडीया तुम्ही मला दिलीत. दुसरं म्हणजे प्रदिपचे हृदयाचे ठोके ऐकून तुम्ही योग्य वेळी त्याला त्याचं हृदय ठणठणीत असल्याचं सांगितलं त्यामुळे त्याला निश्चितच लाभ झाला. पण तुम्ही मेडिकल डॉक्टर आहात हे मला ....''
''डॉक्टर,'' अभिजीत हसत म्हणाला, ''मी मेडिकल डॉक्टर नाही. त्याबाबतीत खरं तर मी अडाणी आहे असं म्हणावं लागेल. अगदी खरं सांगायचं तर मला प्रदिपच्या हृदयाचे ठोके अगदीच अस्पष्ट ऐकू येत होते, आणि ऐकू आले असते तरी त्यातून मला काहीही समजले नसते. पण मला सायकॉलॉजीचा अभ्यास आहे काहीसा. मी त्यावेळी दोन पेशंटस् वर एकाच वेळी उपचार करत होतो. मोबाईलवर मी प्रदिपला जे सांगत होतो, ते इथे वसुधाही ऐकतेय हे मला माहीत होतं.''
''व्वा..व्वा, क्या बात है'' बाजूलाच उभी असलेली वसुधा अभिजीतच्या आवाजाची नक्कल करत म्हणाली.
समाप्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा