सोमवार, २० जून, २०११

कथा तीसरी


अखेर
२० ऑगस्ट आजपासून मी डायरी लिहायला सुरुवात करत आहे. पण हिला डायरी म्हणता येणार नाही. कारण माझ्या वैयक्तिक जीवनात घडणाऱ्या किरकोळ घटनांची नोंद ह्या डायरीत मी करणार नाही. गेल्या पस्तीस वर्षांच्या आयुष्यात तशी नोंद ठेवण्याची गरज मला वाटली नाही. आताही वाटत नाही. पण काल ही घटना घडली, हा अनुभव मला आला, त्यामुळे माझं मनोविश्वच बदलणार आहे, असे मला वाटत आहे. आणि एक शास्त्रज्ञ म्हणून ह्या सर्व बदलांची नोंद ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटत्येय. माझा अनुभव माझ्या काही सहकाऱ्यांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पण मला माहीत आहे, ते त्यांच्याकरता फार कठीण होणार आहे. माझ्या अनुभवावर त्यांचा विश्वास बसणं कठीण आहे. पण मला त्यांच्या मतांची पर्वा नाही. मी डायरी लिहीत आहे माझ्यासाठी. ह्या नव्या अनुभवाला समजून घेण्यासाठी.
घटना घडली तो दिवस. कालचाच दिवस. सकाळी उठल्यापासून मी काय काय केले, माझा मूड कसा होता, माझ्या मनात काय काय विचार घोळत होते, मला सर्व स्पष्ट आठवतेय. अगदी सर्व बारकाव्यांसकट मी तो अनुभव परत जगू शकतेय. तो प्रसंग घडण्याच्या आधीच्या सर्व घटनाही स्पष्ट आठवत आहेत मला. तो क्षण आठवतोयज्या क्षणी मी माझ्या स्टडीतील माझ्या आवडत्या आरामखुर्चीतून उठले, भिंतीशी गेले आणि सरळ दोन पावले पुढे टाकून सहजपणे मी स्थळकाळाची भिंत पार केली.
पण ही घटना सांगण्यापूर्वी, मला माझ्या कामाबद्दल, माझ्या जीवनाबद्दल थोडेसे लिहावे लागेल. मी गेले चवदा वर्षे जेथे राहात आहे ना तो एक अद्यावत फार्म आहे. 'कॅटल ब्रिडींग फार्म'. भरपूर दूध देणाऱ्या जातीवंत गायींची उपज करतो आम्ही. पण केवळ चांगला वळू ठेवून कृत्रिम गर्भरेतनाचे जुनाट तंत्र वापरणारा हा फार्म नाही. अत्यंत आधुनिक, प्रगत, प्रजनन तंत्रशास्त्र वापरून जातीवंत कालवडी तयार करतो आम्ही. आज देशातच नव्हे तर दक्षिण पूर्व आशियात अशी संस्था नाही. ह्या चौदा वर्षांतील पहिली तीन वर्षे उणे केली तर गेल्या अकरा वर्षांतील जीवनाचा प्रत्येक क्षण मी ह्या फार्मच्या प्रयोगशाळेकरता दिला आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.
पहिली तीन वर्षे. त्या दिवसांची आठवण फार अंधुक झाली आहे. जणू मागील जन्माच्या स्मृती. माझे घराकडे लक्ष नाही, मी प्रयोगशाळेत जास्त वेळ घालवते, अनंताबद्दल मला ओढच राहिलेली नाही, त्याच्याकडे मी लक्षच देत नाही, असा तक्रारींचा सूर वाढत गेला, कर्कश होत गेला. त्यात अनेक खऱ्या-खोटया, कल्पित-अकल्पित, लहान-मोठया तक्रारींचे सूर-बदसूर मिसळत गेले आणि एक कर्णकटू भेसूर गोंधळ सुरू झाला. आणि मग एक दिवस हा गोंधळ, हा कोलाहल एका क्षणी एकाएकी थांबला. एक अतूट शांती पसरली. एखाद्या गुहेतून कोंदट वातावरणातून मी एकदम मोकळया मैदानात आले. अनंत मला आणि ह्या फार्मला सोडून गेला आणि मी माझ्या कामाकडे वळले. हा फार्म माझा नाही, म्हणजे माझ्या मालकीचा नाही. पण ह्या फार्मला मी आकार दिलाय. ही अत्याधुनिक प्रयोगशाळा माझ्या प्रयत्नातून तयार झालीय. आज ह्या संस्थेचे रूप पाहिले तर विश्वास बसणार नाही की, केवळ चौदा वर्षांपूर्वी डेन्मार्कहून आणलेल्या एक वळू व दोन गायींच्या भांडवलावर हा फार्म सुरू झाला होता. अमेरिकेहून जेनेटिक्स इंजिनियरींगमध्ये डॉक्टरेट घेऊन पाच वर्षे अनुभव घेऊन, तेथील नोकरी नाकारून, ह्या लहानश्या संस्थेत काम करण्याचा निर्णय घेऊन मी देशात परतले, तेव्हाच माझ्या नजरेसमोर संस्थेचे, प्रयोगशाळेचे हे चित्र उभे होते. पण मला येथे माझ्या ह्या चौदा वर्षांतील कर्तृत्वाबद्दल सांगायचे नाही. स्वत:चेच कौतूक करायचे नाही. मला सांगायचे आहे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसाबद्दल पण म्हणजे कालच्याच दिवसाबद्दल.
रोजच्या प्रमाणे सकाळी फिरायला न जाता मी सरळ प्रयोगशाळेत गेले होते. रात्री नीट झोप लागली नव्हती. मध्यरात्रीपर्यंत मी माझ्या स्टडीरूममध्ये रेफरन्सेस पाहात होते, जुने रिपोर्टस चाळत होते, नोटस् काढत होते. सकाळी उठल्याबरोबर खरे तर मी ठरवले होते की, पटकन् चक्कर टाकून यायचे, आंघोळ करून फ्रेश होऊनच प्रयोगशाळेकडे वळायचे. पण प्रयोगशाळेजवळून जातानाच डॉ. शिंदे आणि बापट ऑपरेशन रूमच्या बाहेर दिसले. मग मी तशीच प्रयोगशाळेकडे वळले. सगुणा जगणार नाही असे माझ्या मनाने सांगितले होते. आदल्या दिवशी सगुणेचे सिझरीन करून तिच्या गर्भाशयातील कालवड बाहेर काढली होती. कालवडीला मी तपासले होते. तिची उंची, तिचे वजन, तिच्या शरीराचा मागचा भाग, सर्व खाणाखूणा सांगत होत्या, सगुणेने परत एक अस्सल कालवड दिली आहे. पण सगुणेची अवस्था मात्र बिघडलेली होती. ऑपरेशनच्या वेळी काय झाले होते कुणास ठाऊक, खूपच रक्त गेले होते. आणि अजूनही स्त्रवणारे रक्त थांबत नव्हते. क्षणाक्षणाला सगुणा मलूल होत चालली होती.
पण ह्या सर्वाला मी निश्चितच जबाबदार नव्हते. खरे तर ह्या कल्पनेला माझा विरोध असल्याचे मी स्पष्ट केले होते. मिटींगमध्ये मी चेअरमनना सांगितले होते, '' सगुणा आता काही तरुण नाही. जेव्हापासून तिच्या गर्भाशयातील गर्भ काढण्यासाठी आपण फ्लश टेकनिक वापरू लागलो आहोत तिला त्रास कमी होतो हे खरे. पण तरीही गेल्या चार वर्षात तिच्या गर्भाशयातून आपण चौदा उत्तम कालवडी देणारे गर्भ काढून घेतले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय गेल्या अकरा वर्षांत आपण तिच्या गर्भात कधी पूर्ण काळ गर्भाची वाढ होऊ दिलेली नाही. नैसर्गिक डिलेव्हरीची तिच्या शरीराला सवंय राहिलेली नाही. विनाकारण आपण ही रिस्क घेऊ नये.''
पण माझं म्हणणं कोणी ऐकले नाही. शंकराचार्य संस्थेला भेट देणार होते. सगुणेची, आशियात सर्वोत्कृष्ट म्हणून विख्यात असलेल्या ह्या गायीची कालवड शंकराचार्यांना दान द्यावयाची होती. ही कालवड पुर्णकाळ तिच्याच गर्भाशयात वाढलेली, तिच्याच रक्तावर विकसित झालेली असेल असे चेअरमननी प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषित केले होते. मी निषेध नोंदवून गप्प झाले होते. नाहीतरी मला त्या क्षेत्रात बोलण्याचा काय अधिकार होता? डॉ. शिंद्यांनी हिरवा कंदिल दाखवला होता आणि आता सगुणा मरायला टेकली होती. काल दुपारपासून डॉ. शिंद्यांची धावपळ चालू होती. पुण्याहून बापटांनाही बोलावले होते. पण मला माहीत होते, सगुणा जगणार नाही. आणि हे कटू सत्य गृहीत धरून मी पुढचा विचार सुरू केला होता. सगुणा मेली तर ताबडतोब तिच्या पोटातून बिजांडकोश काढून घेतला तर काही बिजांडे मिळण्याची शक्यता होती. ह्या बिजांडांचा उपयोग करून घेऊन आणखी काही कालवडी तयार करणे शक्य आहे.
मी चेअरमनना बाजूला घेऊन जर..तर ची भाषा वापरून माझ्या मनातील कल्पना सांगितली.  त्यांनी केवळ एकच प्रश्न केला, ''बिजांडकोशातून किती बिजांडे मिळण्याची शक्यता आहे?''  ह्या प्रश्नाचे निश्चित उत्तर देणे अशक्यच होते. आतापर्यंत सगुणेच्या बिजांडकोशातून एकूण किती बिजांडे उपयोगात आणली गेली हे सांगता येईल. पण सगुणा तिच्या आईच्या पोटात असताना तयार झालेल्या बिजांडकोशात किती बिजांडे निसर्गाने तयार केली होती, किती टिकली होती ह्याचा हिशोब कोणाकडे होता? पण तरीही मी चटकन् उत्तर दिले, ''कमितकमी शंभर आणि जास्तीतजास्त दोनशे'' चेअरमननी हिशोब केला होता, '' आपण समजू साठच बिजांडे आपल्या उपयोगी पडतील. साठ कालवडींचे सहा लाख. ठीक आहे मॅडम. तुम्ही सर्व तयारी करायला सांगा''
सकाळी प्रयोगशाळेत जाऊन मी झालेली तयारी पाहात होते, सर्व उपकरणे ठीक आहेत हे पाहात होते. तोच डॉ. शिंद्यांचा निरोप आला, 'सगुणा गेली' सगुणेवर परत ऑपरेशन करण्यात आले. तिच्यावर म्हणजे तिच्या मेलेल्या शरीरावर.  म्हणजे तिच्या पोटाची चिरफाड करण्यात आली. बिजांडकोश काढून व्यवस्थित फ्रिजमध्ये ठेवण्यात आला. पण ह्या सर्व कामात दुपार होऊन गेली. परत घरी येऊन मी मग मस्त आंघोळ करून घेतली. कुसुमने तयार केलेले जेवण घेतले. मग कॉफी घेऊन मी स्टडीत आले. मनाला आणि शरीराला एक विलक्षण थकवा जाणवत होता. माझ्या आवडत्या आरामखुर्चीत मी बसले. मला वाटत होतं, आरामखुर्चीच्या पाठीला डोकं टेकताच झोप लागेल मला. पण शरीर आणि मन थकलेले असूनही मला झोप आली नाही.
मला आठवतेयं, स्पष्ट आठवतेयं. माझ्या पापण्या मिटलेल्या होत्या, पाठीचे, खांद्याचे स्नायू ढिलावले होते, श्वास मंदपणे चालू होता. वर गरगर फिरणाऱ्या पंख्याची गुणगुण कानात घुमत होती आणि माझ्या बंद पापण्यांसमोर सगुणेचा उस्तरलेला देह दिसत होता. नितळ गुलाबी रंगाची सडे, ती पुष्ट कास, दोन पायांमध्ये पांढऱ्या मुलायम लव असलेल्या कातडीला छेद दिला होता आणि त्यातून आतील अवयव दिसत होते. गर्भाशयाची पिशवी, योनीमार्ग, रक्तवाहिन्या आणि तिचे गोठलेले निर्जिव पण अजूनही पाणीदार असलेले डोळे. माझ्या डोळयांसमोरून ते चित्र बाजूला करण्याचा, झटकून टाकण्याचा प्रयत्न मी केला, पण तरीही त्या प्रतिमा जात नव्हत्या. मला झोपायचे होते. सर्व व्यवस्थित झाले होते. मी समाधानात होते. सगुणा नव्हती, पण तिचा बिजांडकोश होता. भविष्यात निदान आणखी साठ सत्तर कालवडी सगुणाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा सांगत आकार घेणार होत्या. पण ते चित्र माझ्या नजरेसमोरून जातच नव्हते. ते लालनिळया रक्तवाहिन्यांनी आच्छादलेले गर्भाशय, रक्तवाहिन्यातून झटक्याझटक्यांनी बाहेर पडणारे रक्त आणि ते डोळे. मी झटक्यात खुर्चीवरून उठले. मला भान नव्हते मी काय करते आहे. स्टडीतून बाहेर जाणाऱ्या दरवाजाकडे न वळता मी आतल्या भिंतीकडे वळले, भिंतीजवळ पोचले, क्षणभर थबकले आणि दोन पावले पुढे टाकून मी सहज स्थळकाळाची भिंत पार केली.
ती खोली लहानशीच होती. पण तिच्या भिंती वेगळया होत्या. एक प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बनवलेल्या. त्यांच्या कणाकणांतून प्रकाश झिरपत होता. मंद स्वच्छ प्रकाश. भिंतीला लागून अनेक मिटर्स असलेली पॅनेल्स होती. पण माझे लक्ष होते माझ्यासमोर उभ्या असलेल्या वयस्क बाईवर. खरं तर बाईपणाच्या काही खुणा तिच्या शरीरावर दिसत नव्हत्या. तिचे केस बारीक कापलेले होते. पुरुषी पध्दतीने अंगावरील कपडे तिच्या शरीरावर घट्ट बसलेले होते, अर्धपारदर्शक. तिचे डोळे काचेच्या डोळयांसारखे दिसत होते, निर्जीव व पाणीदार. मी तिच्याकडे पाहून हसले, पण तिच्या चेहऱ्यावर प्रतिसादाचे हास्य येण्याऐवजी भिती आणि गोंधळल्याचे भाव उमटले. पुढे होऊन तिच्याजवळ जावे, तिचा हात हातात घ्यावा, तिच्या खांद्याला ....गालाला स्पर्श करावा असे वाटले मला. पण त्याचवेळी खोलीतील प्रकाशात निळया रंगाची छटा आली, गडद होत गेली. माझ्या नजरेसमोरून तिची प्रतिमा नाहिशी झाली. समोर भिंत होती आणि भिंतीत एक दार होते. एक माणूस दरवाजात उभा होता. त्याच्या ओठाची हालचाल होत होती, पण मला त्या स्त्रीचा आवाज आला. माझ्या नजरेसमोरून तो दरवाजा नाहीसा झाला. परत एकदा ते पॅनेल समोर आले. आणि मग मला उजव्या कोपऱ्यात ती स्त्री दिसली, एका बाजूने डोळयांच्या कोपऱ्यांतून ती पहात होती माझ्याकडे. मग माझ्या नजरेसमोर ती रिकामी भिंत आली. क्षणभरात परत एकदा ती मागची भिंत. दरवाजा आता बंद होता.
आणि एकदम माझ्या लक्षात आलं माझं शरीर मी मागेच सोडले आहे. पण मी मात्र ह्या येथे आले आहे, ह्या स्त्रीच्या मनात मी प्रवेश केला आहे. ह्या अनोळखी स्त्रीच्या नजरेतून मी जग पाहात आहे. मी आले तेव्हा ती आपल्या प्रतिबिंबाकडे पाहात होती. त्याचवेळी मी ती भिंत ओलांडून कायाप्रवेश केला होता तिच्या अस्तित्वात. माझ्या अस्तित्वाची चाहूल तिला निश्चितच लागली होती. म्हणूनच ती गोंधळलेली दिसत होती. मला काय झाले ते समजून घ्यायचे होते, ते नवे विश्व पाह्यचे होते. त्यासाठी मला तिच्या शरीराचा उपयोग करुन घ्यावा लागणार होता, तिच्या डोळयांनी पहावे लागणार होते, तिच्या कानांनी ऐकावे लागणार होते. मला तिच्याशी दोस्ती करायची होती, तिच्याशी संवाद साधायचा होता. मी स्वत:ला आक्रसून घेतले होते. परत मी पुढे सरकले. आता ती भिंतीजवळ सरकली होती. समोर भिंत दिसत होती मला. काही क्षण ती तशीच उभी राहिली आणि मग तिने हालचाल केली. समोरच्या खिडकीत एक चौकोनी खिडकी तयार झाली. काचेची खिडकी. पलिकडे अंधुक प्रकाश होता. लालसर मंद प्रकाश आणि त्या प्रकाशात लांबट वर्तुळाकार आकाराच्या अनेक पारदर्शक पिशव्या अधांतरी लटकत होत्या. जमिनीतून आणि छतातून असंख्य लहानमोठया नळयांचे ह्या पिशव्यांभोवती जाळे तयार झाले होते. अन् मग मला जाणवले त्या पिशव्यांमध्ये काहीतरी हालचाल होत आहे. ती तालबध्द हालचाल पाहिल्यावर माझ्या एकदम लक्षात आले, त्या पिशव्या म्हणजे गर्भाशये आहेत. नजर पोचत होती तोपर्यंत त्या हॉलमध्ये अनेक गर्भाशये लटकलेली दिसत होती आणि प्रत्येक गर्भाशयातील गर्भ हलत होते. ते सर्व गर्भ मानवी गर्भ होते. निश्चितच तो एक ह्यूमन ब्रिडींग फार्म होता. जातीवंत मानवी पोरांचे उत्पादन करणारा फार्म. मला वाटते, मला बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यामुळे मी काहीतरी हालचाल केली असावी. हालचाल करायला मला शरीर नव्हते हे खरे पण त्या आश्चर्याच्या भावनेची लाट कुठल्या ना कुठल्या प्रकारे उसळलीच असावी.
मला एक झटका बसला आणि मी डोळे उघडले. माझ्या लक्षात यावयास बराच वेळ लागला. मग लक्षात आले, मी माझ्या स्टडीमध्ये परत आले आहे. पण मी खुर्चीत नव्हते. जमिनीवर पडले होते आणि माझ्या भोवती बरेच लोक जमा झाले होते. कुसूमने माझा हात हातात धरला होता. तिचा चेहरा रडवेला दिसत होता, मागे भोवती इतर शेजारी दिसत होते, पण त्यात डॉ. सानेचाही चेहरा मला दिसला तेव्हा मी चकित झाले. त्यांच्या प्रेमळ चेहऱ्यावर हास्य फुलले,''काय मॅडम, आता बरं वाटतंय ना?''
त्यांच्या प्रश्नाला मी होकार तर भरला पण मी विचार करत होते, काय झालंय मला, ही सर्व मंडळी माझ्याभोवती का गोळा झाली आहेत? मी धडपडत उठून बसले, भोवताली पाहिले. बहुधा माझ्या मनातील गोंधळ माझ्या चेहऱ्यावर उमटला असावा. कारण मला आधार देऊन उभे करत म्हणाले , ''काही घाबरायचं कारण नाही आता. अतिश्रमामुळे होतं असं काहीवेळा. जरा भोवळ आली होती तुम्हाला. आणखी तीन चार दिवस सक्तीने विश्रांती घ्यायला लावणार आहे मी तुम्हाला. वाचनसुध्दा करायचे नाही. केवळ आराम.''
त्यांच्या मृदू आवाजात एक अधिकार होता. एकदम वाटलं मला, मला काय करायला पाहिजे हे समजतंय मला. कुणी असे मला हुकूम नाही सोडू शकत. मी काही बोलणारच होते पण डॉक्टर आता कुसूमशी बोलत होते, ''बरं का कुसूम. मॅडमना बिलकूल हलू द्यायचे नाही. काही झालं तर मला ताबडतोब निरोप द्यायचा. भरपूर झोपेची आणि पूर्ण विश्रांतीची गरज आहे तुम्हाला. सिडेटिव्ह देतोय मी तुम्हाला. भरपूर झोप घ्या आता.''
डॉ. सान्यांचा आणि कुसूमचा आधार घेऊन मी माझ्या पलंगाशी पोचले. खरोखरच मला प्रचंड थकवा आला होता. अगदी गळून गेले होते. माझे डोके विलक्षण दुखत होते. नकळत माझा हात कपाळाकडे गेला, कपाळावर बँडेज बांधले होते. माझी नजर त्या भिंतीकडे गेली. जवळच्या टेबलावरील कित्येक पुस्तके खाली जमिनीवर अस्ताव्यस्त पडली होती आणि जमिनीवर रक्ताचे डाग दिसत होते. मी काय पाहिले, काय अनुभवले? हे येथे काय झाले आहे माझ्या अनुपस्थितीत? मला विचार करायचा होता. मला समजून घ्यायचे होते. मला एकांत पाहिजे होता. मी उशीवर डोके टेकले. मला माहीत होते, मी झोपतेय असं पाहिलं की गर्दी निघून जाईल. मग मला शांतपणे विचार करता येईल. विश्लेषण करता येईल. मी डोके टेकले आणि माझ्या नकळत खरोखरच झोपेत गेले.
26 ऑगस्ट: तो घटना होऊन आज सहा दिवस झालेत. आज मी प्रयोगशाळेत गेले होते. गेल्या चौदा वर्षांत असे कधी घडले नव्हते. मी फार्मवर आहे आणि प्रयोगशाळेत गेले नाही असं कधी झाले नव्हते. पण माझ्या आयुष्यात पूर्वी कधीही घडल्या नव्हत्या अशा घटना त्या दिवशी घडल्या नव्हत्या का? काय झाले ह्याची सर्व माहिती मी हळुहळू कुसूमकडून काढून घेतली. कॉफीचा कप घेऊन स्टडीमध्ये गेले. कुसूमचे स्वैपाकघरातील काम संपतच आले होते. भांडी घासून पुसून कपाटात ठेवली गेली होती. ओटाही धुतला होता. तापलेले दूध फ्रिजमध्ये ठेवण्याकरता थंड करत ठेवले होते  आणि त्याचवेळी कुसूमला स्टडीरूममध्ये काहीतरी पडल्याचा, काहीतरी आदळल्याचा आवाज ऐकू आला होता. माझी अस्पष्ट किंचाळीही तिच्या कानावर आली होती. ती धावतच माझ्या स्टडीकडे आली होती आणि आतले दृश्य पाहून दरवाजातच खिळली होती. जड शिसवी टेबल आडवे पडले होते. त्यावरील पुस्तके जमिनीवर पडली होती. मी आंधळयासारखी खोलीत अडखळत फिरत होते. तिने माझ्याकडे येण्यासाठी पाऊल टाकले त्याचवेळी मी तिच्याकडे तोंड केले होते. माझे डोळे सताड उघडे होते, पण जणू मला दिसतच नव्हते. माझ्या कपाळावर जखम होती आणि तिच्यातून वाहणाऱ्या रक्ताने माझा चेहरा लाल झाला होता. कुसूमने जोरात किंचाळायला सुरूवात केली होती. तिच्या किंचाळया ऐकून शेजारची छाया धावत आली होती. तिने मला झोपवण्याचा प्रयत्न केला परंतु माझे सर्व शरीर ताठरले होते. मी काहीतरी बडबडत होते. मग एकच धावपळ झाली. कुणीतरी डॉ. सान्यांना बोलावले होते.
पण ही झाली इथली हकिकत. मी विचार करत होते, माझ्या त्या अनुभवाबद्दल. ते स्वप्न नव्हते. माझ्या मनाचा खेळ नव्हता. मी येथून गेले होते, कुठल्या तरी अज्ञात विश्वात. कदाचित अनेक शतके पार करून भविष्यकाळात. किंवा मला वाटते तसेच असावे. मी टाईम ट्रायव्हल केला नसावा, तर आता ह्या क्षणाला अस्तित्वात असलेल्या परंतु हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या विश्वात गेले असावे. मी कुठे गेले असावे ह्याचा शोध घ्यायचा असेल तर केवळ विचार करून काही साधणार नाही. मला परत त्या विश्वात गेले पाहिजे. परत त्या स्त्रीला भेटले पाहिजे. मला तिला समजून घ्यायचे आहे. तिचे दु:ख मला उमजून घ्यायचे आहे. मला विश्वास आहे ती फार दु:खी आहे. प्रचंड दु:खाने तिला ग्रासलेले आहे. तेव्हा मला काही जाणवले नाही पण आता माझ्या लक्षात आले आहे की, तिच्या दु:खाने माझ्या अस्तित्वालाही स्पर्श केला आहे. मला ते विश्व, त्या विश्वातील प्रगत तंत्रज्ञान जाणून घ्यायचे आहे. प्रजननशास्त्रात त्यांनी केलेली प्रगती समजून घ्यायची आहे. पण खरं मला ओढ आहे तिचं दु:ख जाणून घेण्याची. तिच्या दु:खात सहभागी होण्याची. त्या दु:खाची जातकूळी मला समजून घ्यायची आहे. कारण त्या दु:खाची  छाया माझ्यावरही पडलीय. मी परत त्या विश्वात जाणार आहे. इतक्या दिवसानंतर प्रयोगशाळेत जाऊनही मी तेथे फार वेळ थांबू शकले नाही. मला वाटत होते की, एकदा कामात लक्ष घातले की, मी तो अनुभव काही वेळाकरता का होईना विसरून जाईन. पण तसे झाले नाही. परत परत मी त्याच विचारात, त्याच आठवणीत, त्याच तंद्रीत जात राहिले. माझ्या सहकाऱ्यांतही बदल झाला आहे. पूर्वीचा मोकळेपणा आता राहिलेला नाही. मला वाटते, त्यांना काय झाले ते जाणण्याचे कुतूहल आहे. पण हे कुतूहल ते लपवत आहेत. माझ्या नजरेला कुणी सरळ नजर देत नाहीये. दूरदूरच राहात आहेत ते. मला माहीत आहे, त्यादिवशी काय झाले त्याच्या कहाण्या वेगवेगळया रूपात त्यांच्या कानी गेल्या असणार. पण त्यांना माझी भिती वाटते ही जाणीव मला क्लेशकारक होत आहे.
दुपारी चारच्या सुमारास चेअरमन आले, सरळ माझ्या ऑफिसातच. तब्येतीची जुजबी चौकशी करून त्यांनी सरळ विषयालाच हात घातला. दोन दिवसांपूर्वी संचालक मंडळाची मिटींग होऊन गर्भविभाजनाच्या माझ्या प्रॉजेक्टवर विचार झाला होता. डॉ. एस. एम. बिलाडसननी एका बिजाडाचे विभाजन करून दोन समानधर्मी बिजांडे करण्यात यश मिळवल्याचे मी वाचले होते. तेव्हापासून हा प्रयोग करण्याचे माझ्या मनाने घेतले होते. चार वर्षांपूर्वी तसे प्रपोजल मी दिले होते आणि सातत्याने ह्या प्रॉजेक्टला फंडींग मिळावे म्हणून त्याचा पाठपूरावा केला होता. आज आमच्या मंडळाने हा प्रॉजेक्ट मान्य केला होता.  खरं तर किती आनंदाची बातमी ही! तयारीसाठी मला युरोप अमेरिकेची टूर करता येईल. अनायसे इंग्लंडमध्ये सीड बंधूंनी विकसित केलेल्या फ्लश तंत्राचाही जास्त अभ्यास करता येईल. तसं म्हटले तर गर्भाशयातून दुसऱ्या दाई गाईच्या गर्भाशयात गर्भबीजाचे आरोपण करण्यासाठी गर्भोशयात द्रवाचा फवारा सोडायचा आणि दुसऱ्या नळीने हा द्राव खेचून घ्यायचा. ह्या द्रावावाटे आतील गर्भबीज काढायचे हे तंत्र आम्ही सहा वर्षांपासून वापरत आहोत. परंतू आमच्या तंत्रात काहीतरी चूक राहिली आहे असं मला वाटतंय. कारण आमच्या येथे आरोपण केलेल्या गर्भबीजांचे नष्ट होण्याचे प्रमाण काहीसे जास्त आहे. डॉ. शिंद्यांचे मत मात्र हा हवामानाचा परिणाम आहे, असे आहे. ह्या संधीची किती दिवसांपासून मी वाट पाहात होते. पण मला फारसा आनंद झालेला नाही.
28 ऑगस्ट : आज मात्र मी फार खुष आहे. मला वाटायला लागलं होतं की तो एक अपघातच होता. असा एक अपघाती क्षण होता की, त्या स्त्रीची मन:स्थिती व माझी मन:स्थिती आणि ह्या अनंत विश्वातील काही अज्ञात घटना अशा काही जुळून आल्या होत्या की, स्थळकाळाची भिंत ओलांडून मी तिच्यापर्यंत पोचले होते. माझी खात्री होत होती की, तसा क्षण परत येणार नाही. आता केवळ त्या अनुभवाची स्मृती मरणापर्यंत माझ्या मनात सलत राहाणार आहे. त्या स्त्रीचे ते दु:ख मात्र माझ्या मनावर, माझ्या अस्तित्वावर झाकोळून राहाणार आहे. पण आज अचानक तो अपघात परत घडला. परत एकदा मी त्या विश्वात जाऊन आले. तिला भेटून आले. पण मला उत्तेजित होणे योग्य नाही. भावनाविवश न होता त्या घटनेचे नीट वर्णन करायला हवे.
सकाळी लवकरच मी प्रयोगशाळेत पोचले होते. प्रेरणाच्या गर्भाची दाई गायीच्या गर्भाशयात पूर्ण वाढ झाली होती. प्रेरणा मोठया बांध्याची. तिचे वासरूही तसेच मोठया शरीराचे असणे साहजिकच होते. पण दाई गायी असतात बहुधा सर्वसामान्य गावठी जातीच्या. लहान बांध्याच्या. मग नैसर्गिक डिलिव्हरी केली तर प्रॉब्लेम निर्माण होतात. कालवडीला इजा पोचण्याचा धोका असतो. त्यापेक्षा अशावेळी सिजरीन करून कालवड काढायची ही नेहमीची पध्दत. डॉ. शिंद्यांच्या हातात नक्कीच कसब आहे. त्यामुळेच त्यांनी घेतलेला प्रत्येक छेद नेमका आणि सफाईदार असतो. कामात लक्ष लागल्याने मी आज बरीच रिलॅक्स झाले होते. कुसूमने आज माझी आवडती मशरूम्सची भाजी केली होती. जेवण झाल्यावर मी आरामात खुर्चीवर बसले होते. काही दिवसांपूर्वी आलेले रिपोर्टस् वाचत होते. फारच इंटरेस्टींग. 27 वर्षांच्या एका स्त्रीच्या मेंदूला इजा झाल्याने ती मृत्यूशय्येवर होती. तिच्या पोटात साडेपाच महिन्यांचा गर्भ. नवऱ्याने आणि आप्तांनी सुचवले की, मेंदू जरी निकामी झाला असला तरी लाईफ सपोर्टिंग सिस्टीमने शरीर जिवंत ठेवावे, गर्भाची पूर्ण वाढ होऊ द्यावी. डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले. डॉक्टरांनी छातीचा भाता चालू ठेवला. हृदय धडधडत ठेवले, शरीर जिवंत ठेवले. ह्याकरता सातत्याने शरीराच्या कार्यावर लक्ष ठेवावे लागले. मेंदूचे मार्गदर्शन नसलेल्या, शरीरातील अवयवांना कार्यरत ठेवणे, रक्त शुध्द राखणे, हे फारच कठीण. पण आधुनिक तंत्रज्ञान वापरून डॉक्टर्स गर्भाची वाढ करण्यात यशस्वी झाले. मुलाला बाहेर काढण्यात आल्यावर लाईफ सपोटाअग सिस्टीम बंद करून शरीराला मरण्याची मूभा देण्यात आली. मेंदू तर आधीच मेला होता. अभूतपूर्व प्रयोग. रिपोर्ट वाचून माझं मन सुन्न झाले होते. पण त्याचबरोबर एक प्रकारची उत्तेजनाही होती. मेंदू थकल्यासारखे वाटत होते, कागद बाजूला ठेवून मी डोळे मिटले आणि ...
तिच्या बरोबर आणखी पाचजणी बसल्या होत्या. सर्व गप्प होत्या, एकाग्र नजरेने माझ्याकडे, म्हणजे तिच्याकडे पाहात होत्या. माझ्या ताबडतोब लक्षात आले. ती माझ्या भेटीबद्दल बोलत होती आणि त्याचवेळी मी येऊन पोचले होते. तिला माझा प्रवेश जाणवला असावा, त्यामुळे ती अशी एकाएकी गप्प झाली होती. मला तिला घाबरावयाचे नव्हते. तिला समजून घ्यायचे होते. तिच्या डोळयांनी ते विश्व बघायचे होते, कानांनी ऐकायचे होते. तिला सांगायचे होते, मी तिची मैत्रिण आहे. मी माझे अस्तित्त्व आक्रसून घेतले.
किती वेळ मी तिच्याबरोबर होते, कुणास ठाऊक. पण मी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा खोलीमध्ये दिवे लागलेले होते. मला झोपेतून उठल्यासारखे वाटत होते. माझे शरीर पलंगावर निपचित पडले होते. समोर खुर्चीवर कुसूम बसली होती. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण.. मला पलंगाला बांधून ठेवले होते. माझे हातपाय पलंगाच्या दोन्ही बाजूंच्या गजांना बांधलेले होते. संतापाची एक लाट माझ्या मेंदूतून निघून शरीरभर पसरली. पण माझी धडपड ऐकून कुसूम उठली. माझ्या चेहऱ्याकडे एक नजर टाकून तिने घाईघाईने माझे हातपाय मोकळे केले. मला बसते करून तिने थर्मासमधील कॉफी मला पाजली. माझी नजर खोलीभर फिरली. सर्व साफसूफ होते. पण माझ्या पुस्तकाच्या कपाटाची काच फुटलेली दिसत होती. माझ्या अंगावरील कपडे बदललेले होते. माझ्या कोपरापाशी हाताला बँडेज बांघलेले दिसत होते. मी कुसूमकडे पाहिले, कुसूमचा चेहरा यातना व अपराधीपणाच्या छायेने काळवंडला होता. मी घडयाळाकडे पाहिले, रात्रीचे साडेनऊ वाजत होते. म्हणजे निदान सात तास तरी मी ह्या माझ्या जगात नव्हते. पण म्हणजे मी एवढा वेळ तिच्याबरोबर तिच्याबरोबर होते का? मी काय पाहिले, काय ऐकले, तिच्याशी माझा काय संवाद झाला हे सर्व सविस्तर  शब्दश: लिहिण्याचे काही प्रयोजन नाही. पण महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करायलाच हवी.
त्या सहा स्त्रिया त्या ब्रिडींग फार्मवरील कर्मचारी आहेत. खरे तर तेथील सर्व महत्त्वाचे काम कॉम्प्युटर्सच करतात. एकाच वेळी वेगवेगळया विकासावस्थेत असलेल्या हजारो गर्भांना वाढवायचे काम त्याशिवाय कसे होणार? तो फार्म म्हणजे कल्पना करा की हजारो गर्भाशये ज्या शरीरात आहेत, असे एक अवाढव्य शरीरच आहे, आणि हा कॉम्प्युटर त्या शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू. ह्या मेंदूवर लक्ष ठेवणारे कर्मचारी सर्व पुरूष आहेत. पण मग ह्या सहा स्त्रिया तेथे काय करीत आहेत?
29 ऑगस्ट: काल लिहिता लिहिता बाहेरून डॉक्टरांची चाहूल लागली, मग घाईघाईने मी ही डायरी उश्याखाली लपवली. डॉक्टर आत आले, त्यांचा चेहरा फारच गंभीर होता, त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे फसवे हास्य मला फसवू शकले नाही. डॉक्टर माझ्या शेजारी बसले, माझा हात त्यांनी हातात घेतला. क्षणभर, क्षणभरच मला असे वाटून गेले की, त्यांच्या हातांच्या ओंजळीत चेहरा खुपसावा आणि ढसाढसा रडावे. पण तो विचार झटकून टाकून मी त्यांच्याकडे पाहात स्वस्थ पडून राहिले. काही वेळाने त्यांनी एकदम विचारले,'' दुपारी कॉफी घेतलीत, आराम करायला येथे आलात, आरामखुर्चीवर बसलात आणि मग काय झाले? आठवतंय तुम्हाला?''
मला सर्व आठवत होते, पण त्यांना सांगून काय उपयोग होता? मी अंदाज करू शकतेय, त्यांच्या मनात काय असेल, ह्या सर्व घटनांचा अर्थ ते कसा लावत असतील. वेगवेगळे लोक, शब्द वेगवेगळे वापरतील, पण सर्वाचा मतितार्थ एकच असेल. त्यांना वाटत आहे, माझे डोके फिरले आहे, वेडाचे झटके यायला लागले आहेत मला आणि हे असे होण्याची कारणमिंमासा त्यांनी काय केली असणार हे ही मला माहीत आहे. ते म्हणत असणार मॅडम हुशार आहेत, त्यांच्यात काम करण्याची धडाडी आहे, पण अखेर आणि प्रथम, त्या स्त्री आहेत. वैवाहिक सुख, संततीसुख ही नैसर्गिक गरज आहे स्त्रीची. स्त्री म्हणजे साक्षात वात्सल्य. ह्या भावनांना कुठेतरी वाव मिळालाच पाहिजे. पण मॅडम हट्टी. त्यांनी हे सर्व नाकारले, स्वत:ला कामात बुडवून घेतले. पण असे किती दिवस चालणार? आता शरीरातील, मनातील स्त्रीत्त्व बंड करून उठलंय. एका विकृत मार्गाने. हेच विश्लेषण असणार त्यांचे. मी माझा अनुभव त्यांना सांगितला तर म्हणतील ढासळलेल्या मनाचे खेळ हे. मी मनाशी ठरवले आहे, कुणाला काही सांगणार नाही मी. साऱ्यांनी मला सल्ला दिलाय. काही दिवस दुसरीकडे कुठेतरी जावे मी. वातावरणात बदल. महाबळेश्वरला आपला चेअरमनसाहेबांचा बंगला आहे एक. कुसूमला घेऊन काही दिवसांसाठी जावे तेथे. माझा होकार गृहीत धरून चेअरमनसाहेबांशी मी स्वत: बोलतो असे आश्वासनही दिले डॉक्टरांनी. मी केवळ मान डोलावत ऐकत राहिले. त्यांनी दिलेल्या गोळया घेतल्या आणि ते गेल्याबरोबर डायरी काढून लिहावयाला घेतली.
त्या समाजाची रचना कशी आहे हे मला नीट समजले नाही अजून. कसे समजणारतिला त्या फार्मवर बंदीच करण्यात आले आहे. पण तरीही त्यांच्या बोलण्यातून काही गोष्टी मला स्पष्ट झाल्या आहेत. मानवाची नवीन पिढी निर्माण करण्याचे कार्य कित्येक  वर्षांपासून स्त्रियांकडे नाहीये. गेल्या अनेक पिढया हे कार्य ह्या शास्त्रज्ञांच्या, तंत्रज्ञांच्या, खरं तर कॉम्प्युटरच्या नियंत्रणाखाली होत आहे. ह्या ब्रिडींग फार्म्ससारखे काही फार्म्स वेगवेगळ्या जागी होते. सर्वच फार्म्सवर स्त्री पुरुष गर्भांची वाढ केली जायची. परंतु आता हा फार्म सोडून कुठेही स्त्री गर्भ जगवले जात नाहीत, वाढवले जात नाहीत. केवळ ह्या फार्मवर काही ठराविक स्त्रीगर्भांची काही ठराविक काळापर्यंत वाढ केली जाते. एकदा का ह्या स्त्री गर्भांच्या शरीरात स्त्री बिजांडकोश आकारात आला की ह्या गर्भाचे काम संपले. बिजांडकोश काढून घेऊन गर्भ नष्ट केला जातो. मग ह्या बिजांडकोशांतून त्या गर्भबीजांडांचा पुरवठा दुसऱ्या अशा फार्म्सना केला जातो. हा फार्म सोडून इतर कुठल्याहीं ब्रिडींग फार्मवर स्त्रीगर्भ वाढवले जात नाहीत, केवळ नर गर्भांचीच वाढ केली जाते. पण हे सर्व काम प्रयोगशाळेतच होत असेल तर ह्या सहा स्त्रिया येथे काय करत आहेत? आता तर ह्या निरूपयोगीच आहेत असं म्हणावे लागेल. आपल्या प्रजनन अवयवांचा उपयोग त्यांनी फार्मसाठी करू दिला आहे. आपल्या जगात वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आपले लैंगिक अवयव, आपली योनी, आपले स्तन, आपले ओठ वापरायला देतात ना पुरुषांना! त्या जगात ह्या स्त्रिया आपले बिजांडकोश, आपली बिजांडे, वापरायला देत आल्या आहेत, ह्या  ब्रिडींग सेंटर्सना. हे लक्षात आलं, माझं मन किळस, शिसारी, भीती, चीड  आणि दु:ख ह्या अनेक भावनांनी अंधारून आलं. सुन्न झाले मी.
मी ठरवलं, मी कुठेही जाणार नाही. महाबळेश्वरला नाही आणि युरोपलाही नाही. मी ह्याच खोलीत राहाणार आहे. जास्तीतजास्त वेळ येथेच घालवणार आहे. कारण तिने माझी आठवण केली तर त्या आठवणीचा धागा पकडून त्या जगात जाणं मला येथेच शक्य होईल असं मला वाटतं. त्या जगात, त्या समाजात त्या कशा राहात असतील ह्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा येतो. पण तरीही मला तेथे जायचे आहे, त्यांना भेटायला, त्यांच्या मदतीला.
आतासुध्द मी लिहीत आहे ती स्टडीमध्ये बसूनच. दार लावून घेतले आहे मी. कुसूम बाहेरून हाका देत्येय. बिचारी लहानपणापासून माझ्याकडे आहे. मला खायला प्यायला घालतेय. माझी सगळी काळजी घेतेय. मला पोरगी असती तर हिच्याच वयाची असती. पण इथे पहा ना, पोरगीच आईची भूमिका बजावतेय.
8 सप्टेंबर : गेल्या आठ-दहा दिवसांत मी डायरीला हातही लावलेला नाही. लिहायला अंगात बळ नव्हते आणि मनात इच्छाही नव्हती. एका विचित्र आवर्तनात मी फिरत आहे. ह्या भिंतीवरून त्या भिंतीवर, त्या भिंतीवरून परत ह्या भिंतीवर आपटत राहाणाऱ्या चेंडूसारखी मी ह्या व त्या जगात फेऱ्या घालत होते. पण आता हे सर्व थांबणार आहे. हे सर्व कसे शक्य झाले हे मला माहीत नाही. आणि माहीत करून घ्यायची इच्छाही नाही. पण एवढे खरे की, त्या स्त्रीशी संवाद साधला गेल्यानंतर मला ह्या विश्वातून त्या विश्वात जाणे - येणे सहजशक्य झाले. ह्या स्थळकाळाच्या भिंती मी मन मानेल तेव्हा सहज पार करू शकत आहे. मला वाटतं, ह्याचे कारण म्हणजे ती सातत्याने माझा विचार करत असते हे असावे. ह्या विश्वाबद्दल मी तिला बरीच माहिती दिली आहे आणि माझ्याबद्दलही. तिच्या मनात माझं जाणं-येणं हे तिने केवळ मान्यच केले आहे असे नाहीत तर ती माझी वाटच पाहात असते. तिच्या मनात आमच्या गप्पा आता इतक्या सहज झाल्या आहेत की, कधी कधी मला हे समजेनासे होते की, मी तिच्या मनात आहे आणि तिच्याशी बोलत आहे की, ती माझ्या मनात आहे आणि माझ्याशी बोलत आहे.
पण आज मात्र सकाळपासून मी आग्रहाने तेथे जाण्याचे नाकारत आहे. मला जाणवत आहे, ती मला बोलावत आहे. पण निश्चित निर्णय घेऊनच मला तिच्याकडे जायचे आहे. माझ्या स्टडीबाहेर येऊन आता मी व्हरांडयात बसले आहे. माझ्यापासून जरा अंतरावर कुसूम बसली आहे. ह्या पंधरा दिवसांत किती फरक पडलाय तिच्यात. यातना, भिती, असहाय्यता ह्या भावनांनी तिचा चेहरा काळवंडून गेला आहे. एकदम प्रौढ दिसायला लागलीय. ह्या तिच्या  स्थितीला मीच कारणीभूत आहे. पण मी तरी काय करणार? मी देखील किती सहज करत्येय दिवसरात्र! ती माझ्याभोवती आहे, माझ्यावर लक्ष ठेवून. सतत धास्तावलेली. पण हे काय चालले आहे हे मी तिला कसे समजावून सांगणार? माझ्या अंगावरून सहज नजर टाकली तरी दिसत्येय, माझं शरीर जखमांनी, ओरखडयांनी व्यापलेले आहे. जागोजाग लालसर वळ उठले आहेत. मनगटाजवळ, घोटयाजवळ  कातडी सोलून निघाली आहे. पण माझी त्याबद्दल तक्रार नाही. पण मनात एक कोडे आहे, मी तेथे गेल्यावर हे शरीर स्वस्थ पडून का राहात नाही? ह्या जगात ते असे लगाम नसलेल्या, आंधळया घोडयाप्रमाणे का उधळते? आणखीही एक प्रश्न माझ्या मनात आहे. त्या विश्वातील पुरुषांना प्रजनन करण्याकरता स्त्रियांची गरज नाही, हे ठीक. परंतु लैंगिक सुखासाठीही त्यांना स्त्री नको आहे का? प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने केवळ मानसिक पातळीवर लैंगिक सुखाचा अनुभव त्यांना मिळत असावा का? परंतु ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवी असा माझा आग्रह नाही. खरं सांगू का, असंही झालंय की मला ह्या जगाबद्दल आता आपलेपणाच वाटेनासा झाला आहे. पण मग ते जग मला आपलंसं वाटतं का? छे, तसंही नाही.
शेजारची छाया आताच कुठेतरी निघाली होती. पण दारातून माझ्याकडे लक्ष गेल्याबरोबर ती एकदम दचकली आणि आत निघून गेली. पण त्यात तिची काही चूक नाही. ते सर्व मी पार कामातून गेल्याचे समजत आहेत. मी ठार वेडी झाली आहे, त्यांच्या दृष्टीने. काल डॉ. साने हलक्या आवाजात कुसूमशी बोलताना मी ऐकले आहे. ते सांगत होते, ''दिल्लीत एका इस्टिटयूटच्या डायरेक्टरशी बोलणे झालं आहे चेअरमनसाहेबांचे. परवा मॅडमना स्पेशल गाडीने पाठवायचे ठरले आहे. नाही..नाही.. तुला नाही जाता येणार बरोबर. मग काही दिवसांनी जरा बरे वाटले ना की आपण जाऊ त्यांना भेटायला. पण एवढयात मॅडमना सांगू नकोस हं! मीच बोलेन त्यांच्याशी स्व:त''
मी मघापासून पाहत्येय, कुसूमला रडू येतंय. माझं लक्ष नाही असं पाहून ती हळूच चोरून डोळे पुसतेय. एवढं प्रेम आहे का ह्या पोरीचं माझ्यावर? पण हे वयंच असे असते, कुणावरही जीव ओवाळून टाकावा असं वाटण्याचं. मीही नाही का गेले ह्या वयातून. पण.. पण मला ह्या विषयाचा विचार करायचा नाहीये आता. खरंच माणूस अनुभवातून किती बदलतो. काही दिवसांपूर्वी मला वाटलेही नसते मी कुणाचा एवढा राग करू शकते. माझ्या मनात कुणाविषयी, कशाविषयी एवढा संताप असू शकतो. आताही माझा विश्वास बसत नाही की, मी हा निर्णय घेतलेला आहे. त्या जगाला धूळीत मिळवण्याचा. त्या जगाचा विध्वंस करण्याचे मी ठरवले आहे. त्यांना साथ देण्याचे कबूल केले आहे, नव्हे त्यांच्याबरोबर तशी योजनाही तयार केली आहे.
आय हेट दॅट वर्ल्ड. आय हेट इट. माझ्या मनात नुसता तिरस्कार भरला आहे. जस जसं ते जग मला ओळखीचे होत गेले, मला उमजत गेले, माझ्या मनावरील दु:खाची छाया अधिकाधिक गडद होत गेली. आणि दु:खाची जागा संतापाने घेतली. संतापाचा तो काळाकुट्ट ढग माझ्या अस्तित्वावर उतरला, मला वेढत गेला.
नाही, मला भावनेच्या प्रवाहात सापडता कामा नाही. कारण आम्ही सात जणीनी मिळून जो निर्णय घेतला आहे तो काही भावनांच्या आधारावर नाही घेतलेला. अनेक वर्षांपासून, अनेक शतकांपासून तो समाज ह्या दिशेने प्रवास करीत होता. जेर्हा पुरुषांनी आपल्या मनातील स्त्री द्वेषाला बेलगाम सोडले आणि निसर्गातच ढवळाढवळ करायला सुरूवात केली. तेव्हाच हा शेवट ठरला गेला. स्त्री शिवाय मानवी जात कायम ठेवण्याचे तंत्र आपण मिळवले आहे असं त्यांना वाटत आहे. त्या सहा स्त्रिया ह्या त्या जगातील अखेरच्या स्त्रिया आहेत.
स्त्री जातीचे आपण अखेरचे वारस आहोत, ही जाणीव किती यातनादायक असेल नाही? आणि त्यातून येणारी असहाय्यता. तिच्या मनात असताना, तिच्याशी बोलत असताना त्यांचे दु:ख माझ्या मनात मुरत गेले आहे, ते दु:ख माझे झाले आहे. आणि त्या दु:खाबरोबरचा संताप, चीड, तिरस्कार ह्या भावनांही माझ्या झाल्या आहेत.
दुसरा काय पर्याय आहे आमच्यासमोर? लाखो वर्षांचे, पिढयान् पिढयांचे आम्ही वारसदार अखेर आम्ही काय करू शकतो. आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागला आहे. निर्णय आम्ही घेतला आहे. स्त्री बिजांडे असलेला त्या विश्वातील हा एकुलता एक फार्म आम्ही बेचिराख करणार आहोत आणि स्वत:ही नष्ट होणार आहोत.
मग अस्तित्वात राहील ते केवळ पुरुषांचे जग. केवळ पुरुषांच्या ह्या जगाचे कर्ते धर्ते स्वामी. पण मानवाची अखेरचीच पिढी. आणखी शंभर वर्षे मग त्या विश्वातील अखेरचा पुरुण मरेल आणि अस्तित्वात राहातील मानवाच्या अस्तित्वाच्या खूणा सांगणारी हाडे. हाडांचे आयुष्य फार दीर्घ असते.
कुसूम जेवणाची तयारी करत्येय. मी आज तिच्याबरोबर जेवण घेणार आहे. मग कॉफी पिणार आहे. आरामखुर्चीत बसून तिच्या हाकेची प्रतिक्षा करणार आहे. तिची हाक ऐकली की, उठणार आहे, भिंतीशी जाणार आहे आणि सरळ दोन पाऊले टाकून सहज स्थळकाळाची भिंत पार करणार आहे.
----------------------------------------
फार्मवरील कर्मचारी ती दुपार कधीही विसरणार नाहीत आणि कुसूमच्या मनावर तर ती दुपार कायमचीच कोरली जाणार आहे.
मॅडम कॉफी घेऊन आतल्या खोलीत गेल्या होत्या आणि कुसूम जीव मुठीत धरून बाहेर दाराशी कानोसा घेत बसून होती. मॅडमना परत झटका आला तर ताबडतोब कळावयाचे अशी डॉ. सानेकाकांची सक्त ताकीद होती. मॅडम आत जाऊन तास, दीड तास झाला तरी आत सर्व शांतच होतं. मग दार उघडून मॅडम बाहेर आल्या. दाराशी त्या क्षणभरच उभ्या राहिल्या आणि मग सरळ बाहेर जाऊन व्हरांडयाच्या पायऱ्या उतरून त्या चालू लागल्या होत्या. मॅडमना त्यांच्या नेहमीच्या ऐटदार, संथ चालीने प्रयोगशाळेकडे जाताना कुसूमने पाहिले आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती आत वळाली.
पंधरा-वीस मिनिटांतच प्रयोगशाळेच्या बाजूने कुणीतरी ओरडल्याचा आवाज ऐकून ती बाहेर आली, आणि किंकाळया मारत ती प्रयोगशाळेकडे धावत सुटली प्रयोगशाळेच्या छपरातून धूराचे लोट बाहेर पडत होते आणि खिडक्यांतून आगीचे लोळ.

मिळूनी साऱ्याजणी
दिवाळी 1989

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा