मंगळवार, ७ जून, २०११

स्वप्नकार

कथा दुसरी


स्वप्नकार
शैलेश वाचनालयातून बाहेर पडला. खऱं तर सुषमाला भेटायच्या वेळेआधी पाच मिनिटे पुस्तक परत करायचे, उड्या मारत एशियाड लायब्ररीच्या पायऱ्या उतरायच्या, झपाट्यानं चालत व्हिटीजवळील हॉटेल रुपम् पाशी पोचायचं ही त्याची नेहमीची पद्धत. पण आज तो बराच लवकर बाहेर पडला होता. पहिल्या पायरीवर येऊन तो थांबला. त्याची थकलेली नजर भोवतालच्या दृश्यावर फिरली. दुपारी पावसाची जोरदार सर पडून गेली होती. बागेतील झाडे-झुडपे, इमारती, आकाश, रस्ते, रस्त्यावरील माणसं.. सर्वच आसमंत कसा धुवून निघालाय. संध्याकाळच्या तिरप्या उन्हात चमचमतोय. त्यानं आपल्या चेहऱ्यावरून, डोळ्यांवरून, केसांवरून हात फिरवला. डोळ्यांतील थकवा आणि मनावरील सुस्ती झटकून टाकण्याचा प्रयत्न केला, अयशस्वी. होय, पण ते त्याला अपेक्षितच होतं. उड्या मारत नाही पण भराभर पायऱ्या उतरला तो. हॉटेल रूपमशी पोचायला फक्त चार मिनिटं लागणार..म्हणजे सुषमाला भेटायला वीस मिनिटांचा दीर्घ अवधी आहे अजून.
आपल्या मेंदुचा ताबा घेण्यासाठी सातत्यानं सतावत असणाऱ्या झोपेशी झगडत, करणं त्याला अगदी अशक्यच झालं होतं. असं काहीतरी होणार हे त्याला अपेक्षित होतंच. त्यांनी तो प्रयोग सुरू केला त्याचा आज चवथा दिवस होता. त्यानं मनातचं ठरवलं, उद्या सुषमाला रजा घ्यायला लावायची किंवा प्रकाशला तरी सर्व दिवस आपल्या सोबत राहायला सांगायचं..
त्याच्या एकदम लक्षात आलं, तो हॉटेल रूपमपाशी येऊन पोचला आहे. त्यानं घड्याळाकडे नजर टाकली. चार मिनिटांचा रस्ता पार करायला त्याला आठ मिनिटं लागली होती. हे कसं झालं? आपण इतके मंद गतीनं चालत होतो का, का मध्येच कुठंतरी थबकलो होतो? आपला नेहमीचा रस्ता सोडून दुसऱ्या लांबच्या रस्त्यानं आलो का आपण? की चालता चालताच डुलकी घेतली आपण?
त्याला कुठंतरी वाचलेलं आठवलं. डॉल्फिन्स कधीच झोपत नाहीत. उत्क्रांतीकाळाच्या शिडीवर मानवाच्या खुपच वर असलेल्या डॉल्फिन्सनी विश्रांतीचं वेगळेचं तंत्र विकसित केलंय. त्यांचा अर्धा मेंदु झोपतो, आणि जागा असलेला अर्धा मेंदु शरीराच्या सर्व क्रिया चालू राखतो. मानवानं हे तंत्र त्यांच्याकडून घेऊन विकसित केलं असतं तर काय झालं असतं? आदिमानव झाडावरून खाली जमीनीवर उतरला, दोन पायांवर उभा राहिला, तेव्हापासून आतापर्यन्त आधुनिक मानव बनण्यासाठी दीड एक लाख वर्षांचा, मुख्यत गेल्या दहा हजार वर्षांचा काळप्रवास करावा लागला मानवाला. त्यातील अर्धा काळ झोपेत. हे तंत्र जर मानवानं आत्मसात केलं असतं तर एवढाच विकास त्यानं निम्म्या काळात केला असता. विसाव्या शतकापर्यन्त केलेली प्रगती त्यानं काही हजार वर्षापूर्वीच केली असती. मानवी इतिहासाची गती चांगलीच तेज झाली असती. मानव आता ह्या शतकात पृथ्वीची कक्षा ओलांडून सूर्यमंडळात प्रवेश करत आहे. जर त्याचा अर्धा मेंदु सतत पुर्णपणे कार्यशील राहिला असता तर? आज तो सुर्यमंडळाच्या कक्षा ओलांडून पलिकडे गेलेला असता. खरोखरच फार चांगलं झालं असतं, पशुत्वाच्या बंधनांतून मुक्त झालेल्या नव्या, पुर्णत्वाला पोचलेल्या मानवाच्या जगात जन्माला आलो असतो मी. छे.. तसं झालं नसतंही कदाचित. कदाचित मी काही हजार वर्षे आधीच जन्माला आलो असतो, पण वर्तमान सदृश्य परिस्थितीतच जन्माला आलो असतो. पण मग....
काय कुठल्या तंद्रीत आहेस रे?”
त्यानं दचकून बघितलं, सुषमा त्याच्याजवळ उभी होती. त्याच्या दंडावर अलगद् बोटे टेकवून त्याचा चेहरा निरखित होती. तो हसला, आपल्या चेहऱ्यावरून, डोळ्यांवरून त्यानं परत एकदा पंजा फिरवला.
छे, मला वाटलं होतं त्यापेक्षा कठीणच प्रकार आहे गं हा. लागोपाठ दोन रात्री जागलो आहे मी ह्यापूर्वी. पण ही लढाई वेगळीच आहे. आत्तापर्यन्त तर निभावले, पण उद्या मी एकटा सापडलो ह्या निद्रेच्या तावडीत तर मला वाटतं चालता चालताच झोपेन मी किंवा न झोपताच स्वप्ने पाहू लागेन.
 “थांब जरा, प्रकाश आल्यानंतर बोलूया ह्या विषयावर. पहिली गोष्ट म्हणजे चहा घेऊया, मला भूकही लागलीय. चल, प्रथम आत जाऊ या.
हॉटेलकडे चालू लागलेल्या सुषमासोबत शैलेश मुकाट्यानं चालू लागला. त्याला माहीत होतं, सुषमाला भूक लागलेली नाही. पण मी दुपारी जेवलो नसेन, कदाचित सकाळपासून चहाशिवाय मी काहीही घेतलं नसेल ह्याची तिला कल्पना असल्याने मला खायला घालण्यासाठी ही सबब पुढे करतेय ही. खरोखरच त्याला भूक लागली होती. शेवटचा पगार घेऊन आज १४० दिवस झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून उधारी, उसनवारी व थापेबाजीवर चाललं होतं.तरी बरं, आपल्याला वाचनाची आवड आहे, वाचनात गर्क असलं म्हणजे पोटाची कूरकूर जाणवत नाही, आणि वेकारीचा हा सलही टोचत नाही सतत
येथून सरळ प्रकाशच्या खोलीवर जाऊया. आजची चौथी रात्र..आज काहीतरी चांगलं खायला करूया. भरपूर नाही पण सकस खायला पाहिजे. नाहीतर प्रयोग राहील बाजूला आणि तू आजारी पडशील. मला वाटतं खरी परिक्षा उद्याच आहे. मी रजा टाकलीय उद्याची. पण शैलेश, बघ हं, तुझी तयारी आहे ना? उगाच जिद्दीपणा करू नकोस. तुला थांबावेसे वाटलं तर आजच थांबूया.
शैलेश काही बोलला नाही. इडलीचा तुकडा तोंडात टाकत तो केवळ मान डोलवीत हसला. खरोखरच सुषमाला ह्या प्रयोगात रस आहे का? खरोखरच ह्या प्रयोगातून काही विशेष निघेल असं तिला वाटतंय का? का आपलं मन कशात तरी गुंतून राहील, आपण काहीतरी करत आहोत असं समाधान आपल्याला मिळेल, सातत्यानं टोचणारा हा बेकारीचा मल काहीसा सुसह्य होईल म्हणून तर हा प्रयोग करण्याची कल्पना तिनं मांडली नसेल ना? नाही. मला माहीत आहे, तिला खरोखरच विद्न्यानात रस आहे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये नसेल पण विद्न्यानाच्या इतर शाखांमध्ये तर निश्चितच आहे.
गेले दोन तीन महिने त्यांचाहा रोजचाच कार्यक्रम झालेला होता. दिवसभर वाचनालयात घालवायचा आणि संध्याकाळी, त्या दिवशी काय वाचलं ह्यावर तिच्याशी बोलायचं. हे खरं आहे की, सुषमा मुख्यत: ऐकण्याचेच काम करते. पण अधुनमधून ती जे प्रश्न विचारते, काही विधानं करते, त्यावरून मी बोलत असतो त्याकडे तिचे लक्ष असते हे तर निश्चित. आणि समजा, त्यामागे आपले मन कशात तरी गुंतवण्याचा, एकमेकांच्या सहवासात राहण्याचाच हेतू असेल तरी त्यात बिघडले काय?
 हा प्रयोग करण्याची कल्पना तिनंच मांडली असली तरी प्रथम सुतोवाच शैलेशनंच केलं होतं. त्या दिवशी वाचलेल्या कार्ल सागानच्या पुस्तकावर तो तिला आणि प्रकाशला सांगत होता, आपली अशी समजूत असते की, काही माणसांनाच स्वप्ने पडतात किंवा माणसाच्या आयुष्यातील काही विशिष्ट काळी, विशिष्ट प्रसंगीच स्वप्ने पडतात. किंवा काही विशिष्ट पदार्थ खाल्ले, एखाद्या तीव्रतर अनुभवाने मेंदू उत्तेजित झाला तर माणूस स्वप्ने पहातो. पण हे अर्धसत्य आहे. वास्तव हे आहे की, प्रत्येक माणूस स्वप्ने पहातोच. आपल्याला आठवत नसतील ही स्वप्ने पण प्रत्येकाला रोज स्वप्ने पडतातच. स्वप्नं पाहाणं ही माणसाची, खरं तर माणसाच्या मेंदूची नैसर्गिक गरज आहे. दोन दिवस अन्न घेतलं नाही तर माणूस काही मरत नाही, पण त्याचं स्वास्थ बिघडतं. संधी मिळताचतो जास्त खाऊन उरलेला कोटा भरून काढतो. स्वप्नं पाहाणं ही ही माणसाची गरज आहे. ह्या स्वप्नं पाहाण्यातून काय साधलं जातं, हे विद्न्यानाला अजून गूढच आहे. पण मनोवैद्न्यानिकांनी सिद्ध केलंय की, प्रत्येक माणसाला रोज काही ठराविक काळ स्वप्ने पडतातच. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नं पडू दिली नाहीत, तर तिच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर त्याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही.
मग तिच्या सुचनेवर त्यांनी चर्चा केली होती. सागान काय म्हणतो त्यावर विश्वास कशाला ठेवायला हवा. आपणच प्रयोग का करून पाहू नये? मग प्रकाशनेही त्या प्रयोगात सामील व्हायचं जाहीर केलं होतं. त्या दोघांनीही कार्ल सागानचे पुस्तक वाचलं होतं, सर्व सामानाची जमवाजमव केली होती. शैलेशनं स्वत:वरच हा प्रयोग करण्याचा आग्रह धरला होता, आणि ते सोयीचेही होतं, त्याच्याकडे भरपूर रिकामा वेळ उपलब्ध होता. पण असं असलं तरी त्याचा खऱा त्रास व जबाबदारी प्रकाश आणि सुषमालाच सांभाळावा लागणार होता. पहिल्या रात्री दोन वाजेपर्यंत तिघेही प्रकाशच्या खोलीवर प्लॅनींग करत जागे होते. प्रयोगात कुणी काय करायचं, निरीक्षणं कशी करायची, त्याच्या नोंदी कशा करायच्या, हे निश्चित करण्यात आलं होतं. शैलेशला स्वप्ने पडू द्यायची नाहीत म्हणजे त्याला झोपच घेऊ द्यायची नाही, असा त्याचा अर्थ नव्हता. कारण निद्रेच्या वेगवेगळ्या पायऱ्या असतात. प्रथम काही काळ झोप लागते पण ती सावध झोप असते. शैलेशनं दोन वाजण्याच्या सुमारास झोपण्याची तयारी केली. त्याला स्वप्नं पडू द्यायची नाहीत, तो स्वप्नावस्थेत जातोय असं दिसल्यावर त्याला जागं करायची, थोडक्यात तो झोपल्यावर त्याच्यावर सतत लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रकाश व सुषमा ह्यांनी वाटून घेतली होती.
माणूस निद्रेच्या गाढ अवस्थेत एकदम प्रवेश करत नाही. काही काळ त्याची झोप सावध असते. काहीशी अर्धवट निद्रावस्था म्हणा. त्यानंतर तो गाढ झोपेच्या अवस्थेत प्रवेश करतो. त्याच्या शरीराचे स्नायू ढिलावतात, त्याच्या चेहरयाचे स्नायूही ढिले पडतात. काही जणांचे तोंड उघडे पडते, काही जण घोरू लागतात. मग काही काळानंतर गाढ झोपेच्या अवस्थेतून माणूस स्वप्नावस्थेत जातो. त्याच्या बुब्बुळांची हालचाल सुरू होते. बंद पापण्यांआड होणारी ही बुब्बुळांची हालचाल म्हणजे स्वप्नावस्थेत प्रवेश केल्याची खूण. शैलेषला झोपू तर द्यायचं पण त्याला स्वप्नावस्थेत जाऊ द्यायचं नाही. त्याच्या बुब्बुळांची हालचाल सुरू झाली की त्याला जागं करायचं हे त्या दोघांचे काम होतं. पहिल्या रात्री झोपायलाच दोन वाजले होते. सावध झोपेत जाऊन, गाढ निद्रावस्थेत जायलाच शैलेषला दोन तास लागले होते. चार वाजेनंतर केवळ दोन तासांचाच प्रश्न होता, कारण त्यानंतर त्यानं उठायचं असंच ठरवलं होतं. तरीही त्या दोन तासाच्या अवधीत शैलेषला तीन वेळा जागं करावं लागलं होतं. साडेपांच वाजता शैलेष उठला आणि तो दूध आणायला बाहेर पडला. त्यानंतर त्या दोघांनी नऊ वाजेपर्यन्त झोपावे असं ठरविण्यात आलं होतं. त्यानंतर दिवसा स्वत:ला जागं ठेवण्याची जबाबदारी शैलेषकडेच होती. शिवाय आपल्या मनोवस्थेत काय फरक पडतो, मानसिक पातळीवर आपल्याला काय काय वेगळे अनुभव येतात, ह्याची नोंद ठेवणं हे शैलेषचेच काम होतं. सर्व प्रकारची निरीक्षणं लिहिण्याचं काम मुख्यत: त्याचेच होते. पहिली रात्र व पहिला दिवस सहजच पसार झाले होते. शैलेषमध्ये काय फरक पडतात, त्याच्या बोलण्या चालण्यात काही फरक पडतात का हे बघण्याचे व त्याप्रमाणे नोंदी करण्याचे काम प्रकाश व सुषमाचं होतं. दुसऱ्या दिवशी रात्री शैलेषनं दोन वाजेपर्यन्त वाचन करून मगच झोपायचं ठऱवलं होतं. पण शैलेषला त्या रात्री लवकरच झोप आली होती. काही वेळच सावध निद्रावस्थेत राहिल्यानंतर शैलेशनं गाढ निद्रावस्थेत प्रवेश केला होता. आणि त्यानंतर पन्नास मिनिटांतच त्यानं स्वप्नावस्थेत प्रवेश केला. त्याच्या मिटलेल्या पापण्यांआड बुब्बुळांची हालचाल सुरू झाली होती. सुषमानं त्याच्या खांद्याला हलवून जागं केल्याबरोबर तो जागा झाला. डोळे उघडून त्यानं भोवती पाहिलं, तिच्याकडं नजर टाकली आणि कुशीवर वळून तो पुन्हा निद्राधीन झाला.
एक चांगलं आहे, ह्याची झोप सावध आहे. सुषमा प्रकाशला म्हणाली.
होय ना शैलेशच्या ऐवजी माझ्यावर प्रयोग केला गेला असता ना तर तुम्हाला फारच त्रास झाला असता. घरी रोज मला उठवताना काय त्रास होतो, ते माझ्या घरच्यानां चांगलं माहीत आहे. लहानपणी तर मी असा झोपायचो की, मला उचलून भींतीशी उभं केलं तर मी तसाच उभ्या उभ्या परत झोपी जायचो. माझी झोप बिलकूल भंग व्हायची नाही.
पण शैलेशची सावध झोप दुसऱ्या दिवशी नाहीशी झाली. त्यानंतर त्याला जागं करायला त्रास पडू लागला आणि जागं झाल्यावरही तो अगदी थोड्या वेळातच झोपेच्या स्वाधीन होऊ लागला. खरं तर सुषमानं आणि प्रकाशनं आळीपाळीनं जागं राह्यचं असं ठरलं होतं. परंतु त्यांना ही कल्पना सोडून द्यावी लागली. सकाळी साडेपाच वाजेपर्यन्त शैलेशला स्वप्नावस्थेपासून दूर ठेवल्यानंतर, त्यांनी त्याला उठायला सांगितलं. दोन रात्री स्वप्नांशिवाय काढल्यानंतर तिसऱ्या दिवशी शैलेशला आपल्या मनोवस्थेत बदल झाल्याचं जाणवायला लागलं. एक प्रकारच्या अजब सुस्तीनं त्याच्या शरीराला व मनाला घेरलं होतं. ह्यापूर्वी काही वेळा दोन रात्री आणि मधला दिवस त्यानं जागून काढले होते, आणि त्यावेळी त्याला काही खास जाणवले नव्हते. येथे तर त्याला झोप मिळत होती.  तिसऱ्या रात्रीनंतर आपल्याला फरक जाणवायला लागेल. परंतू चार दिवस आपण सहज काढू शकू असा त्याचा विश्वास असल्यानं त्यानंच हा प्रयोग सहा रात्रींकरता करावा असा आग्रह धरला होता.
त्याचा तिसरा दिवस तर सुषमाने रजा घेतल्यानं फारसा त्रासदायक न जाणवता संपला होता. चवथ्या दिवशी मात्र शैलेशनं लायब्ररीत जाण्याचा धोका घेतला नव्हता. दुपारी लवकरच सुषमाला भेटण्याचं निश्चित करून तो एका मित्राच्या ऑफिसात पोचला होता. तेथे त्यानं आपला बायोडाटा नव्यानं टाईप करून घेतला. त्याच्या झेरॉक्स काढून घेतल्या. मग मित्राशी गप्पा मारत त्यानं दुपारचा वेळ घालवला होता. त्याच्या ह्या मित्राला शैलेशनं काय चाललं आहे ह्याची काहीही कल्पना दिली नव्हती. तरीपण शैलेशची अवस्था पाहून मित्रानं त्याला तीन चार वेळा त्याच्या तब्येतीची चौकशी केली होती.
ती रात्र सुषमा आणि प्रकाश करता फारच त्रासाची गेली होती. दिवसा झोपून त्यांनी आपल्या झोपेचा आणि स्वप्नांचा कोटा पुरा करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही तीन रात्री व्यवस्थित न झोपण्याचा परिणाम त्यांच्यावरही झाला होता. त्या रात्री तर त्यांना सातत्याने सावध राहण्याची नितांत गरज होती, त्यांनी तशी तयारीही करून ठेवली होती. रात्री ते तिघंही पिक्चर पाह्यला गेले होते. पण थिएटरमध्ये अंधाराचा लाभ घेऊन शैलेश झोपण्याची शक्यता होती. पण सुषमा व प्रकाश ह्यांनी शैलेशला त्या दोघांच्या मधल्या खुर्चीवर बसवून, तो झोपणार नाही ह्याची काळजी घेतली होती. पिक्चर पाहून परत आल्यानंतर शैलेश खोलीतल्या खोलीत चकरा मारत त्यांच्याशी बोलत दोन वाजेपर्यन्त जागाच होता. कारण त्याला आता झोपणंही धोक्याचं वाटत होतं. काही क्षणातच गाढ निद्रावस्थेत जाऊन तो स्वप्नावस्थेत प्रवेश करू लागला होता. सुषमाला तर वाटायला लागलं होतं की ही रात्र तर कशीबशी काढता येईल. पण हा प्राणी दिवसाही मध्येच मधली गाढ झोपेची पायरी सोडून डायरेक्ट स्वप्नावस्थेतच जाईल. पण आपल्या अवस्थेची शैलेशला चांगलीच कल्पना होती. म्हणूनच सिनेमा पाहून परत आल्यानंतर त्यानं जाहीर केलं होतं, आजची रात्र वैऱ्याची आहे. तुम्हाला खरोखरच सतत सावध राहावं लागेल. पण तुम्हालाही विश्रांतीची गरज आहे. मला वाटतं मी अजून दोन तास तरी झोपणार नाही. रेडीओ ऐकत लिहीत बसेन. शिवाय कॉफीचा कप शेजारीच ठेवतो. आज दिवसभर काय काय अनुभवलं ते जरा लिहून काढतो.
ते दोघे शेजारच्या खोलीत गेल्यानंतर तो स्टूलावर बसला आणि कागद पुढे घेऊन त्यानं लिहायला सुरूवात केली.
आज खरोखरच बदल जाणवू लागला आहे. हा बदल निश्चित काय व कसा आहे ह्याचं वर्णन करणं कठीणच आहे. शिवाय जो काही अनुभव येतोय, त्याचं वास्तव व वस्तुनिष्ठ वर्णन करायला हवं. त्यात कल्पनाविलासाला बिलकूल स्थान असता कामा नये. एका बाजूला सर्वच द्नानेंद्रियांची कुवत, संवेदनक्षमता कमी झालंय असं वाटतंय. वाचनाची गती तर इतकी मंदावली आहे की, प्रत्येक शब्दावर आपली नजर रेंगाळतेय, पुढे सरकायलाच तयार नाही, असं वाटत होतं, खऱं तर स्वत:नेच स्वत:ला न्याहाळण्याचा, आकळण्याचा प्रकारच त्रासदायक आहे. आपण एकप्रकारच्या वेगळ्याच अवस्थेत जगत आहोत असं वाटायला लागतं. दारूच्या नशेत असंच काहीसं होत नाही का? एखादा क्षण मध्येच असा येतो की, आपण नशेतून संपूर्ण बाहेर पडल्याची जाणीव होते. म्हणजे त्याआधी नशेत होतो हे जाणवते. आणि काही क्षणांत परत ती जाणीव बोथट होते.
एक दोन वेळा जागेपणीच मी स्वप्ने पहायला सुरूवात केलीय असं वाटून मी दचकून उठून बसलो. एकदा तर समोरची अक्षरे वाचता वाचता पुसट होत गेली होती आणि एका डोंगरमाथ्यावरून मी चाललो होतो. बाजूला खोल दरीत नजर टाकीत पुढे सरकत होतो. मनात थोडीशी भीती, थोडीशी थ्रील अनुभवत असल्याची भावना..
आणि माझ्या लक्षात आलं होतं, आपण स्वप्नात हे दृश्य निरखित आहोत. आपल्या मनात भीतीची भावना निर्माण झालीय.. हे सर्व मला समजत होते, पण क्षणभरच. मग मी तटकन् उठून बसलो. खरंच मी स्वप्न पहातोय हे मला समजत होतं का? स्वप्न पहात असतानाच माझ्या मनाच्या कोपऱ्यात हे स्वप्न आहे अशी जाणीवही होती का?
मला आठवलं, मी पूर्वी कुठेतरी वाचलं होतं, ल्यूसीड ड्रीम्स बाबत. काही माणसं अशी असतात की जे स्वप्न पाहतात, अनुभवतात, त्याला भावनिक प्रतिसादसुद्धा देतात, भीती, उत्सुकता, यातना अनुभवतात. पण काही वेळा स्वप्नात हस्तक्षेप करून ते स्वप्नाची दिशा बदलतात, प्रसंगाला वेगळाच आयाम देऊ शकतात, स्वप्नाला वेगळीच दिशा देऊ शकतात. मी तसाच ल्यूसीड ड्रीम पहात होतो का?
तो एकदम दचकून जागा झाला. त्यानं कागदाकडे पाहिलं, बहुधा लिहिता लिहिता आपला पेन जागीच थांबला होता, कागदावर शाईचा डाग दिसत होता. झटक्यात उभा राहात त्यानं घड्याळाकडे पाहिलं, पण त्याला लिहायला लागून दहा एक मिनिटंच झाली होती.मग तो परत स्टूलावर बसला नाही. खोलीतल्या खोलीत फेऱ्या घालत, गाणी ऐकत, मधूनच टेबलापाशी थांबून उभ्या उभ्या नोटबूकमध्ये लिहित त्यानं अकरा वाजेपर्यन्त वेळ घालवला. मग त्यानं आतल्या खोलीत जाऊन सुषमाला आणि प्रकाशला उठवलं.
तो कॉटवर आडवा झाला, आणि त्यानं डोळे मिटले, पण त्याची झोप आता उडाली होती. एकदम तरतरी आल्यासारखं वाटत होतं त्याला. नकळत तो विचार करू लागला होता, वर्तमानस्थितीबद्दल, सुषमाबद्दल, आपल्या भविष्याबाबत. इथे राहण्याशिवायकाही पर्यायच नाहीये दुसरा. परत घरी गेलो, गावाकडे गेलो, त्यातून पैशांची बचत होईल हे खरं. खेड्यावर गेलं तर ही बेकारीही जाणवणार नाही इतकी. गावाकडे माणूस काही ना काही करत राहातो. पण तिथे गेलं तर लायब्ररीत जाऊन फुकटचे पेपर्स कसे वाचता येतील, जाहिराती कशा पाहिल्या मिळतील, अर्ज, मुलाखती, काहीतरी चालू राहाते इथं. ते कसं जमणार? शिवाय एवढे शिक्षण घेऊन परत बेकारीत गावाकडे जायचं.. इथं प्रकाश आहे, सुषमा आहे. तिचा सहवास आपल्याला हवासा वाटतो की नाही? परंतु तिच्या आपुलकीचा आपण किती दिवस फायदा उठवणार असा? तिची आजही तयारी आहे लग्नाची, म्हणतेय, आज ना उद्या तुला नोकरी लागेलच ना? तोपर्यन्त माझ्या पगारावर काढू दिवस. मला पगारही मिळतो भरपूर..काही दिवस प्रकाशकडे राहूया.. त्यालाही घरचं अन्न मिळेल खायला.. जागाही आहे. तिला पगार आहे भरपूर, पण एकटीला भरपूर, दोघांना पुरेसा. खरं तर तिच्या म्हणण्यात काही चूक नाही. पण तिनं कमावयाचं आणि आपण तिच्यावर अवलंबून राह्यचं, पुरुष असूनही. त्यानं झटका देऊन आपल्या मनातील ते विचार बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. पुरुष असूनही? तो मनातल्या मनात हसला, आपल्या मेंदुला पडलेल्या संस्काराच्या खोल भेगा पुसल्या गेलेल्या नाहीत अजूनही. त्याच प्रकारचे विचार येतात सहजतेने. मी घरातील कर्ता पुरुष ही संकल्पना अजूनही मनात आहे घट्ट.
एकाएकी त्याचं लक्ष प्रकाशच्या बोलण्याकडे वेधलं गेलं. प्रकाश जवळच बसला होता, परंतु हलक्या आवाजात बोलत होता, आपल्या वेस्टर्न पिक्चरमध्ये काऊ बॉईज घालतात ना तसाच ड्रेस होता माझ्या अंगावर.. आणि दोन्ही हातांनी लाल कपडा पकडला होता मी. तो सांड समोर दूर मैदानाच्या दुसऱ्या टोकाला उभा होता, माझ्याकडे म्हणजे लाल कपड्याकडे पहात, पुढच्या पायांनी जमीन उकरत होता, डोकं हलवत मोठ्यानं फुत्कार सोडत होता, मग त्यानं गदागदा डोकं हलवलं, नाक अगदी जमीनीला भिडवलं, आणि
थांब.. थांब प्रकाश, पुढचं मी सांगते,सुषमाचा आवाज आला, मग त्या सांडाने आपले दोन्ही पुढचे पाय वर उचलले, घोडा उड्डाण करतो ना तसं. आणि दोन्ही खूर त्यानं जमीनीवर आदळले, मग मागचे दोन्ही पाय हवेत भिरकावले..आणि मग तो सरळ मैदानातून माझ्या रोखानं धावत न येता, कंपाऊंडच्या भिंतीच्या कडेने माझ्या दिशेनं निघाला, मी जरा मागं सरकले आणि.
शैलेश एकदम धडपडत उठून बसला, त्याचे डोळे विस्फारले गेले होते, तीव्र स्वरात त्यानं विचारलं, हे.. तुमचं हे काय चाललं आहे? “
आश्चर्यानं त्याच्याकडे पहात सुषमा म्हणाली, अरे, पण शैलेश, किती हळू आवाजात बोलत आहोत आम्ही..
तुम्ही मोठ्यानं बोलताय असं मी कधी म्हटलं. तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय? “
काही नाही रे बाबा. आत्ता आम्ही झोपलो होतो ना, तेव्हा प्रकाशनं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न तो मला सांगत होता, तेव्हा माझ्या लक्षात आलं, मलाही तेच स्वप्न पडलंय म्हणून. मग त्याला मध्येच थांबवून मी पुढचा काही भाग सांगितला, मग त्या पुढचा त्यानं. आमची खात्री आहे. काही शंकाच नाही. आम्ही दोघांनी एकच स्वप्न पाहिलंय. फक्त त्याच्या स्वप्नातील काऊबॉय बॉय आहे, आणि माझ्या स्वप्नातील काऊबॉय गर्ल आहे..
मग ते दोघं खदाखदा हसत सुटले.
कॉटवरून खाली उतरून हातवारे करीत शैलेश त्या दोघांना मध्येच थांबवत ओरडला, अरे हसता काय? ही काय लाईटली घेण्याची बाब आहे? तुम्हाला दोघांना एकच स्वप्न पडलंय आणि तुम्हाला काही आश्चर्य नाही वाटत? तुम्हाला काही प्रश्न नाही पडत?  “
शैलेशचा चेहरा आणि त्याच्या आवाजातील तीव्रता, हावभाव पाहून त्यांचे हसणं मध्येच थांबलं. मग प्रकाश समजावण्याच्या सूरात म्हणाला, असे योगायोग क्वचितच घडतात हे खरं आहे. पण ह्या योगायोगाला कारणही आहे, असं मला वाटतं. काल आपण पिक्चर पाहिला, त्यात कुठल्यातरी आगामी सिनेमाचा ट्रेलर दाखवला होता, त्यात बूलफाईटर होता..
त्यात बुलफाईटर होता हे खरं. पण..तुम्ही सांगत असलेला प्रसंग त्यात नव्हता.. आणि शिवाय दोघांना एकाच प्रकारचे स्वप्न एकाच वेळी पडतं ह्याला काय योगायोग म्हणायचं? “
अरे पण दुसरे काय उत्तर आहे? शिवाय आम्हाला एकाच वेळी स्वप्न पडलं हे कुणी सांगितलं तुला? “ सुषमानं विचारलं.
सरळ आहे. तुम्ही झोपायला गेलात आत. दोन तास झोपलात तुम्ही एकूण. त्यात दीड तास सावध झोप आणि गाढ झोप ह्यात गेला असेल. म्हणजे शेवटच्या दहा पंधरा मिनिटांच्या काळातच तुम्ही स्वप्नावस्थेत गेला असाल. म्हणजे जवळ जवळ एकाच वेळी. प्रकाश, तुला स्वप्न केव्हा पडलं? “
केव्हा म्हणजे काय? मला वाटतं, तू मला उठवायला आलास ना तेव्हा नुकतेच संपलं असावं. किंवा उठवण्यामुळे.. पण शैलेश, बी रिझनेबल यार. अरे मी झोपलो होतो. हे स्वप्न मला केव्हा पडलं, किती वाजता पडलं, कसे सांगणार मी? शिवाय त्या बुलफाईटरने म्हणजे मी त्यावेळी घड्याळही बांधलं नव्हतं हातावर कसंबसं वाक्य संपवून प्रकाश हसायला लागला.
शट अप. तुला प्रसंगाची गंभीरता समजत नाही. नको तेव्हा जोक सुचतो तुला शैलेशने खडसावलं.
प्रकाश एकदम गप्पच झाला. शैलेशही. वातावरणात एक विलक्षण ताण निर्माण झालाय असं लक्षात आलं सुषमाच्या. तिनं शैलेशकडे पाहिलं, समोरच्या भिंतीकडे पहात तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. तिनं त्याच्या चेहऱ्याकडं निरखून पाहिलं. तो उत्तेजित झाला होता. त्याचा श्वासोच्छ्वास वेगानं चालत होता. कपाळावर घामाचे थेंब उभे राहिले होते. आणि त्याच्या दोन्ही पंजांची बोटे एकमेकात घट्ट गुंफली गेली होती. बहुधा प्रकाशच्याही शैलेशमधील हा बदल लक्षात आला होता, कारण सुषमाची आणि त्याची नजरानजर झाल्याबरोबर त्यानं आपल्या भुवया प्रश्नार्थक उंचावल्या होत्या. सुषमा जागेवरून उठली, शैलेशजवळ जाऊन त्याच्या दंडावर हात ठेवत ती हलक्या आवाजात म्हणाली, शैलेश, तू जरा एक्साईट झाला आहेस. जरा शांत हो. मी झकास कॉफी करते. पण तुला पाणी हवं का? “
आणि त्याच्या उत्तराची वाट न पहाता, तिनं आतून पाण्याचा ग्लास आणून शैलेशसमोर केला होता. शैलेश शांत झाला होता, तिच्या हातांतील पाण्याचा ग्लास घेऊन त्यानं एका झटक्यात पाणी घशात उलटं केलं होतं. मग तो उठला, खुर्चीवर पडलेला शर्ट अंगावर चढवत, दरवाजाकडे वळत तो म्हणाला, आय ऍम सॉरी प्रकाश. मी जरा कोपऱ्यापर्यन्त जाऊन सिगारेट फुंकून येतो.
तो दारातच काही क्षण उभा राहिला, मग मागं वळून म्हणाला, तुमच्या स्वप्नाचा अजून शेवट झालेला नाही. मला माहीत आहे. पण हा शेवट एकमेकाला सांगू नका. प्लीज. नाहीतर तुम्ही असं करा, तुमच्या नोटसमध्ये तुमचं राहिलेलं स्वप्न लिहून काढा. पण एकमेकांना दाखवू नका प्लीज. दरवाजा लोटून घेऊन तो झटक्यात बाहेर निघून गेला.
काही वेळानं शैलेश परत आला, तेव्हा तो खुपच शांत दिसत होता. प्रसन्न दिसत होता. आल्या आल्या त्यानं खुर्चीत बसकण मारली, दोन्ही पाय वर घेऊन तो मांडी घालून बसला. मग दोघांकडे वळून म्हणाला, सॉरी. मी जरासा ऑफ झालो होतो. पण मला वाटतंय, आपल्या प्रयोगातून काहीतरी वेगळंच, अनपेक्षित पण तरीही महत्वाचे पुढे येतंय. मला जरासा अंदाज आलाय. पण हा माझ्या मनाचा खेळ नाही ह्याची खात्री करून घ्यायला हवी. काय करायला हवे ह्यावर मी विचार केलाय. पण ह्यामागील कारणमिमांसा मात्र मी तुम्हाला आत्ता सांगू शकणार नाही. पण उद्या सकाळी १० च्या सुमाराला आपण ह्या प्रयोगाचा शेवट करूया. तेव्हा तुम्हाला सर्व स्पष्ट उलगडा होईल. मी आता झोपतो. आपला प्रयोग तसाच पुढे चालू राहू द्या. पहाटे ४ नंतर केव्हाही मला उठवा. मग तुम्ही झोपा नऊ वाजेपर्यन्त. मात्र सकाळी तुम्ही झोपल्यावर तुम्हाला स्वप्न पडलं तर उठल्याबरोबर त्याची सविस्तर नोंद करून ठेवा, एकमेकाशी न बोलता.
सकाळी १० वाजता ते तिघंही टीपॉयभोवती जमा झाले होते. सर्वांनी आपली टिपणे पुरी केली होती.
काल तुम्हाला झोपायला सांगून मी माझ्या चार दिवसांच्या अनुभवाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होतो. रेडिओ चालू होता, झोप येऊ नये म्हणून मी स्टूलावर बसलो होतो. पापण्या बंद कराव्यात आणि सरळ मस्त झोपी जावं, असं प्रत्येक क्षणाला वाटत होतं मला. मेंदुवर येणारी झापड दूर करण्यासाठी दहा ओळी झाल्यावर जरा थांबायचं, गाण्यावर लक्ष केंद्रीत करायचं, मनाला जरा आराम द्यायचा आणि परत लिहायचं असं मी करत होतो. मध्येच एकदा मनातील विचार स्पष्ट होण्यासाठी मी डोळे मिटून लक्ष केंद्रीत करण्याची कोशीश करत होतो.. क्षणभरच.. आणि मी दचकून जागा झालो. कारण त्या काही क्षणात माझ्या नजरेसमोरून, मनाच्या पडद्यावरून काही प्रतिमा वेगानं उमटत गेल्या होत्या. ह्या प्रतिमांना मी भावनिक प्रतिसातही दिला होता. परंतु तरी ते नेहमीच्या अर्थानं स्वप्न नव्हतं. मग मी पुर्ण सावध होऊन टिपणं लिहायला लागलो. त्या काही क्षणांच्या वेगळ्या अनुभवाला मी काही महत्व दिले नाही. कारण माझ्या दृष्टीने ते स्वप्न नव्हते. मी जागा असतानाच, अर्धजागृत असतानाच काही प्रतिमा पाहिल्या होत्या. पण मग तुम्ही एकमेकांना स्वप्नाचे तुकडे सांगत स्वप्न पुरे करत होतात. माझ्या लक्षात आलं, त्या काही अर्धजागृत अवस्थेत मी त्याच प्रतिमा पाहिल्या होत्या तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाच्या. तुम्हाला राहिलेले स्वप्न लिहून काढायला सांगितलं मी आणि मग मी ही पाहिलेल्या प्रतिमा तपशिलात लिहून काढल्या. मुख्य म्हणजे मला जेथे माझ्या स्वप्नात हस्तक्षेप केलाय, म्हणजे अर्ध जागृतावस्थेत स्वप्नात बदल केलेत, तेही मी सविस्तर लिहून काढले आहेत. तुम्हीही लिहिले आहे. तुम्ही एकमेकाबरोबर त्या संदर्भात काहीही बोललेले नाहीत. म्हणजे आता आपल्या समोरील कागदांवर आपण जे लिहिले आहे, त्यातील स्वप्नाचा अखेरच भाग हे आपलं स्वत:चं गुपीत आहे. आता आपण पाळीपाळीनं तिघांचीही स्वप्न काय होती ते बघणार आहोत. पण त्याआधी माझ्या स्वप्नाविषयी, म्हणजे त्यातील माझ्या हस्तक्षेपाविषयी मी बोलतो. मला आठवतं ह्या स्वप्नात मी दोन वेळा बदल केलेत.
प्रथम तो मस्त सांड मागचे पाय हवेत उडवून शिंगं खाली घालून माझ्या दिशेनं निघाला, तेव्हा धास्तावून मी त्याला भिंतीकडे पाठवलं, पण मग लक्षात आलं हे अनैसर्गीक आहे. स्वप्नातही आपण भेदरलो म्हणून त्या सांडाला बाजूला पाठवावे हे चूक आहे. आणि ही चूक लक्षात आल्यावर मी त्याला सांगितलं, नाही, तू असं वागून कसं चालेल. मग तो भिंतीजवळून धावता धावता नव्वद अंशाच्या कोनात फिरून माझ्याकडे धावला.
आज पहाटे काय झालं, तुम्ही रात्रभर जागेच होता, मी उठलो आणि तुम्हाला झोपायला सांगितलं. तुमची गाढ झोप पुरी व्हावी इतका अवधी तुम्हाला मी दिला म्हणजे अंदाजेच. मग मी इथं ह्या टेबलाजवळ बसलो, शरीर ढिलं सोडलं, श्वासोच्छ्वास संथ केला, मनाला सैल सोडलं, मग मी कल्पना केली की मी आता झोपेत आहे, माझं मन आणि शरीर सुस्त होतंय, एक सुस्तीचा ढग माझ्या अस्तित्वावर उतरलाय. पसरलाय, रंध्रारंध्रात मुरत चाललाय. बाहेरून येणारे आवाज कमी कमी होताहेत. माझ्या मनातील विचार शांत झालेत. पाणी संथ झाल्यावर त्यातील मातीचे कण तळाला जावेत तसेच. अन् मग माझ्या मन:पटलावर प्रतिमा यायला लागल्या.
शैलेशनं बोलणं थांबवलं, त्यानं आपल्या समोरील नोटबुक उघडलं आणि तो वाचू लागला, मी गाळात रुततोय, अगदी गळ्यापर्यन्त. मला जाणवतंय. मी निश्च्रल राहण्याचा प्रयत्न केला तरीही मी अगदी संथपणे पण अगदी निश्चितपणे खाली खाली जातोय. तो चिखल माझ्याभोवती सर्वदूर पसरलाय. किनारा खूप खूप दूर आहे आणि प्रत्येक क्षणाला मी खाली रुतत आहे..एकेका कणानं..प्रत्येक कणानं. प्रचंड निऱाशा, आणि प्रचंड भीती. मी धडपड केली तरी मी रूतणारच, जरा अधिक गतीनं, निश्चल राहिलो तरी रूतणारच. मला तर वाटतंय माझ्या हृदय़ाच्या धडकण्यानेही मी खाली..खाली जातोय. एक गोठवणारा गारवा माझ्या शरीरात पसरत होता, माझ्या छातीत साठत होता. अखेरचा टाहो फोडून आक्रोश करावा, म्हणून मी तोंड उघडलं आणि येथे मी हस्तक्षेप करण्याचे मनात आणलं. वेगळ्या दिशेनं स्वप्न पुढे सरकवण्याचे मनात आणलं.. आणि मी कशाचा तरी आवाज ऐकला.. अस्पष्ट. मी वर बघितलं, आकाशातून एक प्रचंड मोठ्या आकाराचा पक्षी खाली उतरत होता. माझ्या डोक्यावरच.
वाचता वाचता शैलेश थांबला. त्यानं नोटबूक खाली ठेवलं. त्यानं त्या दोघांकडे पाहिलं. ती दोघं आ वासून, स्तंभित होऊन त्याच्याकडे पहात होते. त्यांच्या चेहरयावर विस्मयाचे आणि गोंधळल्याचे भाव होते. शैलेशच्या ओठावर स्मित उमटलं. काही क्षण थांबून, पुढे झुकून दोघांच्या टेबलावरील हातांना स्पर्श करीत तो म्हणाला, मंडळी, शुद्धीवर या आणि ह्या सर्वाचा तुम्हाला काय अर्थ लागतोय ते जरा मला सांगा.
प्रकाशने प्रथम स्वत:ला सावरलं. खूर्ची मागं ढकलून तो उभा झाला, म्हणाला, ह्याचा अर्थ.. आपण दोघांनी एकच स्वप्न पाहिलंय. एकदा नव्हे.. दोनदा..
दोघांनी नाही प्रकाश, आपण तिघांनी.सुषमा ओठातल्या ओठात पुटपुटली.
शैलेश हसला. त्यानं सुषमाकडे पाहिलं. प्रश्नार्थक भुवया उंचावून.
बराच वेळ सुषमा काहीच बोलली नाही.. मनाशीच शब्दांची जुळवाजूळव करत असल्यासारखी. मग म्हणाली, ह्याचा अर्थ असा होतो की तू जे स्वप्न पाहिलेस, तेच आम्ही पाहिलं. स्वप्नात झालेला बदलही आम्ही पाहिला. पण तू ते स्वप्न केवळ पाहात नव्हतास, त्या स्वप्नाला तू.. तू घडवत होतास, आकार देत होतास.
ती थांबली. तिच्या चेहऱ्यावरील गोंधळल्याचे भाव विरल होत गेले.. मग त्यात आनंदाच्या छटा मिसळल्या गेल्या. ते बघून शैलेश दोन पावलं पुढं झाला, मग आत्मविश्वासपूर्ण, संथ व धिम्या स्वरात तो म्हणाला, होय. ह्याचा अर्थ मित्रांनो, एका विशिष्ट स्थितीत मी स्वप्न अनुभवू शकतोच, पण स्वप्न अनुभवताना त्यात बदलही घडवू शकतो. पूर्ण स्वप्न मी घडवू शकत नाही. पण एका नाजूक क्षणाला इच्छाक्षेप करून स्वप्नाला वेगळी दिशा देऊ शकतो. पण हे तर ठीकच आहे. ह्यालाच ल्यूसीड ड्रीम म्हणतात आणि जगात ल्यूसीड ड्रीम अनुभवणारे इतरही आहेत. पण मी.. मी पाहात असलेले स्वप्न इतरांनाही दाखवू शकतो.तो अडखळला, मग गोंधळलेल्या आवाजात म्हणाला, मला.. मलाच कळत नाहीये, मी काय म्हणतोय ते..
तो गप्प झाला. थकल्यासारखा तो खुर्चीवर बसला. गंभीर चेहऱ्यानं खाली मान घालून टेबलाकडे टक लावून पहात राहिला. प्रकाशनं पाहिलं, सुषमाच्या चेहऱ्यावरही अविश्वास आणि आनंद ह्या दोन्ही भावनांच मिश्रण दिसलं त्याला. मग त्यानं शैलेशकडे पाहिलं आणि तो एकदम उडी मारून उभा झाला. याहू.. अशी आरोळी ठोकत तो शैलेशकडे धावला, शैलेशच्या खांद्याला जोरजोरात हलवत तो म्हणाला, ह्याचा अर्थ मी सांगतो आता. स्वप्नकार शैलेश..होय.होय. कुणी मुर्तीकार असतो, कुणी संगितकार.. तू स्वप्नकार आहेस शैलेश.तो काही क्षण थांबला, आता तू न पाडलेलं, माझं स्वत:च स्वप्न सांगतो तुम्हाला...फोर्टमधील एका गगनचुंबी इमारतीत आपला एक स्टूडिओ आहे. अलिशान.. दिमाखदार. दारावर एक बोर्ड आहे.. स्वप्नभूमी...? नको. स्वप्नभूमी नाही. स्वप्नाकाश. ह्या स्वप्नाकाशचा मॅनेजर आहे मी आणि मालक आहे सुषमा. आणि मुख्य आणि एकमेव कलाकार आहेत.. स्वप्नकार शैलेश.
त्या दिवसाला अनेक वर्षे झालीत आज. शैलेशनं त्याचं हे लोकांना स्वप्न देण्याचं कसब म्हणा वा तंत्र म्हणा वा कला म्हणा चांगलीच विकसित केलीय. त्याच्या हजारो चाहत्यांच्या दृष्टीने तो आजही स्वप्नकार आहे. पण त्यानं प्रकाशचं स्वप्न काही पुरं केलं नाही. त्या पहिल्या काही दिवसांतच आपल्या मित्रांच्या सहकार्यानं लोकांना स्वप्नं देण्याचं तंत्र अधिकाधिक आत्मसात करत असतानाच, एका घढीला त्यानं गंभीर चेहऱ्यानं प्रकाशला सांगितलं होतं, नाही प्रकाश, मी तुझं हे स्वप्न नाही पुरं करू शकत. अरे स्वप्न पाह्लला लावणं ही कला मला लाभलीय. त्या कलेला मी बाजारात विकणार नाही. बघ प्रकाश, मी पैसे घेऊन लोकांकरता स्वप्ने विणायला सुरूवात केली. तर कुठली स्वप्नं हवी असतील त्यांना? कुठल्या स्वप्नाची मागणी करतील ते माझ्याजवळ. अधिक संपत्तीची.. अधिक सत्तेची..अधिक चैनीची..अधिक शक्तिमान होण्याची..बऱ्याच प्रसंगी विकृतही असेल त्यांची ही मागणी. मी पैसे घेणार आणि त्यांच्या इच्छेनूसार त्यांच्याकरता अशी स्वप्ने विणणार. नाही प्रकाश. ते शक्य नाही. मी स्वप्ने विणेन, माझ्यासारख्या तरुणांसाठी..माझ्यासारख्या बेकारांसाठी.. नैराश्याने ग्रस्त झालेल्यांसाठी, ज्या स्वप्नातून त्यांना जगण्याची उर्जा लाभेल इतरांसोबत जगण्याची.
प्रकाशला मॅनेजर बनता आलं नाही. प्रकाशची ती इच्छा शैलेशनं पुरी केली नाही. पण त्याची दुसरी इच्छा पुरी झालीय. शैलेश आणि सुषमा सहजीवन जगत आहेत. स्वप्नकार शैलेश आजही अनेकांना, निराशेच्या अंधकारात चाचपडत असलेल्यांना, ज्यांना स्वप्नाची खरी गरज आहे त्यांना स्वप्नं दाखवत आहे. पण तुम्ही त्याचा पत्ता प्रकाशला विचाराल, तर प्रकाश तुम्हाला तो सांगणार नाही.
पण तुम्हाला खरोखरचं स्वप्न पहाण्याची गरज असेल ना, आशादायी, भव्य, उदात्त स्वप्न पाहण्याची तुम्हाला खरी तहान असेल ना तर तुमची आणि शैलेशची नक्की भेट होईल. मग तो तुम्हाला अशा स्वप्नाचा अनुभव देईल, आपल्या स्वप्नात तुम्हाला सहभागी करून घेईल. विशाल स्वप्ने.. क्षितिजे विस्तारणारी स्वप्ने.. उद्याच्या मानवाची.. मानवाच्या उद्याची..

1 टिप्पणी: